Shirurkasar : शेतीच्या वादातून पुतण्याच्या मारहाणीत चुलतीचा मृत्यू; आरोपींना अटक

घटनास्थळी बीड पोलीस उप विभागीय अधिकारी यांची भेट

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

तालुक्यातील मानूर येथील नागरगोजे वस्तीवर शेतात पाट काढण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात एका 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. घटनास्थळी शिरूर पोलीसांसह बीड पोलीस उप विभागीय अधिकारी यांनी भेट दिली. रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक करण्यात आली. 

मंदाबाई मोहन नागरगोजे, असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मोहन नागरगोजे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी गणेश रोहिदास नागरगोजे व त्याची आई यांना अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरगोजे वस्तीवर दोन जावामध्ये शेतात पाट काढण्याच्या कारणावरून भांडण सुरू होते. त्याच वेळी दुस-या जावेचा मुलगा तिथे आला व त्याने मंदाबाई यांच्या कानशिलात हाताने जोराने मारल्याने त्या जागीच कोसळल्या. त्यांना शिरूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी मयत घोषीत केले. मयत महिलेचे शवविच्छेदन डॉ. किशोर खाडे यांनी केले नंतर मृतदेह ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा मयत महिलेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

घटनास्थळी शिरूर पोलीस स्टेशनचे स.पो.नी.सुरेश खाडे, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र पवार व मनोज बरूरे यांचे सह पोलीस कर्मचारी यांनी परिस्थिती हाताळली. घटनेची माहिती मिळताच बीड पोलीस उपविभागीय अधिकारी सावंत यांनी भेट देऊन पुढील मार्गदर्शन केले. रात्री उशिरा मोहन नागरगोजे यांच्या फिर्यादीवरून कलम ३०२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पो नि सुरेश खाडे हे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here