Editorial : मदतीचं कूळ शोधणं

राष्ट्र सह्याद्री 10 जून

संकटग्रस्तांना मदत करणे ही संस्कृती आहे. या मदतीच्या पाठीमागे कोण आहे, याचा शोध घेऊन मदतीबाबत साशंकता उपस्थित करणे ही विकृती झाली. आपण इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत, नाविन्याचा कसा शोध घेत आहोत, हे दाखविण्याच्या प्रयत्नांत आपल्यावरच चिखलाचे शिंतोडे उडतात, हे काहींच्या लक्षात येत नाही. खासदार संजय राऊत त्यांच्यापैकीच एक. अकारण अंगावर वादळ ओढवून घ्यायचे आणि त्याची किंमत पक्षालाही मोजायला लावायची, हे त्यांच्याबाबतीत अनेकदा घडते. राज्यात शिवसेनेचे सरकार आणण्याबाबतचे त्यांचे योगदान निश्चित आहे. आपल्याच सरकारवर आपल्या टीकेमुळे अडचणी उभ्या राहणार नाहीत, हे त्यांनी  पाहायला हवे; परंतु तेच सरकारपुढे अडचणी निर्माण करतात आणि मग अप्रत्यक्षपणे त्यांना गुडघे टेकावे लागतात. आताही तेच झाले. देशभरात टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर अनेकांनी गरजूंना विविध मार्गांनी मदतीचा हात पुढे केला; पण सर्वाधिक चर्चा झाली, ती अभिनेता सोनू सूद याने केलेल्या मदतकार्याची. सिनेमातला व्हिलन ते रिअल लाईफमधला ‘हिरो’ या शब्दात सोनूचे कौतुक झाले; पण सोनू सूदचे मदतकार्य आता वादात सापडले आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून सोनू सूद मुंबईत टाळेबंदीमुळे अडकलेल्या मजुरांना घरी पोहोचवण्याचे काम करत आहे. सोनूने बिहार, आसाम, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमधील मजुरांना स्वगृही पाठवले. सोनू सूदची मदत घेण्यासाठी लोक त्याला ट्विट करतात. अनेकांनी तर बाहेरगावी जाणाऱ्या लोकांची यादीही त्याला ट्विटवर दिली आहे. सरकारकडून वाहतुकीसाठी रेल्वे सुरू झाली नव्हती, तेव्हाही सोनू सूद मजुरांना घरी पाठवण्यासाठी बसचे नियोजन करत होता. त्याने केलेल्या मदतकार्यामुळे तो प्रकाशझोतात आला असला, तरी हे त्याचे पहिलेच समाजिक कार्य नाही. अॅसिड हल्ल्यातील पीडितांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे कामही सोनू करतो. त्यांच्यावर उपचार आणि त्यांच्या कुटुंबाला मदत करत आला आहे. गुरुद्वारातही तो गरिबांना मदत करतो. सोनू सूद कायमच साधेपणाने वागतो. त्याच्या घराबाहेर पत्रकार, फोटोग्राफर असतील तर त्यांना तो घरी बोलवतो.

गणेशोत्सव कव्हर करण्यासाठी घराखाली उभे असलेल्या पत्रकारांनाही दर्शन घेण्यासाठी वर बोलवतो. त्याचा स्वभाव कायमच मदतीचा आणि साधा राहिला आहे. मदत कोण करतो, यापेक्षा अडचणीच्या काळात संबंधितांची अडचण दूर होते, की नाही, याला जास्त महत्त्व आहे. शिवाय मदत करणा-याकडे कोट्यवधी रुपये आले कुठून, असा प्रश्न करताना त्याला राजकीय वळण देणेही चुकीचे आहे. मदत करणारी व्यक्ती गुन्हेगारी पार्श्वभूमीची नाही ना आणि तिने गैरमार्गाने मिळवलेले पैसे तर मदतीसाठी वापरले जात नाहीत ना, असा प्रश्न काहींना पडणे शक्य आहे; परंतु सोनू सूद यांच्याबाबतीत ती शक्यता नाही.

सोनू सूदचे सामाजिक कार्य अस एकाएकी सुरू झालेले नाही. समजा, राऊत म्हणतात, त्याप्रमाणे त्याच्या मदती मागे भाजपतील कोणा बड्या नेत्याचा हात असेल, तर त्यात वावगे काय आहे? या ना त्या मार्गाने संकटात सापडलेल्यांना मदतीचा हात मिळत असेल, तर ते चांगलेच आहे. नदी आणि ऋषींचे मूळ शोधू नये, असे म्हणतात. त्याचप्रमाणे पैसा चांगल्या कामासाठी वापरला जात असेल, तर त्याचे मूळ शोधण्याच्या भानगडीत पडता कामा नये. राऊत यांनी ते केले; परंतु त्यामुळे त्यांनाच तोंडघशी पडावे लागले. राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने राऊत यांच्या विधानांपासून दूर ठेवले. तेवढेच नाही, तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उघडउघड सूद यांच्या समाजोपयोगी कामाचे काैतुक केले.

कुणालाही राज्याबाहेर आपल्या घरी परतायचे असेल तर ती व्यक्ती सोनू सूदला ट्विट करते. ट्विट पाहताच ‘उद्या तू घरी असशील’ असे उत्तर त्यावर मिळते. त्याच्या ट्विटर हँडलवरून बरीचशी ट्विट गायब असल्याचे आता निदर्शनास आले आहे. त्याच्या ट्विटर अकाऊंटवर गेल्यावर लक्षात येते, की अनेक लोकांनी ट्विट केले होते; पण आता ते डिलीट केले आहेत. एका हाताने केलेली मदत दुस-या हाताला कळू नये, असे हिंदू संस्कृतीत सांगितले जाते. कदाचित आपल्या मदतीच्या ओझ्याखाली कुणी दबू नये, असाही त्याचा हेतू असेल.

प्रतिकूल परिस्थितीमध्येही शेकडो मजुरांना घरी पोहचवल्यामुळे सूदच्या मदतकार्यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप करण्यात आला. संकटाच्या काळात राजकीय पक्ष जी मदत करतात, त्यामागे राजकीय हेतू नसतोच का, असे छातीठोकपणे कोणालाही सांगता येणार नाही. राऊत म्हणतात, त्याप्रमाणे सूद निवडणुकीत भाजपचा स्टार प्रचारक म्हणून दिसला, तरी त्यावरून त्याने केलेल्या मदतीचे मोल कमी होत नाही. सोनू सूद हा चांगला अभिनेता आहे. तो जे काम करतोय, ते चांगलेच आहे; पण त्यामागे कोणी ‘राजकीय दिग्दर्शक’ असण्याचीही शक्यता आहे, असे मत राऊत यांनी व्यक्त केले. चांगले काम आहे, असे म्हणायचे आणि त्याच वेळी त्यामागे राजकीय दिग्दर्शक आहे, अशी टीका करायची, ही दुटप्पी भूमिका झाली. चांगला दिग्दर्शक असेल आणि चांगला अभिनेता असेल, तरच चित्रपट चांगला होतो, हे साधे गणित राऊत यांच्यासारख्या रोखठोक माणसाच्या लक्षात आले नाही का? भाजपवर टीका करण्याच्या नादात आपल्या टीकेने ज्यांना मदत मिळाली, त्यांचाही आपण अवमान करतो आहोत, हे त्यांच्या लक्षात येत नाही.

राऊत यांनी सोनू सूदच्या कामाविषयी घेतलेल्या आक्षेपांबद्दल काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी पलटवार केला. मोठ्या मनाने त्याचे कौतुक करण्यापेक्षा शिवसेना त्याच्यावर टीका करत आहे. स्थलांतरित मजुरांच्या मद्द्यावर आपले अपयश लपवण्यासाठी इतक्या खालच्या पातळीवर जाण्याची गरज नाही, अशी टीका निरूपम यांनी केली. निरुपम हेही कायम वादग्रस्त वक्तव्ये करतात आणि राऊत व निरुपम दोघेही पूर्वी शिवसेनेच्याच दोन मुखपत्रांत संपादक होते, हे लक्षात घेतले, तर निरुपम यांच्या टीकेकडे एकवेळ दुर्लक्ष करता येईल; परंतु इतरांच्या टीकेकडे तसे करता येणार नाही. मनेसेनेही आता या वादात उडी घेतली आहे. तुम्ही अग्रलेख लिहिण्यापलिकडे काय केले, असा प्रश्न मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी विचारला आहे.

विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेची टीका म्हणजे चर्चेत राहण्याचा प्रयत्न आहे, असे म्हटले. सूद यांनी काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली हेती. आता त्यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचीही भेट घेतली. त्यानंतर आदित्य यांनी सूद यांचे काम चांगले आहे, असे गाैरवोद्गार काढले. शिवसेनेनेही राऊत यांच्या टीकेपासून दूर राहणे पसंत केले. त्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. त्यामुळे राऊत यांच्यावर एकाकी पडण्याची वेळ आली. 2018 मध्ये तत्कालीन वनमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवर याच्या एका कार्यक्रमाला सोनूने हजेरी लावली होती. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचीसुद्धा सोनूने काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. यावरून सोनू भाजपच्या हातचे बाहुले आहेत, असा होत नाही. सोनू सूदला कधीही राजकारणात रस नव्हता. त्यांचे फार कुणाशी राजकीय संबंध नाहीत. त्यांना राजकीय आॅफर आल्या, तरी ते सध्या तरी स्वीकारतील, असे वाटत नाही.

आताच्या मदतीच्या मुद्यावर तापलेले राजकारण हे श्रेयाचे आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही जे त्यांना जमले नाही, ते सोनू सूद यांनी स्वतंत्रपणे करून दाखवल्यानेही शिवसेनेला अडचण असू शकते. सर्व श्रेय त्याला मिळत असल्यानेही राजकीय वाद सुरू झाल्याची शक्यता आहे. सोनू सूद मोदी सरकारच्या ‘हम फीट तो इंडिया फीट’ या अभियानाचा सदिच्छादूत होते. त्यावेळी त्यांना त्यांच्या ‘सोशल मीडिया हँडल्स’वरून भाजपचा फायदा होईल, असा मजकूर टाकण्याची आॅफऱ होती, असे ‘कोब्रा पोस्ट’च्या वृत्तात म्हटले होते. त्यावेळी सोनू सूद यांनी, “अशा प्रकारच्या ऑफर वेगवेगळ्या ब्रँड्सकडून आम्हाला येतच असतात,” असे सांगितले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here