Mumbai : विधीमंडळचे पावसाळी अधिवेशन महिनाभर लांबणीवर – मुख्यमंत्री

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

मुंबई – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन जवळपास महिनाभर पुढे ढकलले आहे. आता पावसाळी अधिवेशन 3 ऑगस्टपासून घेतले जाणार आहे, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

“येत्या 22 जूनपासून विधीमंडळाचे अधिवेशन घेतले जाणार होते. त्या अधिवेशनाबद्दल कामकाज समितीची बैठक झाली. या बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर येत्या 22 जूनला अधिवेशन घेणे कठीण आहे. त्यामुळे ते पुढे 3 ऑगस्टला घेण्याचे ठरले आहे,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

“तसेच नागरिकांनी कृपया बाहेर पडल्यावर अंतर ठेवा. कोरोनासोबत जगायचे शिकावे लागेल. स्वच्छता पाळा, निर्जंतुकीकरण पाळा,” असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेला केले.

…तर पुन्हा लॉकडाऊन करावं लागेल

“महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन लागू केला आहे. तसेच हळूहळू यात शिथीलता आणली जाईल. जगभरात कोरोनासोबत जगायला शिका, असे म्हटले जाते, तसेच आपल्याला करावे लागेल. बाहेर पडून आरोग्यासाठी व्यायाम करायला सांगितले. पण पहिल्या दिवशीची गर्दी पाहून धाकधूक वाढली. मात्र, बाहेर आरोग्यासाठी पडायचं आहे, खराब करण्यासाठी नाही.

जर अशाचप्रकारे गर्दी होत राहिली तर निर्बंध लावावे लागतील, लॉकडाऊन करावे लागेल. मात्र, तशी वेळ येणार नाही, महाराष्ट्रातील जनता नियमांचे पालन करेल,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.

चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांच्या पाठीशी सरकार-

“निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सगळे तिकडे जाऊन आलो आहोत. नुकसान खूप झाले आहे. विशेषत: रायगड जिल्हा, रत्नागिरीतील दापोली, मंडणगण येथे मोठे नुकसान झाले आहे. या ठिकाणी नुकसान भरपाईसाठी पंचनामे सुरु आहेत. पंचनामे आल्यावर नुकसान किती झाले आहे याची माहिती मिळेल. त्यानंतर भरपाई दिली जाईल,” असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

“वादळामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांसाठी मदतीसाठी निकष बदलण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे निकष बदलण्यात आले आहेत. बदललेल्या निकषाप्रमाणे मदत घोषित करण्यात आली आहे,” असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.

“मी जेव्हा रायगडमध्ये गेलो तेव्हा तात्काळ 100 कोटींची मदत जाहीर केली. त्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाला 75 आणि 25 कोटींची मदत केली. मला विचारण्यात आले होते की, पॅकेज काय? मुळात पॅकेज हा शब्द चुकीचा आहे. कुणालाही आम्ही उघडू पडू देणार नाही. ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना महाविकास आघाडीचे सरकार खंबीरपणाने मदत करेल,” असे आश्वासन उद्धव ठाकरेंनी नुकसानग्रस्तांना दिले.

“मुंबई लोकलची मागणी आम्ही सातत्याने करत आहोत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पोहोचण्यासाठी, त्यांची संख्या वाढण्यासाठी लोकल महत्त्वाची आहे. लॉकडाऊनच्या काळातही आपण ही मागणी केली आहे,” असे मुख्यमंत्री लोकलच्या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले.

“मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणताही संघर्ष झालेला नाही. मंत्रिमंडळ राज्याच्या हिताचे निर्णय घेते, तेथे कुणीही मारामाऱ्या करण्यासाठी येत नाही,” असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here