Human interest : ८५ वर्षांच्या आजीने हरविले कोरोनाला

0

Ahmednagar Corona Updates : दोघांना नव्याने बाधा; वीस जणांना सोडले घरी

नगरः  श्रीगोंद्यातील एका ८५ वर्षांच्या आजीबाईंनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाची दोन जणांना बाधा झाली आहे, तर वीस जणांनी कोरोनावर मात केली. त्यात या आजींचा समावेश आहे. त्यांच्या जगण्याच्या जिद्दीचे सर्वांनीच काैतुक केले.

या आजी मुंबईहून श्रीगोंदे तालुक्यातील कोंडेगाव येथे आल्या असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आल्याचे म्हटले आहे; मात्र या ८५ वर्षीय आजींनी कोरोनाशी यशस्वीपणे दोन हात केले आणि त्या कोरोनामधून पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत. त्यांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला आहे. मनाचा कणखरपणा, उपचारांना योग्य प्रतिसाद आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर ८५ वर्षांच्या आजीबाई कोरोनातून बऱ्या झाल्या. डॉक्टर्स, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले. कोरोनामुळे वयस्कर लोकांच्या मृत्यूचे प्रमाण प्रचंड असल्याने ६५ वर्षांवरील व्यक्तींसाठी कोरोना अधिक धोकादायक असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच वयस्कर लोकांची अधिक काळजी घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगातात. मात्र या आजींप्रमाणे कोरोनाला यशस्वीपणे मात देणाऱ्या वयस्कर रुग्णांची संख्याही दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना चाचणी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत आज पाच व्यक्तींच्या घशातील स्त्राव तपासणी अहवाल नकारात्मक आले. एका व्यक्तीचा अहवाल होकारात्मक आला. पारनेर तालुक्यातील सुपे एमआयडीसीतील एका खासगी कंपनीतील व्यवस्थापक कोरोनाबाधित आढळले. दिल्लीहून प्रवास करून ते आले होते. त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. सर्दीचा त्रास होत असल्याने त्यांची तपासणी करून घेतली. आज ते बाधित असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले.

वीस व्यक्तींना वैद्यकीय तपासणीनंतर बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये अकोले सात, नगर महापालिका क्षेत्रातील  सात, संगमनेर चार, राहाता एक आणि श्रीगोंदे येथील एक अशा २० व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या आता १६१ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here