परीक्षा रद्द करण्याचा निर्णय योग्य

4

पवार यांच्याकडून समर्थन; राज्यपालांवर उपहासात्मक टीका

विशेष प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
रत्नागिरी : पदवीधरांची परीक्षा न घेण्याच्या विषयाचा विचार केला, तर भारतातील नामांकित विद्यापीठे तसेच जगातील ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि अन्य देशातील विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. देशात जर खासगी विद्यापीठे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेत असतील, तर शासनाने घेतलेला निर्णय आणि त्यात अगदीच चुकीचे कोणी केले, असे नाही. त्यामुळे राज्यपाल महोदयांना याची माहिती जास्त असेल असे मला वाटते, असा उपहासात्मक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला.

राज्यात कोरोना आणि टाळेबंदीबरोबर विद्यापीठात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरून बरेच वादळ उठले होतं. राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला होता; मात्र राज्यपालांनी परीक्षा घेण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले. यासंदर्भात पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टोला लगावला. निसर्ग वादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी पवार दोन दिवसीय कोकण दौर्‍यावर आहेत. पहिल्या दिवशी रायगड जिल्ह्यात पाहणी केल्यानंतर बुधवारी त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांना भेटी दिल्या. पाहणी केल्यानंतर माध्यमांशी पवार यांनी संवाद साधला.
पवार म्हणाले, नुकसान झालेल्या विभागाची पाहणी केली असता संपूर्ण यंत्रणा सगळ्याच ठिकाणी पोहोचली नाही. त्यामुळे अजूनही प्राथमिक माहिती आपल्याकडे आली असल्याचे प्रशासकीय अधिकार्‍यांनी सांगितले आहे. यात फळबागा, शेती, घरे यांचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे अजूनही सुरू आहेत. त्यामुळे जे नुकसान झाले आहे, त्यात अधिक अर्थसहाय्य करून मदत करण्याची भूमिका सरकारने घ्यावी. आंबा, नारळ, सुपारी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची नुकसान भरपाई देताना पुढील सात-आठ वर्षांचा विचार करून द्यायला हवी.
बागायती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहे. त्या बागायती जमिनी साफ करायचीदेखील मोठी अडचण आहे. रोजगार हमीतून फळबाग उत्पादन करण्याची ही योजना पुन्हा लागू केली, तर इथला शेतकरी पुन्हा उभा राहू शकेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ उद्याच याबद्दलची बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत कोकणवासीयांना संकटातून बाहेर काढण्याचा योग्य निर्णय घेतला जाईल. यामध्ये गरज भासल्यास केंद्राकडे जाऊन मदतीची मागणी करू, यासाठी मुख्यमंत्री पुढाकार घेतील. निसर्ग चक्रीवादळाने सगळ्या भागात नुकसान झाले असतानाही इथला माणूस खचून गेला नाही, तर पुन्हा कामाला लागला आहे. पर्यटन क्षेत्रात अधिक नुकसान झाले आहे. या क्षेत्राला उभारी देण्याचा विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here