Shirdi : गुरुपौर्णिमा उत्सवासाठी पालख्या आणण्यास मनाई

2

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

साईबाबा संस्थानचे आवाहन

शिर्डीच्या साई मंदिरातील महत्वपूर्ण मानला जाणारा गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो. मात्र, कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललेल्या असताना मंदिर प्रशासनाने यंदाच्या उत्सवाला साईभक्तांनी पालख्या आणण्यासाठी मनाई हुकूम जारी केला आहे, अशी माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.

कोरोना विषाणूंच्या संकटामुळे दि. १७ मार्चपासून साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आले असून दि. ०४ जुलै ते ०६ जुलै २०२० रोजी येत असलेल्‍या गुरुपौर्णिमा उत्‍सवानिमित्‍त पालखी घेऊन पदयात्रींनी कोरोना विषाणू (कोव्‍हीड १९) चा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी शिर्डी येथे येण्‍याचे टाळावे. देश व राज्‍यावर आलेल्‍या कोरोना व्‍हायरसच्‍या संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपायांकरीता व विषाणुची बाधा एकमेकांना होऊ नये म्‍हणून भारत सरकार व राज्‍य शासनाच्‍या वतीने लॉकडाऊन करण्‍यात आले असून संस्‍थानच्‍या वतीने दिनांक १७ मार्चपासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आलेले आहे.

साईबाबांचा महिमा व त्‍यांची शिकवणूक संपूर्ण जगात पोहोचली असून त्‍यांचा भक्‍त वर्ग देशात व परदेशात मोठ्या प्रमाणात आहे. तसेच श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने दरवर्षी श्रीरामनवमी, श्री गुरुपौर्णिमा, पुण्‍यतिथी आदी प्रमुख उत्‍सवांचे आयोजन करण्‍यात येते. पालखीसह येणारे पदयात्री या उत्‍सवांचे प्रमुख्‍य वैशिष्‍ट्य असते. त्‍यामुळे राज्‍यासह देशाच्‍या कानाकोप-यातून पालखीसह येणारे पदयात्रींची संख्‍या ही मोठया प्रमाणात असते.

यावर्षी कोरोना व्‍हायरसच्‍या संकटामुळे समाधी मंदिर दिनांक १७ मार्च २०२० पासून ते शासनाच्‍या पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्‍यात आलेले आहे. त्‍यामुळे नुकताच पारपडलेला श्रीरामनवमी उत्‍सव अतिशय साध्‍या पद्धतीने साजरा करण्‍यात आला. संस्‍थानच्‍या आवाहनाला प्रतिसाद देऊन सर्व पदयात्रींनी सहकार्य केले. त्‍याचप्रमाणे दिनांक ०४ जुलै ते ०६ जुलै २०२० रोजी श्री गुरुपौर्णिमा उत्‍सव येत असून याकालावधीत पदयात्री साईभक्‍तांनी कोरोना विषाणू (कोव्‍हीड १९) चा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी पालखी घेऊन शिर्डी येथे येऊ नये व संस्‍थानला सहकार्य करावे, असे आवाहन डोंगरे यांनी केले.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here