Karjat : सॅनिटायजर घेऊन जाणारा मालवाहू ट्रक पाटेवाडी शिवारातून बळजबरीने पळवला

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कर्जत : पाटेवाडी (ता.कर्जत) शिवारात मालवाहू ट्रक चालक आणि त्याच्या साथीदारास चार अज्ञात इसमांनी मारहाण करीत त्यांच्या ताब्यातील ट्रक सॅनिटायजरच्या बाटल्यासह बळजबरीने पळवून नेल्याची घटना बुधवारी (दि १०) घडली.
कर्जत पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार दि १० रोजी संध्याकाळच्या ७:३० च्या सुमारास फिर्यादी आणि त्याचे जोडीदार यांच्या ताब्यातील अशोक लेलंड कंपनीचा मालवाहू ट्रक (टीएन -28 बीए- 1694) सॅनिटायजर घेऊन जात होता. नगर सोलापूर महामार्गावरील कर्जत तालुक्यातील पाटेवाडी शिवारात वळणावरील गतिरोधक ठिकाणी आला असता अचानक मोटारसायकलवरील दोन इसम आणि टाटा एसी चारचाकीतील दोन इसम, असे एकूण चार जणांनी गाडी अडवली.
यावेळी गाडीमध्ये वर चढत चालक व त्याचा जोडीदार यांना मारहाण करून त्यांच्या ताब्यातील ट्रकच्या खाली बळजबरीने उतरवून मालट्रकसह सुमारे २०३७ सॅनिटायजरच्या बाटल्या पळवून नेल्या. मनिवेल पेरूमल (रा. मुथथुहापट्टी, जि- नामकल, तामिळनाडू) यांच्या फिर्यादीवरून चार अज्ञात इसमाविरुद्ध भादवी कलम ३९४, ३४ प्रमाणे कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक संजय सातव आणि पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी भेट दिली. घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे हे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here