Rahuri : ग्रामीण रुग्णालयाचा 16 कोटींचा निधी परत गेला

तो निधी राहुरीकरांना पुन्हा मिळणार का? ग्रामिण रुग्णालय, पाणी योजना व रस्त्यांचे मंजूर झालेल्या कामांचे काय? नागरिकांचे प्रश्‍न

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

राहुरी शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या प्रश्‍नाचे भिजत घोंगडे कायम आहे. मागील शासनाच्या काळात मंजूर झालेला ग्रामिण रुग्णालयाचा 16 कोटी रूपयांचा निधी जागेचा वाद न संपल्याने परत गेला आहे. दरम्यान, पुन्हा निधी मिळविण्यासाठी नव्याने प्रशासकीय पाठपुरावा करावा लागणार आहे. यासह राहुरी शहराच्या सुधारीत पाणी योजनेचा प्रश्‍नही अधांतरी असून मंजूर झालेला निधी मिळालाच नसल्याची माहिती मुख्याधिकारी श्रीनिवास कुर्‍हे यांनी दिली.

माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्यकाळात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुरी शहरात महायात्रा काढली होती. त्यावेळी राहुरी शहराच्या पाणी योजनेला तत्वतः मंजुरीचे पत्र देण्यात आले होते. सर्वच राजकीय नेत्यांनी फ्लेक्सबाजी करून निधी मिळाल्याचा आनंद साजरा केला होता. वर्षाचा कालावधी उलटला. मंजुरी मिळविल्याबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेतल्याचे फ्लेक्सही गायब झाले. तसेच निधी आणण्यावरून आरोप प्रत्यारोपही झाले. परंतु याबद्दल कोणीही ब्र काढत नसल्याचे चित्र आहे. वर्षभरापूर्वी मंजूर झालेल्या निधीचे झाले काय? असा प्रश्‍न शहरातील नागरिकांकडून विचारला जात आहे.

दुसरीकडे राहुरीच्या ग्रामिण रुग्णालयाबाबत अनेक वादंग निर्माण झाले. इमारत नसल्याने अनेक निष्पाप लोकांना रुग्णालयाच्या दारातच प्राण सोडावे लागले. तर अनेकांना उपचार न मिळाल्याने रस्त्यातच निरोप घेण्याची वेळ आली. प्रसुती, शस्त्रक्रिया, हृदयरोग, मधुमेह आदी आजारांनी ग्रस्त असलेल्या रूग्णांना खाजगी रूग्णालयातच उपचार घ्यावे लागत आहे. ग्रामिण रूग्णालय असून अडचण नसून खोळंबा अशी गत राहुरीकरांची आरोग्य व्यवस्थेबद्दल झाली आहे.

दुसरीकडे राहुरी शहरातील सुधारित पाणी योजनेला मंजूर मिळाल्याचे पत्र मागिल वर्षी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुरीत स्वतः उपस्थिती देत दिले होते. शहराच्या सुधारित पाणी योजनेसाठी सुमारे 32 कोटी रूपये तत्वतः मंजूरी दिल्याचे झाले काय? असा प्रश्‍न शहरवासी विचारत आहेत. एकीकडे ग्रामिण रुग्णालय तर दुसरीकडे शहराची पाणी योजना शासकीय फेर्‍यांमध्ये अडकलेली असताना त्यास आता कोरोनाची बाधा निर्माण होणार असल्याचे चित्र आहे.
कोरोनाच्या पार्श्‍वभुमीपूर्वी दोन्ही महत्वपूर्ण कामांसाठी निधी उपलब्ध होणे गरजेचे होते. तसेच कामासही प्रारंभ होणे महत्वाचे होते. परंतु प्रशासकीय अडचण तर दुसरीकडे कोणत्याही राजकीय नेत्याने याबाबत उचित दखल घेतली नसल्याने दोन्ही प्रश्‍नांचे भिजत घोंगडे कायम आहे.

नगर जिल्ह्यातील मध्यवर्ती असणारा व सर्वाधिक सधन असणार्‍या राहुरी तालुक्याची आरोग्य व्यवस्था कोलमडलेली आहे. खाजगी रुग्णालयांमध्येही अत्यावश्यक सोय सूविधा नाही. यामुळे राहुरीत ट्रामा सेंटर उपलब्ध व सर्व सोय सूविधा असेल असे सुसज्ज ग्रामिण रुग्णालयाचा प्रश्‍न नेमका सुटणार कधी? असाही प्रश्‍न निर्माण झालेला आहे. मागिल भाजप शासनाच्या काळातील अनेक योजनांचा निधी थांबविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. परंतु संबंधित कामांसाठी नव्याने निधी उपलब्ध होणार का? हा प्रश्‍न महत्वाचा ठरणार आहे.

सुधारित पाणी योजनेला मंजूर नाही, मंत्रालयात प्रस्ताव आहे – श्रीनिवास कुर्‍हे

राहुरी शहरातील सुधारित पाणी योजनेला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी देत 32 कोट मंजूर केल्याबाबत प्रश्‍न विचारला असता मुख्याधिकारी श्रीनिवास कुर्‍हे यांनी सांगितले की, निधी मंजूर झाल्याचे माहितच नाही. मंत्रालयात प्रस्ताव पडून आहे. जानेवारी 2020 साली मंत्रालयात चर्चा झाली. परंतु कोरोना पार्श्‍वभुमीमुळे योजनेच्या निधीबाबत चर्चा थांबल्याची माहिती मुख्याधिकारी कुर्‍हे यांनी दिली.

जागेच्या वादात, ग्रामिण रुग्णालयाचा निधी परत गेला ; पानसरे

राहुरी ग्रामिण रुग्णालय इमारतीसाठी 16 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला होता. सुसज्ज व ट्रामा सेंटर सूविधा असणारे रुग्णालयाचे बांधकाम होण्यासाठी जागेची अडचण निर्माण झाली. वरिष्ठ अभियंता यांनी आहे त्या जागेत काम करण्यास नकार दिला. तर जागेबाबत न्यायालयिन वाद झाले. परिणामी निधी खर्च झाला नाही. परत गेलेला निधी मिळविण्यासाठी पुन्हा नव्याने प्रस्ताव सादर केले जात आहे. निधी लवकरावत लवकर मिळाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रुग्णालय इमारत बांधकाम सुरू होईल.असे शिवराज पानसरे शाखा अभियंता राहुरी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here