!!भास्करायण :२१!!
मातृह्रदयी व लढवय्येःसाने गुरुजी!

Rashtra Sahyadri Special Article…

महाराष्ट्राचे आधुनिक संत म्हणून ओळखले जाणारे साने गुरुजी यांचा आज स्मृतीदिन . साने गुरुजी यांनी लिहीलेल्या “शामची आई” या पुस्तकाने महाराष्ट्राच्या अनेक पिढ्यांना प्रभावित केले आहे. संस्कारगाथा अस या पुस्तकाच वर्णन करता येईल. एकुणातच समंजस आणि उदारमतवादी नागरिकत्व घडण्यास हे पुस्तक उपयोगी ठरलेले आहे. या पुस्तकाच्या लाखो प्रती महाराष्ट्रातील घराघरात पोहोचल्या आहेत. या पुस्तकामुळेच साने गुरुजींची मातृह्रदयी साने गुरुजी ही प्रतिमा ठसठशीत बनली.


महान व्यक्तीच्या जीवन कार्यातील आपल्याला झेपेल आणि रुचेल तेवढाच भाग स्विकारतात आणि तेवढाच भाग सतत सांगत रहातात. साने गुरुजींच्याबद्दलही काहीस असच झाल आहे का? सामाजिक सलोखा आणि परस्पर आदरभाव रुजवण्यासाठी साने गुरुजींनी केलेले कार्य महान आहेच पण साने गुरुजींच जिवितकार्य एवढ्यापुरतच मर्यादित नाही. अन्यायाविरुद्ध बोलायला, भूमिका घ्यायला आणि कृती करायला शिकवण हा सुद्धा एक आवश्यक संस्कार असतो. अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची लढवय्या वृत्ती साने गुरुजींच्यामधे होती की नव्हती? असेल तर ती पुढे का येत नाही? आधी म्हटल्याप्रमाणे आपण आपल्याला पचतील, रुचतील तेवढेच साने गुरुजी स्विकारल्यामुळे अस झाल असेल का?

ब्रिटीशांच्या साम्राज्यवादी जोखडातून भारताला मुक्त करण्यासाठी एकोणीसशे बेचाळीस साली म. गांधीजींच्या नेतृत्वाखाली निर्णायक आंदोलन छेडले गेले. या आंदोलनाच्या ठरावात ब्रिटीशांना "छोडो भारत" असे बजावण्यात आले होते तर हे घडवून आणण्यासाठी भारतीयांसाठी "करा अथवा मरा" चा आदेश होता. साने गुरुजींनी बेचाळीसच्या चले जाव आंदोलनात उडी घेतली. भूमिगत राहून ब्रिटीशांच्या विरोधात रान उठवण्याचे काम ते आणि त्यांचे सहकारी करत होते. आपल्या ओजस्वी वाणीने ब्रिटीश राजवटीविरोधात युवती-युवकांच्या मनात अंगार फुलविण्याचे काम साने गुरुजी करत होते. त्यांच्या प्रेरणेने अनेक युवती- युवकांनी चले जाव आंदोलनात स्वतःला झोकून दिले. या आंदोलनादरम्यान साने गुरुजींनी "क्रांतीच्या वाटेवर" ही पुस्तिका लिहीली. बरेच दिवस ही पुस्तिका अप्रकाशित होती. काही वर्षांपुर्वी साधना प्रकाशनाने विशेषांक स्वरुपात ही पुस्तिका प्रकाशित केली. हिंसा-अहिंसा याबद्दलचे आपल्या मनातील विचार साने गुरुजींनी या पुस्तिकेत शब्दबध्द केले आहेत. ब्रिटीश राजवटीविरोधात संघर्ष करण्याचे आवाहन तरुणी-तरुणांना करताना या पुस्तिकेत साने गुरुजींनी जे लिहीलय त्याचा थोडक्यात आशय असा आहे. काँग्रेस वर्कींग कमीटीच्या ८ अॉगस्ट १९४२ च्या ठरावाद्वारे भारतीयांनी आपले स्वातंत्र्य घोषित केले आहे. प्रत्येक भारतीयाने उद्यापासून स्वतःला स्वतंत्र नागरिक मानावे व तसा व्यवहार करावा असे मार्गदर्शन म. गांधीजींनी केले आहे. या ठरावानुसार आज भारत हे स्वतंत्र राष्ट्र आहे आणि त्यामुळे भारतीय भुमीवरील ब्रिटीश राजवट संपुष्टात येत असल्याचे त्यांनी ठणकावून सांगीतले . फैजपूर या ग्रामीण भागात होत असलेल्या काँग्रेसच्या या अधिवेशनाच्या व्यवस्थेसाठी साने गुरुजींच्या मार्गदर्शनात स्वयंसेवक दल उभारले होते. यातूनच राष्ट्र सेवा दलाची संकल्पना पुढे आली. ग्रामीण भागात होत असलेल्या या अधिवेशनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांचे आणि ग्रामीण भारताचे विविध प्रश्न काँग्रेसच्या अजेंड्यावर आणण्यासाठी साने गुरुजींनी प्रयत्न केले.

“आता उठवू सारे रान,
आता पेटवू सारे रान,
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी,
कामकऱ्यांच्या राज्यासाठी,
लावू पणाला प्राण!”


हे गाणं गुरुजींनी याच काळात आणि याच कारणासाठी लिहीलेलं आहे. भारतातला शेतकरी आज अडचणीत आहे. शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत. शेतीउद्योग प्रचंड जोखमीचा बनलाय. अशावेळी साने गुरुजींच्या या गाण्याने साने गुरुजींच्या धडपडणाऱ्या मुली-मुलांनी प्रेरणा घ्यायला हवी.
अंमळनेर येथील प्रताप मिलच्या कामगारांचा संप साने गुरुजींच्या नेतृत्वाखाली झाला होता. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना म. गांधीजींचे शिष्य असणारे साने गुरुजी गांधीजींच्याच भाषेत म्हणाले, कारखानदारांनी, विश्वस्तवृत्तीने वागले पाहिजे. उत्पादनात कामगारांच्या घामाचाही हिस्सा असतोच. कामगाराला आणि कामगारांच्या घरच्यांना सुखाने जगता येईल एवढा त्यांच्या श्रमाचा मोबदला त्यांना मिळालाच पाहिजे. संपकरी कामगारांसमोर बोलताना साने गुरुजींनी कामगारांच्या घामाची चोरी आणि कारखाना मालकाची लोभी वृत्ती याबाबत टिकास्त्र सोडले होते. हा संप यशस्वी झाला आणि प्रताप मिलच्या कामगारांना न्याय मिळाला.


पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्व जाती-धर्माच्या स्त्री-पुरुषांना प्रवेश मिळावा यासाठी साने गुरुजींनी केलेले प्राणांतिक उपोषण हा त्यांच्या जिवीतकार्यातील महत्वाचा टप्पा आहे. जन्माधिष्ठीत उच्च-निचतेवर आधारित चातुर्वण्य व्यवस्थेतील अन्याय व शोषण हा कुठल्याही संवेदनशील व समताप्रेमी माणसाला अस्वस्थ करणारा विषय. साने गुरुजींसारख्या भावूक आणि प्रेमाच्या शक्तीवर विश्वास असणाऱ्या व्यक्तीने अशा मुद्द्यासाठी आपले प्राण पणाला लावायचा निर्धार करावा हे सुसंगतच मानले पाहिजे. एकेकाळी भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात आधी राजकीय सुधारणा की आधी सामाजिक सुधारणा हा वाद जोरात होता. म. गांधीजींनी स्वातंत्र्यलढ्यात या दोन्ही आघाड्यावरील कार्यक्रम व उपक्रमांची अशी काही सांगड घातली की तो वादच अप्रस्तुत ठरला. साने गुरुजी आणि त्यांचे समाजवादी सहकारी गांधीजींच्याच मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्यलढ्यात कार्यरत होते. बेचाळीसच्या लढ्याची धामधुम कमी होताच आणि भारताचे राजकीय स्वातंत्र्य नजरेच्या टप्प्यात येताच गुरुजींनी सामाजिक समतेच्या लढ्याकडे समाजाचे लक्ष वेधण्यासाठी हा महत्वाचा सत्याग्रह हातात घेतला. यासाठी वर्षभर राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकासह महाराष्ट्राचा दौरा करुन महाराष्ट्राच्या समाजमनाला साद घातली. कलापथकाच्या प्रबोधनामुळे अनेकांची पारंपारिक भूमिका बदलली. काही थोडे जण मात्र अधिक कर्मठ बनले. साने गुरुजींनी पंढरपुरच्या वाळवंटात प्राणांतिक उपोषण सुरु केले.

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म,
भेदाभेद भ्रम अमंगळ!


या संत तुकारामांच्या भुमिकेची आठवण सर्वांना आणि विशेषतः विरोध करणाऱ्या बडव्यांना या सत्याग्रहाने करुन दिली. पंढरीचा विठ्ठल हे बहुजनांचे दैवत. समतेचा पुकारा करणाऱ्या बौद्ध परंपरेशी नाते सांगणारा . देव, आपल काम प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या भक्ताला आपल्या कामातच पांडुरंग भेटेल असं आश्वस्त करणाऱ्या परंपरेतील देव. अशा विठ्ठलाच्या गाभाऱ्यात केवळ जातीच्या आधारावर काही जणांना प्रवेश नाकारणे हे म्हणजे वारकरी परंपरेच्या विरोधातील भूमिका. साने गुरुजींची भूमिका महाराष्ट्राच्या समाजमनाने उचलून धरली. विठ्ठल मंदिराचे दरवाजे सर्व भावा-बहिणींसाठी खुले झाले. देशाचे स्वातंत्र्य वेशीवर आलेले असताना साने गुरुजींचे हे उपोषण नव्या भारतासाठी दिशा दिग्दर्शक होते. येऊ घातलेल्या भारतीय संविधानातील सामाजिक समतेच्या मुल्याच जमीनीवरील ते प्रात्यक्षिक होत. आज साने गुरुजींची आठवण काढताना मनात अनेक प्रश्न आहेत. एकविसाव्या शतकात मंदिरप्रवेशाचा मुद्दा अप्रस्तुत ठरलाय. पण अन्यायकारी व विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या जातीव्यवस्थेचा मुद्दा तर कायम आहे. सरकारे बदलली तरी जातीय अत्याचार सुरुच रहातात. जातीअंताची लढाई आज वेगळ्या टप्प्यावर नेण्याची गरज आहे. जातीय अत्याचार व महिला अत्याचाराच्या घटनातील गुन्हेगारांना वेळेत कठोर शासन करुन कायद्याच्या राज्याचा वचक निर्माण करण्याची गरज वाढलीय. समाजात सामाजिक सलोखा हवाय तो अशा अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी, त्यावर पांघरूण घालण्यासाठी नाही. सर्वांना चांगल्या शिक्षणाचा व सक्षम रोजगाराचा अधिकार मिळावा, उपजिवीकेच्या साधनांच्यापर्यंत सर्वांची पोहोच वाढावी या आघाड्यावर सामाजिक समतेची लढाई ताकदीने लढण्याची गरज आजही तितकीच तीव्र आहे.
साने गुरुजी मातृह्रदयी होते. भावनाशील होते. आणि त्याचबरोबर लढवय्ये सुद्धा होते. साने गुरुजींच्या स्मृतीदिनी

खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे
अस सांगत वैश्विक प्रेमाचा संदेश देणाऱ्या साने गुरुजींची आठवण तर काढुयाच आणि त्याचबरोबर शेतकरी, कामगार आणि शोषित जातीसमुहांच्या न्याय्य अधिकारांसाठी ठोस कृती करणाऱ्या, निर्धाराने संघर्ष करणाऱ्या लढवय्या साने गुरुजींनाही अभिवादन करुया….

लेखसंदर्भःसुभाष वारे
+++भास्कर खंडागळे ,बेलापूर+++
(९८९०८४५५५१ )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here