Human Interest : मुलीला वाचवण्यास गेलेल्या पित्याचा विजेच्या धक्याने मृत्यू

शेडगाव येथील घटना; पंचक्रोशीत शोककळा

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथे मुलीला वाचविण्यास गेलेल्या पित्याचा विजेच्या धक्याने करूण अंत झाला. जणू मुलीवर आलेला काळच त्यांनी स्वतःवर ओढावून घेतला. अशोक आद्रेंंस सोनवणे (वय – ३८), असे या पित्याचे नाव आहे. ही दुर्दैवी घटना गुरुवारी सायंकाळी घडली.

याबाबत स्थानिक नागरिकांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी सायंकाळी शेडगाव परिसरात झिम-झिम पाऊस सुरु होता. यावेळी अशोक सोनवणे यांची मुलगी घराशेजारी असलेल्या गोठ्यालगत उभी असताना मोठ्याने ओरडली. त्यामुळे सोनवणे हे बाहेर गेले व मुलीला विजेचा शॉक बसत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यांनी जिवाच्या आकांताने मुलीला दूर लोटले. परंतु, यावेळी पाय घसरुन पडले व गोठ्यातील खाबांला त्याचा स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला.

दरम्यान, आरडाओरड झाल्याने स्थानिक नागरिकांनी तेथे धाव घेऊन सोनवणे याला लोणी येथिल प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतू उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले होते. अशोक सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, एक मुलगा, आई व तीन भाऊ असा मोठा परिवार असून त्याच्या घरची परिस्थिती हालाकीची आहे. घटनेमुळे पंचक्रोशीत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मयत सोनवणे याच्या कुटुंबाला अर्थिक मदत मिळावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here