Beed : कापूस खरेदीच्या बाबतीत ग्रेडर व जिनिंगकडून शेतकर्‍यांची अडवणूक – सभापती दिनकर कदम

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

बीड –  सध्या कापूस खरेदीच्या बाबतीत शेतकर्‍यांची प्रचंड नाराजी होत आहे. यासाठी काहीजण बाजार समितीच्या नावाने ओरड करत आहेत. मात्र बाजार समितीला विनाकारण दोष दिला जात असून शेतक-यांची ग्रेडर व जिनिंगकडून अडवणूक केली जाते, असा आरोप बाजार समितीचे सभापती दिनकर कदम यांनी केला आहे.
याबाबत स्पष्टीकरण देताना कदम म्हणाले, बाजार समितीवर केवळ जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शेतकर्‍यांचे कापूस विक्रीसाठी फक्त नोंदणी करून घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. नोंदणीनुसार संबंधीत शेतकर्‍याचा कापूस जिनिंगवर गेल्यावर ग्रेडर व जिनिंगवर त्या शेतकर्‍यांना योग्य तो न्याय मिळत नाही. कापूस नोंदणी केल्यानंतर शासनाच्या आदेशानुसार बाजारसमिती संबंधीत शेतकर्‍यांना एस.एम.एस.च्या माध्यमातून कळवते. प्रत्यक्षात मात्र त्या शेतकर्‍याचा कापूस स्वीकारण्यास किंवा मापे करण्यास खरेदीदार संस्था व ग्रेडरकडून दिरंगाई केली जाते व मनमानी केली जाते असे निदर्शनास आले आहे. बाजार समिती आपले काम चोखपणे पार पाडत असताना काहीजण विनाकारण बाजार समितीला दोषी धरत आहेत, असे बाजार समितीचे सभापती दिनकर कदम यांनी म्हटले आहे.
बीड तालुक्यातील शेतकर्‍यांचा कापूस तात्काळ खरेदी करावा व शेतकर्‍यांना पेरणीच्या वेळीच पैसा हातात पडावा यासाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पणन मंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. एवढेच नव्हे तर पावसाळयापूर्वीच शेतकर्‍यांच्या कापसाचे माप व्हावे यासाठी सभापती दिनकर कदम, उपसभापती गणपत डोईफोडे, माजी सभापती अरूण डाके यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र, त्याचवेळी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी उपोषण करू नका, कापूस खरेदी केंद्रे तात्काळ सुरू होतील व ग्रेडरच्याही नियुक्त्या दिल्या जातील. त्यानुसार ग्रेडरच्या नियुक्त्या होऊन कापूस खरेदी केंद्रे सुरू झाली. बाजार समितीने नोंदणी केल्याप्रमाणे जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशानुसार बाजार समितीने शेतकर्‍यांना पूर्व सूचना देऊन एस.एम.एस. (मॅसेज करून) कल्पनाही दिली.
मात्र, संबंधीत ग्रेडरकडून शेतकर्‍यांची अडवणूक केली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. शेतकर्‍यांचे हित पाहणे हे बाजार समितीचे कर्तव्य आहे. कुठल्याही शेतकर्‍यांवर अन्याय होणार नाही याची काळजी व भूमिका बाजार समितीची आहे. त्याबाबतीत बाजार समिती वेळोवेळी पाठपुरावा करत आहे. पण खरेदीदार संस्था (सी.सी.आय.) व पणन महासंघ यांच्याकडून जाणीवपूर्वक शेतकर्‍यांवर अन्याय होतो आहे. संबंधित खरेदीदार संस्था व ग्रेडर यांनी शेतकर्‍यांना सहकार्य करून जास्तीत जास्त कापूस खरेदी करून घ्यावा, असे बाजार समितीचे दिनकर कदम यांनी म्हटले आहे.

7 COMMENTS

  1. You could definitely see your enthusiasm within the paintings you write. The arena hopes for even more passionate writers such as you who are not afraid to mention how they believe. Always go after your heart.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here