Shevgaon : शेतक-यांना कपाशीचा पिक विमा त्वरीत द्या, अन्यथा आंदोलन

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
तालुक्यातील शेतकर्‍यांना कपाशीचा सन २०१९-२० चा पिक विमा त्वरित देण्यात यावा. अन्यथा शेतकरी आंदोलन करतील असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी शेवगाव येथे केले. 
आज शेवगाव तालुक्यातील प्रमुख शेतकर्‍यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. तहसिलदार अर्चना भाकड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जगन्नाथ गावडे, संजय आंधळे, सुरेश चौधरी, आबासाहेब राऊत, खेडकर राजेंद्र, संजय शिंदे, विष्णु दिवटे, माणिक गर्जे, शिवाजीराव औटी, अण्णासाहेब ज-हाड, अशोकराव पातकळ, शंकरराव काटे, बाळासाहेब पाटेकर, गुलाबराव दसपुते आदि प्रमुख उपस्थितीत होते.
पुढे बोलताना काकडे म्हणल्या की, शेवगाव तालुक्यातील बहुतांशी शेतकर्‍यांचे कपाशी हे प्रमुख पिक आहे. कपाशीचे आगार म्हणून तालुक्याची सर्वत्र ओळख आहे. निसर्गाच्या बदलत्या स्वरूपामुळे शेतकरी दरवर्षी पिकांचे विमे भरत असतात. मागील वर्षी परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. संतत धारेमुळे शेतातील पिके सडून जाऊन पिकांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये कपाशीचे देखील मोठे नुकसान होऊन शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला. शासनाने काही जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाई म्हणून कपाशी पिकाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे. परंतु नगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी तालुक्यात पिक विमा अद्यापही शेतकऱ्यांना मिळाला नाही.
चालू वर्षी सुरुवातीलाच पाऊस झाल्याने शेतकर्‍यांची शेतीची कामे वेगात चालू आहेत. जर सदरची पिकविमा रक्कम शेतकऱ्यांना मिळाली तर चालू वर्षी शेतीच्या मशागती करिता तसेच बि-बियाणे, खते आदी गोष्टींकरता शेतकर्‍यांना हातभार लागणार आहे. त्यामुळे शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांची कपाशी पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित वर्ग करावी. अन्यथा शेतकरी आंदोलन करतील, असा इशारा यावेळी काकडे यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here