Shrigonda : पिकअपच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू तर दुचाकीवरील दोघे जखमी

पिकअप चालक फरार

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – भरधाव आलेल्या पिकअपच्या धडकेत एका चिमुकल्याचा मृत्यू झाला तर दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. ही घटना दिल्ली वेष डॉ. कसरे हॉस्पिटल समोर आज शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार भरधाव आलेल्या पिकअपने तब्बल 9 जणांना धडक दिली. या विचित्र अपघातानंतर चालक पिकअपसह फरार झाला.
आयुष जयेश कदम (वय ९), असे या मयत चिमुकल्याचे नाव आहे. तर त्याचे योगेश कदम व शिवराज नंदकुमार ताडे हे दोघे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात पिकअप चालक मारुती छबा म्हेत्रे (रा. शाडूचा मळा) याविरुद्ध ताडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला.

घटनेची माहिती अशी की आज सायंकाळी चारच्या सुमारास दिल्ली वेष येथी डॉ. कसरे हॉस्पिटल समोर म्हेत्रे हे आपल्या स्वतःच्या पिकअपमधून भरधाव येत होते. यावेळी भरधाव गाडी चालवत कदम यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये योगेश कदम जखमी झाले तर आयुष कदम या बालकाचा जबर दुखापतीमुळे हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत मृत्यू झाला. तर शिवराज ताडे यांच्या दुचाकीलाही पिकअपने धडक दिली. यामध्ये त्यांचा हात फॅक्चर झाला.

प्रत्यक्षदर्शी यांच्या म्हणण्यानुसार या म्हेत्रे यांनी पिक अप भरधाव चालवत सुरुवातीला पेट्रोल पंपावरील चौघांना धडक दिली. नंतर काही अंतरावर आणखी चौघांना धडक दिली व शेवटी आणखी एकाला धडक दिली. अन्य लोकांना किरकोळ दुखापत झाली आहे. या सर्व प्रकारानंतर चालक म्हेत्रे पिकअपसह फरार झाला.

दरम्यान, पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. ताडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार म्हेत्रे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करीत आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here