Editorial : भेदाभेद अमंगळ

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

आपल्याकडचा वारकरी संप्रदाय हा खरेतर विद्रोही. संतांनीच जातीभेद निर्मूलनाची मोहीम हाती घेतली होती. त्याकाळच्या सामाजिक दंभावर त्यांनी प्रहार केले. अनेक चालिरित्या धु़डकावून लावल्या. महात्मा फुले यांनी जातीअंताची लढाई सुरू केली. शाहू महाराजांनी ती पुढे नेली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तिला व्यापक केले. डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांनी पुन्हा एकदा जातीअंताच्या लढ्याला सुरुवात केली होती; परंतु त्यांचा खून करण्यात आला. आपल्यावर धार्मिक आणि जातीयतेचा पगडा किती आहे, याची उदाहरणे पदोपदी पाहायला मिळतात. आता काही सेलिब्रिटी शाळेच्या दाखल्यावरून जातीचा उल्लेख काढतात. एका वकील महिलेने आपल्या दाखल्यावरून धर्म हटविण्यासाठी दोन दशके न्यायालयीन लढा दिला. आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाह जोपर्यंत मोठ्या संख्येने होत नाहीत, तोपर्यंत जातीयता आणि धार्मिकतेचा पगडा हटणे शक्य नाही. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांच्या पालख्या पंढरीला निघाल्या असताना इंदूर आणि कोलकत्त्याहून आलेल्या बातम्या सामाजिक दुही किती आहे, याचा प्रत्यय देणा-या आहेत.

बऱ्याचदा मुलांवर आईवडीलच संस्कार करतात, की आपण ब्राह्मण, मराठा किंवा उच्च जातीचे आहोत. आपण श्रेष्ठ आहोत. पराक्रमी, ज्ञानी आहोत. इतर जातीचे तसे नाहीत. म्हणून ते नीच किंवा कमी प्रतीचे आहेत. मुलांना असे शिकविणे सामाजिकदृष्ट्या चूक आहे. खालच्या जातीतील लोकही वरच्या जातीचे लोक आपल्याला कमी समजतात, आपला द्वेष करतात. असे शिकवत असतील, तर उच्च जातीच्या लोकांबद्दल मुलांत एक द्वेषाची भावना तयार होते. त्यामुळे अशा दोन्ही जातींनी ते थांबवायला हवे. जातीजातीत द्वेष निर्माण होईल, असे संस्कार थांबवून  जातीजातीत प्रेम निर्माण केले, तरच या जाती एकत्र येवू शकतील.

पालक बदलायला तयार नसतील, तर आता शालेय वयातच जातीअंताच्या लढ्याचे संस्कार व्हायला हवेत. त्यात शाळा, कॉलेज काहीशी निर्णायक भूमिका घेवू शकतात. अनेक शिक्षण संस्था आपल्या शाळांमध्ये नवीन प्रयोग करत असतात. या प्रयोगात आता जात ही भावना नष्ट करण्याचे प्रयोग व्हायला हवेत. पूर्वी कर्मवीर भाऊराव पाटील त्यांच्या शाळा, कॉलेज आणि वसतिगृहात असे प्रयोग करत असत. सर्व मुलांना एकाच मोठ्या ताटात एकत्र जेवायला बसवणे. आळी पाळीने सगळ्यांना कामे सांगणे. सर्व जातींचे मिक्स ग्रुप बनविणे. त्यामुळे त्याकाळातील अस्पृश्यता नष्ट व्हायला मदत झाली. शाहू महाराज स्वतः खालच्या जातीच्या लोकांच्या हातून चहा पिऊन इतरांपुढे आदर्श ठेवीत.

उच्च-नीचतेची भावना, दुसरा व्यक्ती हा आपल्यापेक्षा वेगळ्या जातीचा आहे. त्याच्या आणि आपल्या नातेवाइकांमध्ये फरक आहे. आपले आपसात विवाह होऊ शकत नाहीत. ही भावना आणि संस्कार पुसून टाकण्याचे प्रयत्न बाल मनावर व्हायला हवेत. विशेषत: उच्च जातीत जन्माला आलेल्या मुलांवर हे संस्कार आग्रहाने व्हायला हवेत. यासाठी काही नवीन प्रयोग शोधून काढावे लागतील. मुलांना आरक्षण, विशेष सवलतींमुळे मुलांच्या मनातील जातीयतेच्या भिती अधिक मजबूत होतात. काही मुलांना पुस्तके, गणवेश दिल्याने ती न मिळालेल्या मुलांमध्ये नकळत जातीयतेचे संस्कार रुजत असतात. समता प्रस्थापित करण्यासाठी आरक्षण आवश्यक असले, तरी ते का आवश्यक आहे, हे मुलांच्या मनात नीट रुजायला हवे.

यासाठी शाळांमध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग व्हायला हवेत. समतेचे शालेय संस्कार मुलांवर करायला हवेत. शाळेतच शिक्षक त्यांचे रेकॉर्ड लिहिण्यासाठी मुलांना जात विचारतात. अशावेळी मुलांना आपली जात कोणती व इतरांची कोणती हे चटकन कळते. आपल्या आणि इतरांच्या जातीचा स्तरदेखील समजतो. यासाठी शिक्षकांनी फक्त पालकांशीच संपर्क करावा, असे सक्त आदेश शिक्षकांना द्यायला हवेत. केरळमध्ये लाखो विद्यार्थ्यांनी आपली जात आणि धर्म हा रकाना रिकामा ठेवणे पसंत केले आहे. हे इतर राज्यांनीही सुरू करायला हवे. तसे ते केले, तर जातीअंताच्या लढ्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडेल. जात, धर्म विरहित समाजाचे शालेय संस्कार मुलांवर करण्यासाठी अशा छोटया-छोट्या उदाहरणातून धडे द्यायला हवेत.

आजच हे सांगण्याची वेळ का आली, तर इंदूरमधील मुस्लिम मुलींना परीक्षेसाठी वेगळे बसविण्यात आले. उत्तर भारतातील काही शाळांमध्ये दलित मुलांना वेगळे गणवेश बनविले जातात. दलित मुलांना स्वच्छतेची कामे सांगितली जातात. त्यांना स्वतंत्रपणे बसविले जाते. त्यामुळे जातीय भेदभाव तीव्र स्वरूप धारण करू शकतात. अशा शाळा आणि या शाळातील कर्मचारीवर्ग यांच्या विरोधात कठोर कार्यवाही व्हायला हवी, तरच जातीय द्वेष आणि भेदभावरहित समाज व्यवस्थेचे शालेय संस्कार मुलांवर रुजतील. राजस्थानमधील एका वसतिगृहात सवर्ण आणि दलित मुलांना जेवण्यासाठीही वेगळे बसविले जात होते. मुलांसाठी भोजनाची ताटेही वेगवेगळी होती. एकीकडे अस्पृश्यता नष्ट झाली असे म्हणायचे आणि अस्पृश्यता मनातून आणि कृतीतूनही जात नाही, असे दाखवायचे, हे योग्य नाही. या वसतिगृहचालकांवर कारवाई करण्यात आली हा भाग वेगळा; परंतु सामाजिक आणि जातीय विषमतेच्या विषवल्ली मुळातून उपटून टाकायला हव्यात.

भारतासारख्या देशातच जात, वर्णभेद आहे, असे नाही, तर अमेरिकेसारख्या प्रगत देशांतही तो आहे. जाॅर्ज फ्लाईड याचा पोलिसाने मान पायात दाबून केलेल्या खुनाच्या घटनेनंतर जगभर जी आंदोलने सुरू आहेत, त्यावरून वर्णभेदही किती पराकोटीचा आहे, हे लक्षात येते. कळत नकळतपणे समाजातील सर्वच घटक काळा गोरा हा भेद करत असतात. त्यामुळे असा भेद शिक्षक करत नाहीत. असे म्हणता येणार नाही. गोरे लोकच सुंदर वाटतात आणि काळे लोक हे कुरूप असतात, असा समज निर्माण केला आहे. त्यामुळे सामान्य लोकदेखील तसेच समजतात. हा समज दूर करायला हवा. काळा रंग हा सुंदर रंग आहे. काळ्या रंगाचे लोकदेखील सुंदर असतात. असेच शालेय संस्कार मुलांवर व्हायला हवेत. असे काही प्रयोग शाळांमध्ये सुरु होणे आवश्यक आहे. जात, धर्मापेक्षा माणूस मोठा आहे, हे बिंबवायला हवे. बारावीची परीक्षा देणाऱ्या इंदूर येथील एका शाळेतील ४० मुस्लिम विद्यार्थिनींना वेगळे बसायला सांगण्यात आले.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच्या नियमांनुसारच असे केले गेले असून, धार्मिक भेदाभेद केला नसल्याचे स्पष्टीकरण अधिकाऱ्यांनी दिले आहे; मात्र ते पटणारे नाही. त्याचे कारण सामाजिक अंतर राखून या मुलींना एकत्रित परीक्षेला बसविले असते, तर वेगळी गोष्ट होती; परंतु ४० मुस्लिम मुलींना वेगळे आणि एका हिंदू मुलीला त्यांच्यापेक्षा दूर अंतरावर बसविणे ही कृती शिक्षक आणि अधिका-यांमध्ये धार्मिकता किती भिनली आहे, हे स्पष्ट करणारी आहे. इस्लामिया करिमिया गर्ल्स हायर सेकंडरी स्कूल चालविणाऱ्या मुस्लिम समाजाच्या धर्मादाय संस्थेने गुरुवारी या वागणुकीबाबत विद्यार्थिनींना पाठिंबा दिला आहे. यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे संबंधित शाळेविरुद्ध याचिका दाखल केली आहे.

सावळ्या व्यक्तींना उद्देशून ‘यू’ या इंग्रजी अक्षरावरून ‘अग्ली’ असा शब्द मुलांना शिकविणाऱ्या दोन शिक्षिकांना बंगाल सरकारने निलंबित केले आहे. बंगाल राज्यातील पूर्व वर्धमान जिल्ह्यातील एका शाळेत हा प्रकार घडला आहे. इंग्रजी अक्षरावरून शब्द आणि समोर दिलेले चित्र समजावताना ‘यू’वरून ‘अग्ली’ असा शब्द आणि सावळ्या रंगाकडे झुकणाऱ्या मुलाचे चित्र असल्याचे संबंधित पुस्तकात प्रसिद्ध करण्यात आले आहे. शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी घडलेल्या घटनेबद्दल स्पष्टीकरण दिले. शिक्षण विभागाने नेमून दिलेल्या अभ्यासक्रमाचे हे पुस्तक नसून, हे शाळेने स्वत:च विद्यार्थ्यांना नेमून दिले आहे. विद्यार्थ्यांच्या मनात कुठलीही पूर्वग्रहदूषित मते बिंबविणाऱ्या कृती खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशारा बंगालच्या शिक्षणमंत्र्यांनी दिला असला, तरी तेवढी तसदी मध्य प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांनी घेतलेली नाही.

स्थानिक महापालिकेच्या शाळेत शिकविणाऱ्या या दोन शिक्षिका असून, त्यांच्या कृतीबाबत तातडीने निर्णय घेण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली आहे. अधिकाधिक कडक शासन त्यांना लवकरच दिले जाईल, असेही चॅटर्जी यांनी सांगितले. टाळेबंदीमुळे सध्या शाळा बंद असली, तरी एका विद्यार्थ्याला वडील घरी शिकवत असताना त्यांना संबंधित पुस्तकात सावळ्या रंगाच्या मुलाचे चित्र आणि त्यासमोरील ‘यू’ अक्षरावरून ‘अग्ली’ असा शब्द असल्याचे दिसून आले. त्यांनी इतर पालकांनाही याबाबत सांगितल्यानंतर शिक्षण विभागाला याविषयी माहिती देण्यात आली. त्यानंतर ही कारवाई झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here