Shrigonda : नगरपालिकेच्या फुटलेल्या पाईपलाईनचा भर उन्हाळ्यात नगरसेवकांना फायदा – टिळक भोस

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

श्रीगोंदा – श्रीगोंदा शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून ५६ कोटी रुपये खर्च करून चिंचणी धरणावरून पाईपलाईन करण्यात आली. मात्र गेली दोन महिन्यांपासून शहरानजीक आनंदकर मळ्याजवळ ती पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. तरीही नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची डोळेझाक होताना दिसत आहे. यातून भर उन्हाळ्यामध्ये पाईपलाईन फुटल्याचा फायदा स्थानिक नगरसेवकांना होत असल्यामुळे पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी दिरंगाई केली जात असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी केला आहे.

श्रीगोंदा शहराला स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा यासाठी राज्याचे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या माध्यमातून नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी लाखो रुपयाचा निधी श्रीगोंदा नगरपालिकेला मिळाला. त्यातून घोड धरणावरून श्रीगोंदा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईन करण्यात आली. त्या पाईपलाईनचे फिल्टर हाउस शहरानजीक आनंदकर मळा येथे आहे.

त्या फिल्टर पासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर ती पाईपलाईन फुटली असून त्याठिकाणी स्थानिक नगरसेवकांच्या शेतजमिनी असल्यामुळे  या पाण्याचा फायदा नगरसेवकांच्या शेतीसाठी होत असल्याचे निदर्शनास आले. कदाचित यामुळेच ती पाईपलाईन दुरुस्त होण्यास दिरंगाई होताना दिसत आहे. त्यामुळे श्रीगोंदा नगरपालिकेचे नगरसेवक चोर तर चोर आणि वर शिरजोर होताना दिसत आहे. त्यामुळे लवकरात लवकर ती पाईपलाईन दुरुस्त करून श्रीगोंदा शहराला पूर्ण दाबाने सर्व भागात पाणीपुरवठा करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी केली आहे.

पाईपलाईन फुटल्याचे कालच समजले – भागवत

श्रीगोंदा शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन आनंदकर मळ्याच्या फिल्टर हाउसजवळ फुटल्याचे पत्र काही नगरसेवकांनी दिले असून येत्या मंगळवार पर्यंत ती पाईपलाईन दुरुस्त केली जाईल अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे भागवत यांनी यावेळी दिली आहे.

दोन महिने काय करत होते? टिळक भोस

गेल्या दोन महिन्यापूर्वी याठिकाणी पाईपलाईन फुटल्याचे आमच्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यानी पाहिले असून याबाबत नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना कल्पनाही दिली होती. मध्यंतरीच्या काळात म्हतार पिंप्री येथे पाईपलाईन फुटली असता ती दुरुस्त करण्यात आली होती मात्र फिल्टर हाउसजवळची पाईपलाईन फुटलेली असताना दोन महिने नगरपालिकेने कोणतीही कारवाई का केली नाही? यातून नगरपालिकेचे मोठे गौडबंगाल दिसून येत आहे असे टिळक भोस यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here