प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

राहाता शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली असून रविवारी सांंयकाळी पुन्हा दोन जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह सापडल्याने रहातेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. आलेल्या अहवालानुसार एक 13 वर्षीय मुलगी आढळली असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. तर दुसरा रुग्ण हा राहात्यातील त्रिशूल नगर परिसरातील आहे.
प्रशासनाने तातडीने या दोघांच्या घरी जाऊन त्यांच्या संपर्कातील 21 जणांची यादी सुरू केली असून त्यांच्या कुटुंबियांना शिर्डी येथील केअर सेंटर मध्ये नेऊन त्यांची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन करून त्यांची स्वॅब नगर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाण्याची शक्यता आहे. शहरात आढळलेल्या कोरोना ग्रस्त रुग्णांची संख्या आता आठ झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान आज झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात असलेल्या अनेकांचे धाबे दणाणून गेले आहे. राहाता शहरात आता नागरिकांनी सतर्क राहणे व कोरोना विषयी सर्व नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा कोरोनाचे पाय राहाता शहरात पसरण्यास वेळ लागणार नाही. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाने सांगितलेल्या सूचनांप्रमाणे आरोग्य विषयक सर्व उपाय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन प्रशासन व नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.