Editorial : सत्य स्वीकारा

राष्ट्र सह्याद्री – 15 जून

देशात दररोज दहा हजारांहून अधिक रुग्ण सापडत असताना कोरोनाचा समूह संसर्ग नसल्याचे केंद्र सरकार आणि भारतीय वैद्यक संशोधन परिषद गळा काढून सांगत आहेत; परंतु त्यावर कुणाचाच विश्वास नाही. महाराष्ट्र आणि गुजरात सरकार कोरोनामुळे झालेले मृत्यू दडवून ठेवत आहेत, चाचण्यांचे आणि मृत्यूंचे आकडेही चुकीचे दिले जात आहेत, असा आरोप दोन्ही काँग्रेस आणि भाजप करीत असताना आता परदेशातील तज्ज्ञही असाच आरोप करायला लागले आहेत. एवढेच नव्हे, तर रुग्णांची संख्या वाढत असताना भारतात चाचण्यांची संख्या कमी का केली, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केला. कोरोनाबाबतच्या उपचाराबाबत हलगर्जीपणा केला जात असल्याचा ठपका सर्वोच्च न्यायालयाने ठेवला आहे. 

दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि अहमदाबादमध्ये रोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दिवसाला दहा हजारांपेक्षा जास्त रुग्ण सापडत असताना चाचण्यांची संख्या कमी का केली जात आहे ? चाचण्या न करणे हा पर्याय नाही. चाचण्या वाढवणे हे राज्यांचे कर्तव्य आहे, जेणेकरून लोकांना राज्यात नेमकी काय परिस्थिती आहे, हे समजेल असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. कोरोनाच्या संसर्गाने जगभरात थैमान घातले आहे. सर्वंच देश आपल्या परीने कोरोनाच्या संसर्गावर मात करण्याचे प्रयत्न करत आहेत. कोरोनाच्या या लढाईत अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठातील शास्त्रज्ञ स्टीव हँक यांनी भारतासह सात देशांना सडलेले सफरचंद म्हटले आहे. हँक यांनी भारत सरकारवरही टीका केली आहे.

राजकीय टीकेकडे एकवेळ दुर्लक्ष करता येते; परंतु शास्त्रज्ञ जेव्हा टीका करतात, तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. प्रा. स्टीव हँक यांनी ट्विटरवर भारतासह व्हेनेझुएला, इजिप्त, सीरिया, येमेन, तुर्की आणि चीनवर टीका केली आहे. हे पाचही कोरोना संसर्गाच्या डेटाबाबत ‘सडलेले सफरचंद’ असल्याची टीका त्यांनी केली आहे. हे देश कोरोनाशी संबंधित आकडेवारी, माहिती देत नाहीत अथवा संशयित आकडेवारी देत आहेत. भारतात फार कमी प्रमाणावर कोरोनाची चाचणी होत असून इटलीसारखी परिस्थिती उद्भवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. याआधीदेखील हँक यांनी भारत कोरोनाविरोधात करत असलेल्या उपाययोजनांवरही त्यांनी टीका केली होती. टाळेबंदी उठवल्यानंतर आता  कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. सरकार मात्र रुग्णसंख्या दुप्प्ट होण्याच्या दिवसांत कशी वाढ होत आहे, असे सांगून पाठ थोपटून घेत असताना दुसरीकडे अवघ्या दहा दिवसांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत एक लाखांनी वाढ झाली, याकडे मात्र गांभीर्याने पाहत नाही.

देशात कोरोना संक्रमण तेजीने फैलावत आहे. अनेक संक्रमित रुग्णांमध्ये संक्रमण नेमके कोणत्या स्रोताद्वारे पोहचले हे सांगणेही आता कठीण झाले आहे. असे असताना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) च्या सीरो सर्व्हेनुसार, देशात अजूनही समूह संसर्ग अर्थात कम्युनिटी ट्रान्समिशन झालेले नाही; परंतु त्यावर कुणाचाही विश्वास नाही. दिल्ली सरकारने अगोदरच समूह संसर्ग झाला असल्याचे सांगितले होते; परंतु केंद्र सरकार व आयसीएमआर ते मान्य करायला तयार नाही. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार आयसीएमआरच्या सर्व्हेत देशाची सद्य स्थिती स्पष्ट होत नाही. सरकार सत्य परिस्थितीचा स्वीकार करायला तयार नाही, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे. काही तज्ज्ञांनीच आयसीएमआरच्या आकडेवारीचा आधार घेऊन देशात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या किमान ९७ लाख असावी, असा अंदाज व्यक्त केला आहे.

काहींना कोरोना होऊनही त्यांच्या ते लक्षात आले नाही. लक्षणेही दिसली नाहीत. प्रतिकाशक्तीच्या जोरावर त्यांनी कोरोनावर मात केली, अशी बरीच उदाहरणे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. आयएमसीआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी सीरोचा सर्व्हे रिपोर्ट जाहीर केला. देशात कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा ट्रेन्ड जाणून घेण्यासाठी सीरो सर्व्हे करण्यात आला होता. ६५ जिल्ह्यांत २६ हजार चारशे लोकांवर करण्यात आलेल्या या सर्व्हेत एकूण ०.७३ टक्के लोकांना कोरोना संक्रमणाने ग्रासल्याचे स्पष्ट झाले; परंतु तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार आयसीएमआरचे सर्वेक्षणच चुकीच्या पद्धतीने झाले आहे. वायरोलॉजी, सार्वजनिक आरोग्य आणि औषध विभागातील तज्ज्ञांचे म्हणणे मात्र वेगळेच आहे. ‘एम्स‘च्या संचालकपदाची जबाबदारी हाताळलेल्या डॉ. एम सी मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, देशाच्या मोठ्या भागात कोरोनाचा समूह संसर्ग झालेला आहे. मोठ्या शहरांतून पलायन आणि टाळेबंदीमध्ये सूट दिल्याने कोरोना आणखी वेगाने फैलावतो आहे. जिथे एकही रुग्ण नव्हता, अशा ठिकाणीही आता हा आजार पोहचलेला आहे. सरकारने सत्य स्वीकारण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना सतर्क केले जाऊ शकेल, असे मिश्रा यांनी म्हटले आहे.

प्रसिद्ध वायरोलॉजिस्ट शाहिद जमी यांच्या म्हणण्यानुसार, भारत खूप अगोदरपासूनच समूह संसर्गाच्या स्थितीत पोहचलेला आहे; पण सरकार हे मान्य करायला तयार नाही. आयसीएमआरने आपल्या अभ्यासात म्हटल्याप्रमाणे, कोरोनाबाधित आढळलेले ४० टक्के रुग्ण ना परदेशात यात्रेवर गेले होते ना ते अन्य कोणत्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आले होते. तर याला समूह संसर्ग म्हणायचे नाही तर काय म्हणायचे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. प्रसिद्ध सर्जन डॉ. अरविंद कुमार यांच्या म्हणण्यानुसार, आयसीएमआरचे म्हणणे मान्यही केले, तरी दिल्ली, अहमदाबाद आणि मुंबईसारख्या ठिकाणी समूह संसर्ग फैलावला आहे, हे सत्य नाकारता येणार नाही.

भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) रक्तद्रव तपासणी सर्वेक्षणात मात्र देशात सामूहिक संक्रमण सुरू नसल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला असून त्यावर या वैद्यकीय तज्ज्ञांनी टीका केली आहे. दरम्यान, देशात कोरोनाचे नकारात्मक विक्रम होत असून एकूण रुग्णसंख्येचा तीन लाखांचा आकडा पार झाला आहे. आता रुग्णसंख्या आणि बाधितांच्या मृत्यूत वाढ होत आहे. ‘आयसीएमआर’चे प्रमुख बलराम भार्गव यांनी पुराव्यादाखल रक्तद्रव पाहणीचे निष्कर्षही सांगितले होते. आयसीएमआर’चे माजी प्रमुख डॉ. एम. सी. मिश्रा यांनी मात्र देशात विषाणूचे समूह संक्रमण सुरू आहे याबाबत कोणतीही शंका नाही, असे स्पष्ट केले.

‘आयसीएमआर’च्या रक्तद्रव पाहणीच्या निकालांबाबत त्यांनी सांगितले, की २६ हजार चारशे हा नमुना अगदीच अपुरा आहे. आयसीएमआर’च्या मते ४० टक्के लोकांना सार्स सीओव्ही-२ ची लागण कुठलाही इतिहास नसताना झाली आहे. मग हे सामूहिक संक्रमण नाही तर काय आहे, अशी विचारणा तज्ज्ञांनी केली आहे. भारत हा मोठा देश आहे आणि तेथे विषाणू वेगवेगळ्या प्रमाणात पसरत आहे. प्रतिपिंड तयार होण्यास दोन आठवडे लागतात. त्यामुळे एप्रिलमध्ये जर ‘आयसीएमआर’ने पाहणी केली असेल तर सामूहिक संक्रमण सुरू झाले नाही हे त्यांचे म्हणणे चुकीचे आहे. निती आयोगाचे सदस्य व्ही.के. पॉल यांनी म्हटले आहे, की ३० एप्रिलला पाहणी करण्यात आली. मेच्या तिसऱ्या आठवडयात पाहणी करण्यात आली. त्यात प्रतिपिंड तयार होण्यास १५ दिवस लागतात असे मानले, तरी त्यातून ३० एप्रिलची स्थिती स्पष्ट झाली आहे.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर सोशल मेडिसीन अँड कम्युनिटी हेल्थ’ या संस्थेचे डॉ. विकास बाजपेयी यांच्या मते, जेव्हा रुग्णाचा संपर्क कुणाशीच आला नसताना तो बाधित होतो, तेव्हा त्याला समूहसंक्रमण म्हणतात. ‘आयसीएमआर’ने यात प्रतिबंधात्मक क्षेत्रात पाहणी केलेली नाही. विषाणूचा प्रसार सगळीकडे सारखा नसतो. विषाणू जिथे सक्रिय आहे, ती ठिकाणेच पाहणीतून वगळली तर त्याला अर्थ नाही.फोर्टिस एस्कॉर्टसचे डॉ. रविशेखर झा यांनी समूह संक्रमण सुरू झाल्याचे स्पष्ट केले. दिल्ली सरकारने संपर्क शोधणे सोडून दिले आहे, त्यामुळे त्यांना ती बाब समजली नाही आणि ते मान्य करण्यासही तयार नाही. धारावी आणि दिल्लीत हे समूह संक्रमण दिसून आले आहे. ‘आयसीएमआर’ने चुकीच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली, त्यामुळे त्यांना समूह संक्रमण समजलेले नाही. एवढे तज्ज्ञ जर कोरोनाचे समूह संक्रमण झाले असे म्हणत असतील, आयसीएमआरनेही सरकारधार्जिणेपणा सोडून सरकारला वस्तुस्थितीची जाणीव करून द्यायला हवी. सरकारने ही अन्य तज्ज्ञांचा सल्ला घेऊन कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी आपली वैद्यकनीती बदलायला हवी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here