!!भास्करायण :२४!! : इथेनॉल उद्योग : साखर उद्योगाचा तारक!

1
भास्कर खंडागळे, बेलापूर (९८९०८४५५५१ )

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

देशातील साखर कारखानदारी हा प्रमुख कृषि प्रक्रिया उद्योग मानला जातो. गेल्या काही वर्षापासून साखर कारखानदारीचे क्षेत्र अनेक समस्यांनी व्यापले. भविष्यात साखर कारखानदारीपुढील संकटाची मालिका खंडीत होण्याची चिन्हे नाहीत. या समस्यांनी साखर कारखानदारीला आर्थिक संकटात ढकलले आहे. याचा थेट परिणाम साखर कारखानदारीवर अवलंबून असणार्‍या प्रत्येक घटकांवर होणार आहे. तसा तो ग्रामीण भागाच्या विकासावर होणार आहे.
अशा संकटसमयी ‘इथेनॉल निर्मिती आणि त्याचा इंधन म्हणून वापर’ हा साखर उद्योगासाठी आशेचा किरण ठरणार आहे. देशात 205 आसवनी प्रकल्प कार्यान्वित असून यापैकी तब्बल 118 आसवनी प्रकल्प साखर कारखान्याशी संलग्न आहेत. साखर कारखान्यांशी निगडीत 118 आसवनी प्रकल्पांपैकी 70 आसवनी प्रकल्पाद्वारे इथेनॉलची निर्मिती प्रत्यक्षात सुरु असून त्याद्वारे दरवर्षी 550 दशलक्ष लिटर्स एवढ्या इथेनॉलची निर्मिती केली जात आहे.
भारत सरकारने सन 2003 मध्ये ‘राष्ट्रीय इथेनॉल कार्यक्रम’ हाती घेतला. वाहनाद्वारे निर्माण होणार्‍या प्रदुषणास आळा घालणे, परकीय चलन बचत, इंधनाबाबत स्वावलंबन, इथेनॉल निर्मितीसाठी सहजासहजी उपलब्ध शेतीमधील चारा पिकांचा वापर आणि याद्वारे स्थानिक शेतकरी व कृषि क्षेत्राला चालना अशी पंचसुत्री या कार्यक्रमासाठी ठरविण्यात आली. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून वाहनांच्या इंधनामध्ये 5 टक्के इथेनॉल मिश्रणासाठी परवानगी देण्याचे धोरण आखण्यात आले. या धोरणाचा अनुकूल परिणामही दिसून येऊ लागले. दरम्यान केंद्रात सत्तांतर झाले आणि इथेनॉलसाठी सन 2003 साली असलेले धोरण मधल्या कालखंडात स्थगित करण्यात आले.
अमेरिकेसारख्या अतिप्रगत राष्ट्राने प र्यायी इंधन म्हणून इथेनॉलला प्राधान्य दिले आहे. ब्राझिलमध्ये तर ही प्रक्रिया 25 वर्षापूर्वीच सुरु झाली असून जवळपास 40 टक्के वाहने इथेनॉलवर अवलंबून आहेत. भारतासारख्या शेतीवर अर्थव्यवस्था अवलंबून असणार्‍या विकसनशिल देशानेही इथेनॉलला पर्यायी इंधन म्हणून विकास करण्याची आवश्यकता आहे. यातून परकीय चलन वाचणार तर आहेत; शिवाय ग्रामीण भागातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे आर्थिक चित्रही बदलण्याची कुवत इथेनॉलमध्ये आहे. वाहनांमुळे होणार्‍या प्रदुषणातही कमालीची घट होवून पर्यावरणाचे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होणार आहे.
इथेनॉलचा पर्यायी इंधन म्हणून स्विकार केल्यास केवळ ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखानेच नाही; तर कोरडवाहू शेती करणारे शेतकरीही विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील. याचे प्रमुख कारण म्हणजे केवळ ऊसाच्या रसापासूनच नव्हे, तर ज्वारी, मका यासारख्या शेती उत्पादनापासून इथेनॉल तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. इथेनॉलचा वापर पर्यायी इंधन म्हणून झाल्यास त्यापासून मिळणार्‍या उत्पन्नातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार मिळणार आहे. यादृष्टीने शासनाने इथेनॉल निर्मितीला चालना देऊन प्राथमिक  अवस्थेत 5 टक्क्यावरुन 10 टक्क्यापर्यंत इथेनॉलमिश्रीत पेट्रोलची सक्ती करणारे धोरण आखण्याची आवश्यकता आहे.
डॉ.सुमित्रा चौधरी यांच्या समितीने पेट्रोलमध्ये पाच टक्के इथेनॉल मिश्रण सक्तीचे करावे तसेच इथेनॉलचे दर हे कच्च्या तेलाचे प्रक्रिया करुन रुपांतरीत पेट्रोलच्या दराशी निगडीत असावेत अशी अत्यंत रास्त शिफारस केली आहे. सद्य:स्थिती अशी आहे की, इथेनॉलपेक्षा अल्कोहोलला बाजारपेठेत जास्त भाव मिळतो. त्यामुळे इथेनॉल उत्पादन जवळपास थांबलेले आहे. अल्कोहोलपासून इथेनॉलनिर्मिती करण्याचा उत्पादन खर्च व अन्य बाबी ध्यानात घेतल्या तर इथेनॉलपेक्षा सरळ अल्कोहोल विकणे परवडते. इथेनॉलनिर्मितीला शासनाने प्रोत्साहन देण्याची सदर समितीच्या शिफारशी त्वरित स्विकाराव्यात म्हणजे इथेनॉल निर्मितीचा मार्ग खुल होईल.
वाहनांच्या पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याची टक्केवारी टप्प्याटप्याने वाढविण्याचे धोरण स्विकारावे आणि इथेनॉल पेट्रोलच्या दराशी निगडीत भाव देेणे अशा निर्णयामुळे शेतकर्‍यांचाच थेट फायदा होणार आहे.  वास्तविक इथेनॉल हे पेट्रोलची जागा घेणारे आहे. जेवढे इथेनॉल वापरले जाईल तेवढी पेट्रोलची बचत होणार आहे. या बचतीमुळे परकीय चलन मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे. याचे भान धोरण आखतांना ठेवणे गरजेचे आहे. यादृष्टीने इथेनॉलचे दर हे पेट्रोलच्या दराशी निगडीत ठेवले पाहिजेत. इथेनॉलला पेट्रोलशी निगडीत भाव मिळाला तर, ऊस उत्पादक आणि ज्वारी, मका, कडवळ पिकविणार्‍या शेतकर्‍यांचे कल्याण होईल.
‘इथेनॉल’मध्ये क्रांती करण्याची क्षमता आहे. ही क्षमता शासनाने वेळीच ओळखण्याची आवश्यकता आहे. केवळ इथेनॉलचा पर्यायी इंधन म्हणून स्विकार करुन भागणार नाही; तर इथेनॉल हे पर्यावरणपुरक इंधन असल्याने त्याची कायमस्वरुपी मागणी राहणार आहे. त्यामुळे इथेनॉलला शाश्‍वत भाव मिळणे ही तेवढीच गरज आहे. ही गरज ध्यानात घेऊन केंद्र शासनाने धोरणे आखल्यास ग्रामिण अर्थव्यवस्थेला वेगळे वळण मिळेल.अशात-हेने इथेनॉलचे धोरण साखर उद्योगाला तारक ठरेल.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here