Agriculture: बीड जिल्ह्यातील पाच लाख शेतकरी पीक विम्यापासून वंचित..!

0

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

शितलकुमार जाधव । राष्ट्र सह्याद्री

बीड
बीड जिल्ह्यातील 4 लाख 98 हजार शेतकऱ्यांना कापूस आणि तूर पिकाचा विमा अद्यापही मिळाला नसून हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे याबाबत शासनाच्या वतीने तात्काळ दखल घ्यावी व शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळवून देण्यात यावा अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका निवेदनाद्वारे केली आहे

Advt

बीड जिल्ह्यातील 6 लाख 40 हजार शेतकऱ्यांनी कापूस व तुरीचा विमा गेल्या वर्षी खरीप हंगामासाठी भरला होता. परंतु यातील फक्त 1 लाख 41 हजार शेतकर्‍यांना कापूस व तूर पीक विमा देण्यात आला आहे. उर्वरित चार लाख 98 हजार शेतकऱ्यांना कापूस व तुरीचा विमा नाकारण्यात आला आहे. हा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय आहे. मागील वर्षी जिल्ह्यात उशिरा पाऊस झाला होता त्यामुळे शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली होती. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

या दरम्यान बीड जिल्ह्यात गारपीटही ही झाली होती त्यामुळे कापूस तूर व सोयाबीन या पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस झाला होता. बीड जिल्ह्यातील विशेषता बीड तालुक्यातील कापूस व तुरीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. बीड जिल्ह्यात पावसाच्या अनियमितपणामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असतानाही कापूस व तूर पिकाला विमा कंपनीकडून विमा नाकारण्यात आला, विमा कंपनीने बीड जिल्ह्यातील काही महसूल मंडळांनाच विमा दिला असून प्रत्यक्षात सर्व महसूल मंडळातील कापूस व तूर या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Advt

याबाबत बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस व तुरीचा गतवर्षीचा विमा देण्यात यावा. याबाबत योग्य ती कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषीमंत्री दादा भुसे, कृषी आयुक्त पुणे व विभागीय आयुक्त महसूल औरंगाबाद यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here