गेल्या 4 दिवसात तिस-या वाघाचा मृत्यू

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जंगलात आणखी दोन वाघांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत तळ्याकाठच्या जंगलात आढळले आहे. सीताराम पेठ गावालगतच्या त्या तळ्याकाठी चार दिवसांपूर्वीच एका संपूर्ण वाढीच्या वाघिणीचा मृत्यू झाला होता. सोबतच या तळ्याकाठच्या परिसरातील काही माकडांचाही मृत्यू झाल्याचे समजत आहे. त्यामुळे या तळ्याचे पाणी दुषित झाले आहे का कुणी त्यात विष कालवले आहे याचा तपास वनअधिकारी करीत आहेत.
दरम्यान आज सापडलेल्या दोन वाघांच्या मृतदेहावरून प्रौढ होण्याच्या मार्गावर असलेलया दीड वर्षाच्या बछड्यांचे हे मृतदेह असल्याचा अंदाज आहे. आठवडाभरात एकाच भागात तीन वाघ मेल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सीताराम पेठ गावात शेतजमिनी आहे. त्यामुळे हेतूपरस्पर वाघांचा त्रास नको म्हणून कोणी तळ्याचे पाणी खराब करीत आहे का याबाबत वनअधिकारी तपास करीत आहेत.
सध्या तरी तळ्यातील पाण्याचे नमुने घेतले आहेत. हे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून वाघांच्या मृत्यूचे अन्य काही कारण आहे का याचाही कसून तपास सुरू करण्यात आला आहे.