Karjat : यंदा स्कूल चले हम १५ जूनला नाहीच… विद्यार्थ्यांचा हिरमोड

2

अनेक वर्षांची परंपरा खंडित

डॉ अफरोजखान पठाण | राष्ट्र सह्याद्री दि १५

कर्जत : १५ जून म्हटलं की शैक्षणिक कामकाजाचा अत्यंत महत्वाचा दिवस. शैक्षणिकदृष्टया या दिवशी शालेय कामकाज उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्टीनंतर सुरू होत असते. मात्र यंदा कोरोना महामारी या दिवसाला सुद्धा ग्रहण लागले. कोरोना पार्श्वभूमीवर राज्य सरकार, जिल्हा प्रशासन यांच्या आदेशानुसार खबरदारीचा उपाय म्हणून शैक्षणिक संस्थानी शालेय कामकाज सुरू ठेवले नाही. या कारणांमुळे विद्यार्थ्यांचा सुद्धा चांगलाच हिरमोड झाला आहे.
उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्टीनंतर चालू शैक्षणिक धोरणानुसार १५ जून या तारखेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. १५ जूनला प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात प्रत्यक्ष शालेय कामकाजाचे काम सुरू होत असते. या दिवसासाठी सर्वच शैक्षणिक संस्था आपल्या नूतन वर्गातील विद्यार्थी वर्गाच्या प्रवेशासाठी आणि स्वागतासाठी विविध फंडे अमलांत आणत असतात. ढोल-ताशा पथक पासून ते गुलाबपुष्प वृष्टी करणे, नूतन वर्गाला कार्टून्स आणि विविध रंगीबेरंगी पताका लावत वर्ग सजविणे अशा विविध कल्पना राबवित विद्यार्थ्याचे वेलकम करीत असतात. मात्र, यंदाच्या सन २०२०-२१ शैक्षणिक वर्षात १५ जूनला ही परंपरा खंडित झाली आहे.
कोरोना महामारीमुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षास आणि प्रत्यक्ष अध्यापन कामकाजास कधी सुरुवात होईल हे सांगणे कठीण बनले आहे. विद्यार्थी या दिवसाची मोठ्या आनंदाने वाट पाहत असतात की, नवीन वर्ग, नवीन शिक्षक यासह नवी कोरे शालेय पुस्तक, वह्या आणि दफ्तर याचे अप्रूप असते. मात्र यंदा त्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. आजच्या दिवशी सडा रांगोळी रेखाटत शालेय परिसर देखणा करणारे चित्र बदलले गेले असून त्याजागी ओसाड आणि निर्जन शाळा परिसर पहावयास मिळत होता.
शाळा नाही मन लागत नाही – जिया पठाण
कोरोनामुळे मार्च महिन्यापासून शाळा बंद करण्यात आली आहे. मागील वर्षी वार्षिक परीक्षा सुद्धा झाली नाही. त्यामुळे मनाला वाईट वाटते. अनेक दिवसांपासून शालेय मैत्रिणी, आमचे शिक्षक यांची भेट सुद्धा झाली नाही याची खंत वाटते. लवकरच कोरोनापासून जगाची आणि भारताची मुक्तता व्हावी अशी प्रार्थना करते. नवीन वर्ग आणि नवीन पुस्तके हातात घेण्याची तीव्र इच्छा आहे.
प्रत्यक्ष अध्यापन बंद असले तरी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शाळा कटीबद्ध – मुख्याध्यापक उद्धव थोरात
कोरोनामुळे शालेय कामकाज आणि शाळा राज्य सरकार, जिल्हा प्रशासन यांच्या आदेशानुसार पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. मात्र विद्यार्थ्याचे शालेय नुकसान होऊ नये यासाठी राज्य सरकार आणि शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनानुसार ऑनलाईन अभ्यासक्रम उपक्रम हाती घेत त्यावर परीक्षा पार पाडले जात आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सर्व शिक्षक आणि शालेय संस्था कटीबद्ध आहेत.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here