Human interest : बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तीन वर्षाच्या चिमुकल्याची मृत्यूशी यशस्वी झूंज

बहिणीने बिबट्याच्या दाढेतून भावाला ओढून काढले होते; बिबट्याचा दात डोक्यात घुसल्याने झाला होता गंभीर जखमी; तालुक्यातील वाघोली परिसरातील घटना; अन्य दोन वस्त्यांवरील शेळ्याही केल्या फस्त; कुत्र्यालाही नेले फरटत; दोन दिवसांपासून परिसरात बिबट्याची दहशत; अखेर वनअधिका-यांच्या मदतीने पिंजरा लावला

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

शेवगाव : बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शंभू केसकट या तिन वर्षाच्या चिमुकल्याने मृत्यूशी यशस्वी झूंज दिली. बिबट्याचा दात डोक्यात घुसल्याने चिमुकल्यावर केलेल्या शस्त्रक्रियेनंतर आज सायंकाळी शंभू शुद्धीवर आला. शंभूच्या मोठ्या बहिणीने स्वतःचा जीव धोक्यात घालत आपल्या या चिमुकल्या भावाला बिबट्याच्या दाढेतून ओढून काढले. पण गंभीर जखमी झालेला शंभू बचावतो का नाही याची धाकधुक होती. तिच्या प्रयत्नांना देवाने निष्फळ ठरू दिले नाही. 

तालुक्यातील वाघोलीत बिबट्याने पवार शेळके वस्ती परीसरातील संतोष केसभट यांच्या घरासमोरील अंगणात खेळत असलेल्या शंभू संतोष केसभट या तीन वर्षांच्या मुलावर काल शनिवारी रात्री हल्ला चढवला. यावेळी शेजारी असलेल्या मोठ्या बहिणीने मोठ्या चपळाईने बिबट्याच्या तोंडातून आपल्या भावाला बचावले. बिबट्याने शंभूला जबड्यात धरून ओढले त्याच क्षणी बहिणीणे शंभूचा एक पाय ओढून धरला.

या झटापटीत पत्र्याच्या पडवीला धक्का लागून आवाज झाल्याने संतोष केसभट हे धावत बाहेर आले. त्यांनी बिबट्याला हाकलले. शंभूच्या बहिणीने हिमतीने अक्षरश: त्याला बिबट्याच्या दाढेतून ओढून काढले. या दरम्यान बिबट्याच्या हल्यात मुलाचा एक कान तुटला. तसेच डोक्यावर बिबट्याचा दात घुसल्याने शंभू गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने नगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. आज रविवारी मुलाचे ऑपरेशन करण्यात आले. सायंकाळी शंभू शुध्दीवर आला.
तर रविवारी दुपारी या बिबट्याने याच परिसरात दातीर वस्तीवर मेंढपाळाच्या शेळ्यांवर हल्ला करून आपले शिकार बनवले. एक किलोमीटरच्या अंतरावर दुसरा हल्ला करून बिबट्याने मेंढपाळ नारायण दातीर व सहकारी घोंगडे यांच्या कळपावर दातीर वस्ती शेजारी बिबट्याने हल्ला करून एका शेळीला आपले शिकार बनवले आहे. मेंढपाळ यांनी लावलेल्या जाळीमुळे बिबट्याला शेळी ओढून नेता आली नाही. परंतु बाहेर असलेल्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून फरपट नेले.
बिबट्याच्या वावराने व दोन ठिकाणी झालेल्या हल्यात बिबट्याने वाघोली परीसरात चांगलीच दहशत निर्माण केली आहे. दरम्यान, रविवारी युवा नेते उमेश भालसिंग, सरपंच बाबासाहेब गाडगे यांनी वनविभागाच्या अधिकारी यांच्याशी संपर्क करून परिसरात पिंजरा लावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here