राजू शेट्टींनी केली बारामातीतील ‘विकासा’ची सफर..!

विशेष प्रतिनिधी । बारामती

बारामती: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांना आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीतील विकसीत शेतीची सफर घडवली. स्वताः पवार यांनी त्यांना आपल्या गाडीतून बारामती पंचक्रोशीतील शेतीसंदर्भात सुरु असलेल्या विविध प्रयोगांबाबत सविस्तर माहिती दिली. या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली. स्वताः सुप्रिया सुळे, सतीश काकडे, राजेंद्र ढवाण यांच्यासह इतरही अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

आज बारामतीतील ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या प्रकल्पांना शरद पवार व राजू शेट्टी यांनी भेट दिली. देशी गोवंश अनुवंश सुधार प्रकल्प हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. शेतकऱ्यांसाठी गिर, साहिवाल, खिलार, पंढरपुरी, मुर्रा म्हैस या देशी जनावरांसंबंधी संशोधन कार्य येथे होतं.

ट्रस्टने राष्ट्रीय कृषी योजना आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नांनी उभारलेल्या डेअरी प्रकल्पामार्फत दुधाची, रक्ताची तपासणी, चाऱ्याची तपासणी तसंच पशुपालनाचं प्रशिक्षण दिलं जातं. शेण, गोमूत्र आणि दुधावर मूल्य संवर्धन प्रक्रिया केंद्रही येथे उभारलं जात आहे.

नेदरलँडच्या तंत्रज्ञानावर आधारलेल्या भाजीपाला गुणवत्ता केंद्रालाही आम्ही भेट दिली. ही उत्तम वाणाची रोगप्रतिकारशक्ती असलेली भाजीपाल्याची रोपं ना नफा ना तोट तत्त्वावर शेतकऱ्यांना विकली जातात. या रोपांमार्फत अधिक उत्पादन काढण्यासंबंधी कन्सल्टन्सीही येथे केली जाते.

एवढंच नाही तर झालेल्या उत्पादनाचं ग्रेडिंग करून निर्यात वा स्थानिक बाजारपेठेत विक्रीव्यवस्थेचं मार्गदर्शनही केलं जातं. राज्यभरातील शेतकरी इथल्या प्रशिक्षणाचा लाभ घेतात.

ब्राझिलच्या जातीपासून एम्ब्रियोमार्फत तयार केलेल्या कालवड प्रकल्पालाही भेट दिली. तसंच नेदरलँडशी सामंजस्य करार असलेल्या आंतरराष्ट्रीय कृषी अभ्यासक्रम राबवणाऱ्या ॲग्रीकल्चरल कॉलेजलाही शेट्टी यांनी भेट दिली.

त्याचप्रमाणे नीती आयोगामार्फतच्या इनोव्हेशन सेंटरच्या प्रकल्पाची माहिती घेतली. फार्मर प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशन व कृषी क्षेत्रातले नवउद्योजक यांना या सेंटरमार्फत मार्गदर्शन केलं जातं. या ठिकाणी सुरु असलेले शेती विकासाचे काम पाहून राजू शेट्टी प्रभावित झाले होते.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here