!!भास्करायण :२५!! बदलते हवामान: मानवापुढिल आव्हान!

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
गेल्या काही वर्षात पृथ्वीचे तापमानात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे जागतिक हवामानात विकृती येत असल्याचे दिसत आहे. जागतिक तापमानवाढीने अवर्षण, अतिवृष्टी, गारपीट, हिमपात, चक्रिवादळ अशा पर्यावरणीय संकटांची जणू मालिकाच सुरु झाली आहे. यामुळे जगभारतल्या पर्यावरण तंज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. या समस्यांकडे डोळेझाक केली, तर मोठे संकट उभे ठाकणार आहे. त्यामुळेच सध्याच्या पर्यावरणीय संकटाची तातडीने दखल घेवून उपाययोजना करणे आवश्यक आहे. 
जागतिक तापमानवाढीस वृक्षतोड, कार्बन आणि पर्यावरणास धोकेदायक ठरणारे वायूचे उत्सर्जन कारणीभूत आहे.श औद्योगिकरीकरणाचा विस्तार झाला तसे नागरीकरण वाढले. औद्योगिकीकरण व नागरीकरणाच्या विस्तारासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली आणि होत आहे. औद्योगिकीकरणातून बाहेर पडणारे कार्बन, क्लोरीन, मिथेन वायू तापमान वाढीस कारणीभूत ठरत आहेत. एकीकडे औद्योगिकीरकरणामुळे पर्यावरणास हानीकारक वायूंचे उत्सर्जन होत असताना, कार्बनचे प्रमाण घटविणार्‍या वृक्षांची तोड होत असल्याने, समस्या अधिकच गंभीर होत आहे.
नागरीकरण आणि चंगळवादी संस्कृतीच्या मोहामुळे मानवाची जीवनशैली कमालीची बदलली आहे. वाहने, एअर कंडिशनिंग, फ्रिज, कोल्ड्रींक्स आदी वस्तू जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. वाहनांच्या वापरामुळे लाखो टन कार्बनवायूचे दररोज उत्सर्जन होत आहे. यामुळे शहरे ही विषारी वायुंची गोदामे बनली आहेत. एअर कंडिशनिंग, फ्रिज, कोल्ड्रींक्सचे उत्पादन यातून घातक असे क्लोरोफ्लोरो कार्बन (सी.एफ.सी.) वायू उत्सर्जित होतात. हे वायू पृथ्वीचे संरक्षक कवच असणार्‍या ओझोन वायूच्या थराचा नाश करीत आहेत. त्यामुळे सूर्यापासून निघणारी अतिनिल व लाल किरणे थेट पृथ्वीवर पोचत असल्याने, तापमान वाढीचे हे प्रमुख कारण बनले आहे.
वर नमूद कारणांमुळे पृथ्वीच्या तापमानात गेल्या दहा वर्षात दिड अंश सेल्सीअसने वाढ झाल्याचे सांगितले जाते. तसेच यावर वेळीच उपाययोजना झाली नाही तर अशी काही पर्यावरणीय संकटे येतील, की त्यांना तोंड देताना नाकी नऊ येतील. अशा काही संकटांची झलक आपणास अतिवृष्टी, अवर्षण, गारपीट, अवकाळी, चक्रिवादळे, हिमपात अशा नैसर्गिक आपत्तीतून अनुभवास येत आहे. या नैसर्गिक आपत्तीकडे सर्वांनी पुढील विनाशाची पूर्वसूचना यादृष्टीने बघण्याची गरज आहे.
तापमान वाढ अशीच सुरु राहिली तर सगळा अनर्थ होणार आहे. तापमान वाढीमुळे दक्षिण धृवावरील बर्फ वितळण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यामुळे समुद्राच्या पाणी पातळीत दरवर्षी वाढ नोंदविली जात आहे. पाणी पातळीत अशीच वाढ होत राहिली, तर बेटे, काठावरची अनेक महानगरे, मानवी वस्त्यांना समुद्र आपल्या कवेत घेईल. तापमान वाढीमुळे समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवनाचा वेग वाढून पर्जन्यात वाढ होईल. अतिवृष्टीमुळे महापुरांची संख्या वाढेल. त्याचप्रमाणे जमिनीचा सुपिक थर पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जावून. जिथे सुपिक जमिन होती, तेथे खडकाचे उघडे थर बघावयास मिळतील. डोंगरकडे, मातीच्या दरडी कोसळणे, असे प्रकार वारंवार घडतील.
तापमान वाढल्याने कमी दाबाच्या क्षेत्रांची संख्या वाढेल. यातून वादळे, चक्रिवादळे यांचे थैमान सुरु होईल. तापमान वाढीमुळे अवकाळी पाऊस, गारपीट, हिमवर्षाव हे नित्याचे बनेल. यामुळे पृथ्वीचे निसर्गचक्र उध्वस्त होईल. नैसर्गिक आपत्तीमध्ये वाढ झाल्यास सगळ्यात मोठे आव्हान उभे राहिल, ते शेती क्षेत्रापुढे. सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती उध्वस्त होईल. आवर्षणामुळे नापिकी तर अतिवृष्टी, अवकाळी व गारपीटीमुळे पिकलेल्याची नासाडी, असे दुहेरी संकट उभे राहिल. खरा धोका इथेच आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे वर्षागणिक शेतीसमोरील आव्हानात वाढ होत आहे. शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. असेच सुरु राहिले तर मानवाला ‘अन्नासाठी दाही दिशा’ अशी वेळ येईल. शेती उध्वस्त झाल्याने पशुधन जगविणे जिकरीचे होईल. वनस्पतींचे विश्‍व बदलेल. वनस्पती, पशु, पक्षी यांच्या अनेक प्रजाती बदलत्या हवामानामुळे नामशेष होतील. यामुळे वैश्‍विक जैविकतेला बाधा येईल.
सध्या बिबट्यासह अनेक वन्यप्राणी नागरी वस्त्यांमध्ये सर्रासपणे वावरताना दिसत आहेत. याची कारणमिमांसा केल्यास याची कारणे हवामान बदलाशी निगडीत असल्याचे स्पष्ट होते. जंगलांचा विनाश, त्यातील वन्याजीवांच्या प्रजातींचा लय, संपुष्टांत येणारे पाणी साठे, या कारणास्तव वन्यप्राण्यांना अन्न व पाण्याच्या शोधार्थ जंगले सोडावी लागत आहे. ही भविष्यातील मानव व वन्यप्राणी यांच्यातील जिवघेण्या संघर्षाची नांदी आहे. हे वन्यजीव जंगलाकडे परत कसे फिरतील, यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. जंगलात पाणीसाठे, आवश्यक फळझाडे, वन्यप्राणी यांचे जतन करावे लागेल. अन्यथा हे वन्यजीव माणसाच्या जीवावर उठतील, हे नक्की.
या पार्श्‍वभूमिवर जागतिक पर्यावरण बदलाची गंभिरतेने दखल घ्यावी लागेल. निसर्गाची मानवाने जी हानी केलीय, तिची सव्याज भरपाई करुन द्यावी लागेल. मानवनिर्मित वनांचे प्रमाण वाढवावे लागेल. त्याचबरोबर वृक्षतोड प्रतिबंधक कायदे कडक करावे लागतील. कार्बन आणि क्लोरोफ्लोरो कार्बन अशा घातक वायूंच्या उत्सर्जनाला आळा घालावा लागेल. यासाठी सामुहिक व व्यापक प्रयत्न करावे लागतील. विकसित देशांनी कार्बनचे प्रमाण वाढवायचे आणि वाढलेले प्रमाण घटविण्याची जबाबदारी अविकसित राष्ट्रांवर ढकलायची, हे थांबवावे लागेल. यासाठी विकसित राष्ट्रांवर दबाव आणण्यासाठी जगाला एकजूट करावी लागेल. प्रश्‍न कोण्या एका देशाचा नसून मानवी समूहाचा आहे, याचे भान राखून प्रत्येकाला आपली जबाबदारी पार पाडावी लागेल.
या पार्श्‍वभूमिवर भविष्यातील पर्यावरणीय धोक्यांची दखल घेण्याची आवश्यकता आहे. यावर पर्यावरणाची पुर्नस्थापना, हा एकमेव पर्याय आहे. प्रदुषणाला आळा घालून आणि पर्यावरणाचे रक्षण केले, तरच हवामान बदलाचे गहिरे होणारे संकट टळेल. आपण औद्योगिकीकरण व नागरीकरणाच्या नादात, नैसर्गिक संपत्तीची मनमानी लयलूट केली. त्याच्याशी छेडछाड करुन त्याला विकृत व विद्रुप बनविले, ही छेडछाड थांबवली नाही, तर निसर्ग त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, एवढा बोध सध्याच्या नैसर्गिक आपत्तींच्या मालिकांमधून घेतला पाहिजे. असा बोध घेतला नाही, तर बदलते हवामान हे मानवीसमुहापुढी आव्हान ठरेल, एवढा इशारा यानिमित्ताने द्यावासा वाटतो.
***भास्कर खंडागळे*** (९८९०८४५५५१ )

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here