Rashtra Sahyadri Effect : Agriculture : शेतकऱ्याने तयार केलेल्या कांदा चाळ मॉडेलचे कृषी विद्यापीठाकडून कौतुक (पाहा व्हिडिओ)

0

या मॉडेलसाठी प्रतिटन होतो फक्त 3 हजार 500 रुपये खर्च

प्रतिनिधी| दादा सोनवणे |राष्ट्र सह्याद्री   

श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील शेतकरी दादासाहेब मेहेत्रे यांनी स्वतःच्या कल्पनेतून उभारलेली आधुनिक कांदाचाळ या मथळ्याखाली राष्ट्र सह्याद्रीने बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची राहुरी कृषी विद्यापीठ यांनी दखल घेतली. हे वेगळे मॉडेल पाहण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील शास्त्रज्ञ व कांदा पैदासकार व्ही आर जोशी तसेच अभियंता व्हि एस भुतकर यांनी भेट देऊन पाहणी केली. 

श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील दादा मेहेत्रे या शेतकऱ्याने कल्पकतेने तयार केलेली नाविन्यपूर्ण कांदा चाळ पाहून शास्त्रज्ञांनी त्यांचे कौतुक केले. शेतकऱ्यांचा हा अभिनव प्रयोग प्रमाण मानून विद्यापीठांमध्ये या कांदाचाळीवर या पुढील संशोधन होणार आहे, असे जोशी यांनी सांगितले. यासाठी त्यांनी मेहेत्रे यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे भेटीचे निमंत्रण दिले असून पुढील आठवड्यामध्ये शेतकरी व शास्त्रज्ञ यांची एकत्रित बैठक होऊन याबाबत पुढील दिशा ठरणार आहे.
मागील आठवड्यात तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी मेहेत्रे यांनी तयार केलेले कांदाचाळीची पाहणी करून याबाबतची माहिती कृषी विभागाच्या वरिष्ठ कार्यालयास कळवली होती. शेतकऱ्यांच्या या नाविन्यपूर्ण प्रयोगाची राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी दखल घेतली. त्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठचे संशोधन संचालक शरद राव गडाख यांच्याशी चर्चा करून ही कांदा चाळ शास्त्रज्ञांनी पाहून माहिती घेण्याबाबत सूचना केली होती.
मेहेत्रे या शेतकऱ्याने कांदाचाळीमध्ये एक्झॉस्ट फॅनचा वापर केला आहे व पोरस पाइप चे नेटवर्क वापरले आहे. एक्झॉस्ट फॅनमुळे साठवणूक केलेल्या कांदा चाळमधील गरम हवा बाहेर काढली जाते व वातावरणातील हवा कांदा चाळीमध्ये राहून कांदा सडला जात नाही. ही कांदा चाळ जमिनीवर उभारली असून ती शेतकऱ्याला सोयीनुसार हलवता येते. पारंपरिक कांदाचाळीमध्ये शेतकऱ्याचा स्टीलमध्ये ज्यादा खर्च होतो. त्यामध्ये काटकसर करून ही कमी खर्चात कांदा चाळ तयार केलेली आहे.
सद्यस्थितीत शासकीय आराखड्यानुसार कांदा चाळ उभारणीसाठी प्रति टन सात हजार रुपये खर्च येतो. मेहेत्रे यांना या मॉडेलसाठी प्रतिटन 3 हजार 500 रुपये खर्च आला आहे. असे कृषी पर्यवेक्षक संदीप बोदगे यांनी सांगितले. यावेळी कृषी पर्यवेक्षक संदीप बोदगे तसेच शेडगावचे सरपंच विजयराव शेंडे आदी उपस्थित होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here