International : अंतर्गत प्रश्नामुळं चीनची आगळीकः कर्नल आठल्ये

भागा वरखडे

नगरः “लडाखच्या ज्या भागात सध्या भारत आणि चीनमध्ये पेचप्रसंग निर्माण झाला आहे, तो भाग दोन्ही देशांच्या सामरिकदृष्टीनं फार महत्त्वाचा आहे, अशातला भाग नाही. एकही सामरिक उद्दिष्ट तिथं नाही. लष्करी डावपेच आणि छोट्याय फायद्यासाठी चीन एवठ्या मोठ्या प्रमाणात लष्कराची जमवाजमव करण्यामागं चीनचा लडाख हा एकमेव उद्देश नाही, तर त्यामागं अंतस्थ हेतू वेगळाच आहे,” असे स्पष्ट मत निवृत्त कर्नल अनिल आठल्ये यांनी व्यक्त केले.

दैनिक राष्ट्र सह्याद्रीला दिलेल्या विशेष मुलाखतीत चीनमधील अंतर्गत परिस्थिती, एकूणच जागतिक स्थिती आणि चीन-पाकिस्तानच्या सामरिक व्यूहरचनेतून भारताला अडचणीत आणण्याचा केलेला प्रयत्न यावर आठल्ये यांनी प्रकाश टाकला. ते म्हणाले, की २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर सीमेवर मोठ्या प्रमाणात रस्ते बांधणी करण्यात आली. पायाभूत सुविधांची निर्मिती झाली. हवाईपट्या बांधल्या. त्यामुळं सीमेवरच्या त्या भागात भारत चीनला तोडीस तोड झाला. चीनची सैन्यसंख्या भारतापेक्षा कितीही मोठी असली, तरी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे चीनची भारताच्या सीमेवर सैन्य आणण्याची क्षमता फार थोडी आहे. कोरोनाच्या महासंकटाचा सामना करीत असताना चीननं लडाख भागात ही आगळीक का केली, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. चीनचे नेते ली, सैन्य आणि अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात मतभेद असू शकतात. शी जिनपिंग यांना अडचणीत आणण्यासाठीही ही खेळी केलेली असू शकते.

कोरोनाच्या संकटामुळं चीन आर्थिक व राजकीयदृष्ट्या अडचणीत आहे. युरोपातील बहुतांश देश त्याच्या विरोधात गेले आहेत. जगात चीन एकाकी पडत चालला आहे. त्याचे खापर शी जिनपिंग यांच्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न म्हणून  लडाखमधील आगळीक घडवून आणली असावी. चीनच्या अंतर्गत समस्यांतून लक्ष विचलीत करण्याचा हेतूही त्यामागं असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सांगून ते म्हणाले, की कारणं काहीही असली, तरी लडाखमधील पेचप्रसंगामुळं भारताचं राखीव सैन्य चीनच्या सीमेवर गेलं आहे. त्याचा फायदा पाकिस्तान घेऊ पाहत आहे. बुधवारीच पाकिस्तानच्या तीनही सैन्य दलाच्या प्रमुखांची बैठक झाली.

गेल्या पाच आॅगस्टला भारतानं काश्मीरमधील ३७० वं कलम रद्द केलं. त्यामुळं पाकिस्तान बिथरला आहे. त्याअगोदर बालाकोटचं सर्जिकल स्ट्राईक झालं. काश्मीरमध्ये काहीच करता येत नाही, याचं शल्य पाकिस्तानला आहे. त्यामुळं भारताचं सैन्य चीनच्या सीमेवर गुंतवून ठेवून  चीन अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला मदत करतो आहे, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल. भारताविरोधात नेहमी गरळ ओकण्याची एकही संधी न सोडणारा पाकिस्तान लडाख परिसरातील चकमकीवर माैन का धारण करतो आहे, या मागचं कारण शोधण्याची गरज आहे.

भारताच्या दृष्टीनं दोन सीमांवर एकाच वेळी लढणं कठीण आहे. नेमक्या याच परिस्थितीचा चीन आणि पाकिस्तान फायदा घेत आहे. सध्या अमेरिकेत मोठ्या प्रमाणात अशांतता आहे. अंतर्गत प्रश्नांत गुंतल्यामुळं अमेरिका भारताच्या मदतीला येऊ शकत नाही, याची माहिती असल्यानंच चीन आणि पाकिस्ताननं संगनमतानं ही कृती केली असं मानायला जागा आहे. थोडक्यात लडाखचा पेचप्रसंग हे निमित्त आहे. खरं उद्दिष्ट भारतीय सैन्याला गुंतवून ठेवणं हेच असावं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here