Karjat : राशीनमध्ये आढळला पुन्हा कोरोना रुग्ण

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कर्जत : वैद्यकीय कारणाने पुणे येथून प्रवास करून आलेल्या राशीन (ता.कर्जत) येथील ६० वर्षीय व्यक्तीचा गुरुवारी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला. त्याच्या संपर्कातील व्यक्तीची माहिती प्रशासन घेत आहे, अशी माहिती तहसिलदार नानासाहेब आगळे यांनी दिली. राशीन येथे पुन्हा कोरोना रुग्ण आढळल्याने राशीनकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आजतागायत कर्जत तालुक्यातील कोरोना रुग्णाची एकूण संख्या नऊ झाली आहे.
राशीन (ता.कर्जत) येथील ६० वर्षीय व्यक्ती आपल्या वैद्यकीय कारणाने पुणे येथे प्रवास करून आली होती. सदरच्या व्यक्तीला त्रास होत असल्याने तसेच कोरोना सदृश लक्षणे दिसत असल्याने स्वॅब घेण्यात आला होता, अशी माहिती कर्जतचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी दिली. व्यक्तीचा कोरोना अहवाल गुरुवारी सकाळी पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने कर्जत प्रशासनाने तात्काळ राशीन येथील तो परिसर प्रतिबंधित करण्याची सुत्रे हलविली. या कोरोनाबाधीत व्यक्तीच्या निकटच्या संपर्कातील राशीन येथील सहा तर श्रीगोंदा येथील दहा, असे एकूण १६ व्यक्तींना स्वॅब तपासणीसाठी नगरला पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती तहसिलदार नानासाहेब आगळे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी दिली.
२१ मे रोजी आपल्या सुनेकडे आलेल्या मूळच्या मुंबई वाशी येथील ६५ वर्षीय महिलेला प्रथम कोरोना झाल्याने कर्जत तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यानंतर कोरोनाने राशीनकरांच्या मागे पिच्छाच पुरविला. मात्र ६५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू सोडता राशीन येथील इतर सहा जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात करीत दि ८ जून रोजी कर्जत तालुका कोरोनामुक्त करण्यात यश मिळवले. मात्र, आज पुन्हा कोरोना रुग्ण सापडल्याने राशीनकरांची अडचण वाढली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here