Rahata : बिबट्याचा धुमाकूळ; दोन बक-या फस्त; दोन जखमी तर दोघींना फरफटत नेले

2

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

राहाता – बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन बकऱ्या मृत्यूमुखी पडल्या. तर दोन गंभीर जखमी झाल्या असून दोन बकऱ्यांना सोबत घेऊन बिबट्याने धूम ठोकली. ही खळबळजनक घटना राहाता शहरातील रांजणगाव रोड लगत असलेल्या बागडे वस्तीवर बुधवारी मध्यरात्रीनंतर अडीच वाजेच्या सुमारास घडली आहे.

बिबट्याचा हल्ल्यात एकाच शेतकऱ्याच्या चार बकऱ्या बिबट्याने मारल्या तर दोन जखमी केल्याने सुभाष बागडे हातावर पोट असणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. गेल्या दोन-तीन दिवसात बिबट्याने अनेक बकऱ्यांचा फडशा पाडला असतानाही बिबट्याला जेरबंद करण्यासाठी या ठिकाणी पिंजरा लावण्यासंदर्भात वनविभागाला जाग का  येत नाही, असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे. राहाता शहरात गेली काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून अस्तगांव रोड, रांजणगाव रोड, पंधराचारी परिसर गाडेकर वस्ती या परिसरात बिबट्याची मोठी दहशत शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे.
दोन-तीन दिवसांपूर्वीच गोदावरी कॅनाॅल लगत असलेल्या बनकर वस्ती वरील सोमनाथ बनकर यांच्या दोन शेळ्यांचा फडशा पाडला होता. त्यानंतर बुधवारी मध्यरात्रीनंतर बिबट्याने आपली स्वारी रांजणगाव रोड लगत असलेल्या सुभाष बागडे या शेतकऱ्याच्या वस्तीवर केली. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास बिबट्याने बाहेर असलेल्या शेळ्यावर हल्ला केला. यामध्ये एका बकरीचे मुंडके धडावेगळे केले तर दुसर्‍या बकरीला जागेवर ठार केले. दोन बकऱ्यांना ठार केल्यानंतर दोन बकऱ्या गंभीर जखमी केल्या. तर दोन बकऱ्याना बिबट्याने सोबत घेऊन धूम ठोकली आहे. बागडे यांना मध्यरात्री गायी ओरडण्याचा आवाज आल्यानंतर त्यांनी घराबाहेर बघितले असता बाहेर बिबट्या असल्याचे लक्षात आले. आरडाओरड झाल्यानंतर दोन बकऱ्यांना घेऊन त्याने धूम ठोकली.
एका शेतकऱ्याच्या एकाचवेळी चार बक-या बिबट्याने मारून टाकल्या तर दोन गंभीर जखमी केल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने या शेतकऱ्यास मदत करावी, अशी मागणी होत आहे. या परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून दोन तीन बिबटे आढळत असल्याचे परिसरातील नागरिक बोलत आहे वनविभागाने तातडीने या परिसरात दोन तीन ठिकाणी पिंजरे लावावेत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अजून किती बकऱ्यांचा व प्राण्यांचा जीव जाण्याची वनविभाग वाट बघणार आहे का? असा संतप्त सवालही प्राणीप्रेमी नागरिक व शेतकरी उपस्थित करीत आहे.
बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी व शेतमजुरांना शेतातील कामे करणे सुद्धा जीविताच्या दृष्टीने धोकादायक बनत चालले आहे. तर रात्री-अपरात्री बाहेर बांधलेल्या जनावरांना चारापाणी करणेसुद्धा धोक्याचे वाटू लागले आहे. वनविभागाने तातडीने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावा, अशी मागणी होत आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here