Shrigonda : जखमी हरणाच्या पाडसाची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका…

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा : कामठी वडघुल शिवारातील शेरी वस्तीवरील काही तरुणांनी गंभीर अवस्थेतील एका हरणाच्या पाडसाला कुत्र्यांच्या तवडीतून सोडवून, औषधोपचार करून वनविभागाच्या ताब्यात दिले. वनविभागाने पुन्हा त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. त्यामुळे त्या पाडसाला पुनर्जन्म मिळाला आहे.         
कामठी  येथे शनिवारी (दि. 13) मुसळधार पाऊस सुरु होता. एक हरणांचा कळप पावसात वस्तीवर अश्रयाला आला. वस्तीवरील चारपाच कुत्र्यांनी हल्ला चढविल्याने हरणांनी धूम ठोकली. पण हरणाच्या पाडसावर चारपाच कुत्र्यांनी हल्ला चढविला. बचावासाठी हरणांनी तेथून धूम ठोकली. हरणाच्या एका नवागत पाडसाचा चिखलात पाय रुतल्याने ते अडकून पडले.
त्याच्यावर कुत्र्यांनी हल्ला करून त्यास गंभीर जखमी केले. दरम्यान ही झटापट वस्तीवरील तरुण मच्छिंद्र गोसावी,  देविदास चेमटे, प्राथमिक शिक्षक निलेश चेमटे, प्रविण गोसावी, किरण गोसावी, महेश चेमटे, रोहित बन आदी तरुणांच्या लक्षात आली. या तरुणांनी हातात काठ्या घेऊन कुत्र्यांना पिटाळून लावले व पाडसाची सुटका केली. जखमी अवस्थेत त्याला वस्तीवर आणून त्याच्यावर औषधोपचार करुन त्यास रात्री उशिरा वन अधिकारी रायकर यांच्या ताब्यात देण्यात येऊन त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिल्याने त्या पाडसाचा जणू  पुर्नजन्मच झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here