Editorial : ड्रॅगनची कूटनीती

राष्ट्र सह्याद्री 19 जून

चीन हा देश कधीही विश्वास ठेवण्यासारखा नाही. त्याचा अनुभव दक्षिण आशियातील राष्ट्रांसह जगाला आला  आहे. अडीच हजार वर्षांपूर्वी चीनच्या प्रसिद्ध जनरल सन जूने ‘द आर्ट ऑफ वॉर’ या पुस्तकात लढाईशिवाय शत्रूचा पराभव करणे ही युद्धाची सर्वोत्तम कला आहे, असे म्हटले आहे; परंतु चिनी सैन्याला त्याचा विसर पडला आहे. भारतातही चाणक्य नीती महत्त्वाची मानली जाते. भारताकडेही या नीतीचा अभाव आहे. चीन आपली कायम फसवणूक करतो. गेल्या ५५ वर्षांपासून आपल्याला त्याचा अनुभव आहे. एकीकडे हिंदी चिनी भाई भाई म्हणायचे आणि दुसरीकडे याच भावाच्या पाठीत खंजीर खुपसायचा, हे चीनने वारंवार केले आहे.

पंडित नेहरू यांनी चीनला अनेक जागतिक व्यासपीठावर घेण्यास मदत केली आणि त्याच नेहरू यांचा चीनने विश्वासघाताने गळा कापला. आताही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांशी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी १८ वेळा भेटीगाठी घेतल्या. व्यापार उदीम वाढवण्याचे करार केले आणि झुल्यावर झुलले; परंतु मोदी यांना झुलत ठेवून डोकलाम, उत्तराखंडात सैन्याची घुसखोरी केली. भारताच्या मंत्र्यांना अरुणाचल प्रदेशात जायला विरोध केला. चीनचा आक्रमकपणा आणि त्याची साम्राज्यवादी वृत्ती भारताला त्रासदायक ठरली. वाटाघाटी करायच्या, व्यापारी हीत साधायचे आणि दुसरीकडे पाठीत वार करायचा, याला चीननीती असे म्हणतात.

१९६२ चा भारत सध्या राहिलेला नाही, असे आपण वारंवार सांगत असलो, तरी १९६२ चा चीनही राहिलेला नाही, हे आपण लक्षातच घेत नाही. गेल्या पाच मे पासून लडाखमध्ये जे चालू आहे, त्यामागे चीनची अनेक कारणे असू शकतात. एकतर वाटाघाटीला अनेकदा ठरवूनही चीनचे अधिकारी आले नाहीत. चीनची नीती माहिती असतानाही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी चीनबरोबरचा तणावातून मार्ग निघेल, असे सांगत असताना दुसरीकडे चीनने त्याच्या अंतर्गत भागातून सीमेवर सैन्य आणून ठेवले आहे. आताही उत्तराखंड, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेशाच्या सीमेवर चीनच्या सैन्याची कुमक वाढते आहे.

चीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरात भारतापेक्षा वरचढ ठरल्याचे गलवान खो-यातील परिस्थितीवरून लक्षात यायला हरकत नाही. चीन बैठकामागून बैठका घेत असताना दुसरीकडे ड्रोनच्या साह्याने भारतीय सैन्य किती आहे, त्याला कसे नामोहरम करायचे, याचे नियोजन करीत होता. कोरोनाच्या विषाणूमुळे जगभर त्याची नाचक्की झाली असताना दुसरीकडे भारताच्या सैन्यानेच कुरापत काढली, असे जगाला दाखवून देण्याचे काम तो करतो आहे. सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्स ते काम इमानेइतबारे करते आहे. भारताचे वीस सैनिक हुतात्मे झाले. त्याच्यावर देशभरात संताप व्यक्त झाला. चीनच्या वस्तूंवर बंदी घालण्याची चळवळ आता जोर धरते आहे.

सीमेवर दोन देशांच्या सैनिकांमधील चकमकीची सर्व जबाबदारी चीनने भारतावर ढकलली. एवढेच नव्हे, तर याला भारताची चिथावणीखोर कृती असेही म्हटले गेले. भारताने सीमा रेखा ओलांडू नये किंवा परिस्थिती आणखी बिघडू शकेल, असे एकतर्फी पाऊल उचलले जाऊ नये, असा इशारा चीनच्या प्रवक्त्याने दिला. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे विधान सुमारे आठ तासांनंतर आले. किती सैनिक हुतात्मे झाले, याची माहिती वीस तासानंतर दिली. भारत आणि अमेरिकेने चीनचे ३५ सैनिक ठार झाल्याचे सांगितले असले, तरी चीनमधून मात्र त्याबाबत काहीच वाच्यता केली गेलेली नाही. भारतात कसा गोंधळ आहे, याची प्रचिती यानिमित्ताने आली.

भारतीय जवान जिवंत असताना त्याला हुतात्मा केले. त्याच्या कुटुंबीयांना माहिती दिली गेली. संबंधित सैनिकानेच घरी आपण जिवंत असल्याचे कळविले. गेल्या महिन्यात भारत-चीन सीमेवर प्रथमच लडाखमधील पांगोंग तलावाजवळ उभय देशांच्या सैन्यामध्ये वाद झाला होता. त्यानंतर सिक्कीममध्ये दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये चकमक झाली. या संपूर्ण वादाला 44 दिवस झाले आहेत; परंतु त्यावर मोदी एकदासुद्धा काही बोलले नाहीत. बुधवारी प्रथमच मोदी यांनी त्यावर भाष्य केले आणि सैन्याला प्रत्युत्तर देण्याचे सर्वाधिकार दिले. कोणत्याही हल्ल्याला उत्तर देण्यास भारत सक्षम आहे, असे त्यांनी सांगितले.

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी ट्विटरवर 75 हून अधिक ट्विट केले; परंतु एकदाही चीनचा उल्लेख केला नाही. आता त्यांनी चीनचे हे पूर्वनियोजित कृत्य असल्याचे सांगितले. परराष्ट्रमंत्र्यांच्या दिरंगाईची ही पहिलीच वेळ नाही. डोकलामनंतरही तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी थेट संसदेत विधान केले. लडाखमधील पुढील दोन दिवस सर्वांत महत्वाचे आहेत. आता भारताची मुत्सद्दी भूमिका काय आहे, भारत कारवाई कशी करतो, गोळीबार झाला नसताना सैनिक कसे हुतात्मे झाले, या प्रश्नांची उत्तरे १९ तारखेच्या सर्वपक्षीय बैठकीत द्यावी लागतील.

आपले सैनिक मारले गेले आहेत किंवा जखमी झाले आहेत, हे चीन सरकार मान्य करणार नाही. गलवान खो-यात आलेल्या रुग्णवाहिका, हेलिकाॅप्टर पाहता चीनच्या जखमी सैनिकांना आणि मृतदेहांना हलविण्यासाठी त्यांचा वापर केला आहे. चीन हे एक गूढ असून आपल्या सैनिकांचा मृत्यूही तो जगापासून लपवित आहे. उलट, भारतानेच प्रथम हल्ला केला, असे सांगून जगाची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे; परंतु गेल्या दीड महिन्यांपासूनच्या चीनच्या हालचाली, त्यावर अमेरिकेसह अन्य देशांनी घेतलेली भूमिका आणि आता आॅस्ट्रेलियानेही भारताची घेतलेली बाजू लक्षात घेता चीन जगात एकाकी पडला आहे.

गेल्या ४५ वर्षांत भारत आणि चीनच्या सीमेवर कधीच रक्त सांडले नव्हते. मग, आताच हे का घडले, याचा विचार करावा लागेल. त्याचे कारण दोन्ही देशांतील व्यापार आणि परस्पर अवलंबित्त्व इतके आहे, की बहिष्काराचे आता सुरू झालेले सत्र किती काळ टिकेल, हे पाहावे लागेल. गेल्या वर्षी पाच आॅगस्टला जम्मू-काश्मीरमधून कलम 37० हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आणि लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दिलेला दर्जा चीनला हे रुटलेले नाही. भारतावर चीन नाराज असण्याचे हे सर्वांत मोठे कारण आहे. चीनने हा मुद्दा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे नेला.

काश्मीर आणि लडाखमध्ये भारताचे नियंत्रण वाढल्यास चीनच्या तेथील कारवायांवर अंकुश लागेल, असे चीनला वाटते. विशेषत: पाकव्याप्त काश्मीरमधून जात असलेल्या पाकिस्तानबरोबर बनवल्या जाणा-या विशेष आर्थिक कॉरिडॉरवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. काश्मीर आणि लडाखमधील भारताच्या पायाभूत सुविधांच्या कामाला चीन आक्षेप घेत आहे. दौलत बेग ओल्दी येथे भारताने रस्ता तयार केल्यापासून चीन अधिक अस्वस्थ झाला आहे. कोरोना विषाणूमुळे जगाचा चीनवर खूप दबाव आहे. त्यातून लक्ष दुसरीकडे वळविण्याचा चीनचा प्रयत्न आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणामुळे चीन जगात एकाकी पडायला लागला आहे. त्याची बोच चीनला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताने चीनच्या विरोधात भूमिका घेतली. त्यामुळेही चीन संतप्त झाला आहे. गेल्या काही महिन्यांत भारताने कठोर आर्थिक उपाययोजनाही केल्या आहेत.

भारताने पोर्टफोलिओ गुंतवणूकीत बदल केले. थेट परकीय गुंतवणूक भारत सरकारच्या परवानगीशिवाय करता येणार नाही, असे बदल केल्याने चीनने नाराजी व्यक्त केली होती. पंतप्रधान मोदी आत्मनिर्भरतेविषयी बद्दल बोलत आहेत. या गोष्टींमुळे चीनला असे वाटते, की भारत त्यातून आपले आर्थिक अवलंबन कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे चीनची भारतात होणारी ६८ अब्ज डाॅलरची निर्यात कमी होण्याची शक्यता आहे. आता भारतातील उद्योजकांच्या संघटनेने चीनमधील उत्पादित पाचशे वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.

भारत-रशिया-चीन परराष्ट्र मंत्र्यांची त्रिपक्षीय बैठक 22 जून रोजी होणार होती. आता भारताने या बैठकीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढू शकतो. भारत सरकार सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी चीनबरोबर नवीन राजनैतिक संवाद सुरू करू शकते. दोन्ही देशांमधील लष्करी स्तरावर वाटाघाटी सुरू आहेत; पण आता मुत्सद्दी पातळीवरही बोलणी होण्याची गरज आहे. वुहान अनौपचारिक शिखर परिषदेत मोदी आणि जिनपिंग यांच्यात सामरिक मार्गदर्शनावर सहमती दर्शविली गेली. आता त्यावरच चर्चा व्हायला हवी.

चीनने नेहमीच भारतावर दबाव आणण्यासाठी सीमा विवाद वापरले. भारताला आपल्या ताकदीची जाणीव करून देण्यासाठी चीन वारंवार सीमेवर कुरघोड्या करतात. चीन हा पाकिस्तानपेक्षा भारताचा एक मोठा शत्रू आहे आणि कायम होता. त्यामुळे आपली परराष्ट्रनीती  आता बदलली पाहिजे. चीनला भारताशी झालेला कोणताही करार मान्य करावा असे वाटत नाही. सिक्कीम करार त्यांनी स्वीकारलाच नाही. तो मोडीत काढला. या पार्श्वभूमीवर वुहान परिषदेतील तोडगा तरी मान्य केला जाईल का, याबाबतही संदिग्धता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here