Rahata : शहरात डास प्रतिबंधक औषध फवारणी करा- नगरसेविका गाडेकर

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

राहाता – शहरातून जाणाऱ्या नगर-मनमाड राज्य महामार्गाच्या कडेला असलेल्या दोन्ही बाजूच्या साईड गटारांमध्ये साचलेल्या पाण्याचा तातडीने उपसा करा व डासांमुळे होणारी रोगराई टाळण्यासाठी शहरात डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करा, अशी मागणी राहाता नगरपालिकेतील नगरसेविका डॉ. मंगला गाडेकर यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.
नगरसेविका डॉ. मंगला गाडेकर यांनी मुख्याधिकारी यांच्या नावे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राहाता शहरातून जाणाऱ्या नगर मनमाड हायवे लगत पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या दोन्ही बाजूच्या गटारी या उघड्या आहेत. उघड्या गटारी बांधण्यात आल्याने नुकत्याच झालेल्या पावसामुळे दोन्ही बाजूंच्या गटारीमध्ये पाणी तुडुंब साचलेले आहे व साचलेल्या पाण्यास वाहून जाण्यासाठी देखील वाव नाही.
या साचलेल्या पाण्यामध्ये डेंग्यूसदृश डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता असून त्यामुळे रोगराई पसरू शकते कोरोना महामारीच्या काळामध्ये आणखी रोगराईला निमंत्रण नको म्हणून सदरच्या हायवेलगत असलेल्या गटारांमधील पाण्याचा त्वरित उपसा करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्याच बरोबर शहरात नुकत्याच झालेल्या पावसामुळे ठीक ठिकाणी पाणी साचून डासांची उत्पत्ती अधिक प्रमाणात झाल्याचे निदर्शनास आले आहे.
कोरोना महामारीच्या दिवसांमध्ये नागरिकांचे आरोग्य आधीच धोक्यात आलेले असतानाच डेंगू सदृश्य डासांमुळे आणखी रोगराई पसरू शकते. हे टाळण्यासाठी संपूर्ण शहरांमध्ये डास प्रतिबंधक फवारणी लवकरात लवकर करावी, अशी विनंतीही मुख्याधिकारी यांच्या नावे दिलेल्या निवेदनात नगरसेविका डॉ. मंगला गाडेकर यांनी केली आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here