Corona Effect : महिन्याला लाखो रुपये कमावणारा पायलट बनला डिलिव्हरी बॉय

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कोरोनानं जगभरात थैमान घातलं असून, अनेक देशांनीही कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारला आहे. लॉकडाऊन केल्यानं बऱ्याच देशांतील उद्योगधंदे ठप्प आहेत. सगळंच बंद असल्यानं लोकांचं बाहेर खाणं, शॉपिंग करणं आणि प्रवास करणं जवळपास बंद झालेलं आहे. त्याचा अनेक उद्योगधंद्यांवर परिणामही झाला आहे. बेरोजगारांची संख्या लक्षणीयरीत्या वाढतच चालली आहे. हवाई वाहतूक क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात मंदी आलेली आहे. अनेक व्यावसायिक विमानांचे वैमानिक बेरोजगार झालेले आहेत. पण म्हणतात ना, शो मस्ट गो ऑन, त्यामुळेच अनेक जण कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करण्यासाठी या लॉकडाऊनच्या काळात पडेल ते काम करण्यासाठी तयार आहेत.

थायलंडमध्येही असाच एक प्रकार समोर आला आहे. एकेकाळी निळ्या आकाशात विमान उडवणारा वैमानिक आता डिलिव्हरी बॉय बनला असून, घरोघरी सामान पोहोचवताना दिसतो आहे. ४२ वर्षीय या को-पायलटचं नाव नकरीन इंटा आहे. गेल्या ४ वर्षांपासून तो कमर्शिअल पायलटच्या स्वरूपात काम करतो आहे. पण कोरोनाच्या संकटानं त्याला पायलटवरून डिलिव्हरी बॉय बनवण्यासाठी हतबल केलं आहे. सीएनएन ट्रॅव्हल्सकडे तो म्हणाला, एअरलाइन्सनं आपल्या जास्त करून कर्मचाऱ्यांना पगाराविना सुट्टीवर पाठवलं आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांना पगार मिळतो आहे, तो मिळून न मिळाल्यासारखाच आहे. अनेकांना नोकरीवरूनही काढून टाकण्यात आलं आहे. या कठीण काळात माझे अनेक सहकारी दुसरा व्यवसाय करत आहेत. सर्वांनाच कामावर परत कधी बोलवता आहेत, याची प्रतीक्षा आहे. यात नोकरीवरून काढून टाकलेल्यांचाही समावेश आहे.

पण महत्त्वाच्या उड्डाणांसाठी त्यांना पैसे दिले जात आहेत. एक पायलट म्हणून महिन्याला मी ४ ते ६ लाख रुपये कमावत होतो. पण या कोरोनाच्या संकटात दोन हजार रुपये कमावणंही मोठी गोष्ट आहे. मला माझे सहकारी केबिन क्रू, कॅप्टन आणि इतरांची खूप आठवण येत आहे. जेव्हा कधी या आठवणी उचंबळून येतात, तेव्हा आकाशातून जाणाऱ्या विमानाकडे मी पाहतो. एक डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारा नकरीन सांगतो, जेव्हा मला पहिल्यांदा डिलिव्हरी मिळाली तेव्हा मी ती ग्राहकांपर्यंत व्यवस्थित पोहोचली, तो अनुभव माझ्यासाठी वेगळाच होता. तेव्हा मला जाणवलं मी हेसुद्धा काम करू शकतो. पण तरीही नकरीनला आकाशात विमान उडवण्याची प्रतीक्षा आहे. कारण पायलट बननं हे त्याचं स्वप्न होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here