Ahmednagar Breaking : एकाच दिवशी रोखले तीन बालविवाह

चाइल्ड लाइनच्या मदतीमुळे बालकल्याण समितीला शेवगाव, पारनेर, अकोले येथे बालविवाह रोखण्यात यश

अहमदनगर: जिल्ह्यातील शेवगाव, पारनेर, अकोले या तीन तालुक्यांत बालविवाह होणार असल्याची माहिती अहमदनगर ‘चाइल्ड लाइन’ला मिळाली होती. हेल्पलाइनवर माहिती मिळाल्यानंतर चाइल्ड लाइनने तातडीने संबंधित यंत्रणांना याबाबत सतर्क केले. त्यामुळे बालविवाह रोखण्यात यंत्रणेला यश आले आहे.

चाइल्ड लाइनच्या १०९८ या हेल्पलाइन क्रमांकावर शेवगाव, पारनेर, अकोले या तालुक्यांत बालविवाह होणार असल्याची माहिती अज्ञात व्यक्तींनी काल दिली. त्यानंतर चाइल्ड लाइनने तात्काळ ती माहिती तालुका हद्दीतील पोलीस ठाणे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, बालकल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, गाव व शहर पातळीवर प्रशासनाने नेमलेले बालविवाह प्रतिबंधक अधिकारी व ग्रामसेवक यांना दिली. त्यानंतर घटनास्थळी जाऊन अल्पवयीन बालिकेच्या पालकांची भेट घेतली.

बालिकेच्या आई-वडिलांना बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार कायद्याने बालविवाह लावून देणे हा गुन्हा आहे, तुम्ही जर हा विवाह लावून दिला तर, तुम्हाला शिक्षा होऊ शकते, असे सांगितले. तसेच संबंधित बालिकेच्या पालकांचे समुपदेशन केले. त्यामुळे बालिकेच्या पालकांसह इतर नातेवाईकांनी बालविवाह थांबवण्याचा निर्णय घेतला. याशिवाय मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतरच तिचा विवाह लावून देऊ, अशी लेखी हमी दिली आहे.

सध्याच्या परिस्थितीत बालविवाह रोखण्यासाठी सगळ्या यंत्रणांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात अधिक लक्ष देण्याची गरज असून, त्यासाठी तेथील ग्रामपंचायत पदाधिकारी असतील तसेच इतर नागरिक असतील त्यांनीही सतर्क राहण्याची आवश्यकता आहे, असे जिल्हा बालकल्याण समिती अध्यक्ष हनीफ शेख यांनी सांगितले.

गेल्या महिन्याच्या अखेरीसही दोन बालविवाह झाले होते. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. पाथर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारजवाडी येथे १६ वर्षांच्या तसेच १७ वर्षांच्या मुलीचे लग्न ठरवण्यात आले होते. ही दोन्ही लग्न मुलींचे वय १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच लावले जात असल्याची माहिती अहमदनगर चाइल्ड लाइनच्या १०९८ या क्रमांकावर मिळाली होती. हे दोन्ही बालविवाह रोखण्यासाठी तात्काळ चाइल्ड लाइन पथकाने ही माहिती पाथर्डी पोलीस ठाण्यात दिली.

त्यानंतर पत्राद्वारे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, जिल्हा बाल कल्याण समिती व गावपातळीवरील बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांना माहिती देण्यात आली. या माहितीवरून पाथर्डी पोलिसानी कारवाई करत हे बालविवाह थांबवले. संबंधित मुलीच्या आईवडिलांना नगर येथील बालकल्याण समिती समोर हजर करण्यात आले. बालकल्याण समितीने त्यांना समज दिली लेखी हमी दिल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here