!!भास्करायण:२८!! सहकाराची वाटचाल स्व:हाकाराकडे!

0
भास्कर खंडागळे,बेलापूर (९८९०८४५५५१) 

‘‘एकमेका साह्य करु, अवघे धरु सुपंथ!’’ हे ब्रीद सहकाराने स्वीकारुन, अवघे जग ज्या समता व समाजवादासाठी झगडत होते, ते तत्व सहकाराने सहजासहजी साकारले. सहकाराच्या मंत्राने शेती, शेतकरी आणि एकूणच ग्रामीण भागात क्रांतीची प्रक्रिया सुरु झाली. सहकाराच्या मंत्राने ग्रामीण भाग भारावून गेला. या भारावलेपणातून सहकारी संस्थांरुपी ग्रामीण आर्थिक,सामाजिक,शैक्षणिक परिवर्तनाची मंदिरे उभी राहिली.

स्वातंत्र्योत्तर पन्नास वर्षे सहकाराचे सुवर्णकाळ ठरले. या कालखंडात अनेक साखर कारखाने, दूग्ध व फळ प्रक्रिया प्रकल्प, कृषि उत्पादन प्रक्रिया उद्योग, सुतगिरणी, सहकारी बँका, सोसायट्या, खरेदी विक्री संघ, बाजार समित्या, पतसंस्था अशा सहकारी संस्थांचे जाळे निर्माण झाले. या संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागात परिवर्तन आणले.
सहकारामुळे सामान्य शेतकर्‍याला अर्थशास्त्र कळू लागले. आधुनिक शेती आणि तंत्रज्ञानाविषयी तो जागरुक बनला.  संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नेतृत्वाला विकासाची संधी मिळाली. यातूनच पुढे राज्याला नेतृत्व देण्याची क्षमता असणारे नेते उदयास आले. सहकारी क्षेञ हे कार्यकर्ते आणि नेतृत्व निर्मितीची खाण बनली. या खाणीतून दूरदृष्टीचे व सामाजिक भान आसणा-या व्यक्ती राजकारणात आल्याने, राजकारणाला समाजकारणाची झालर लागली, हे नाकारता येणार नाही.
सहकाराच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या प्रकल्प, उद्योगांनी ग्रामीण भागात मोठा रोजगार मिळवून दिला. गावच्या माणसाला त्याच्या गावीच ठेवण्याचे मोठे काम केले. याची दखल सहकाराच्या टिकाकारांनाही घ्यावीच लागेल. सहकारी संस्थांच्या माध्यमातून पुढे शैक्षणिक व तत्सम संलग्न संस्था उभ्या राहिल्या. या संलग्न संस्थांच्या माध्यमातून शैक्षणिक, वैद्यकिय सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध झाल्या. शेतकर्‍यांची मुलं शिकायला लागली. एरवी ज्या उच्च शिक्षणासाठी मुंबई-पुण्याशिवाय पर्याय नव्हता, अशा उच्च व तांत्रिक शिक्षणाच्या सुविधा सहकारी संस्थांच्या संलग्न संस्थाद्वारे ग्रामिण भागात उपलब्ध झाल्या. ग्रामीण भागातून मग डॉक्टर, इंजिनिअर, तंत्रज्ञ, संगणक तज्ज्ञ तयार होऊ लागले.

सहकाराने केवळ कृषि विकासाचे आणि आर्थिक परिवर्तनानेच काम केले असे नाही, तर सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रिडा, साहित्य अशा विविध क्षेत्रात योगदान दिले. सहकारी चळवळीने ग्रामीण भागाच्या सर्वंकष परिवर्तनासाठीचे योगदान सहकारातील दोष स्विकारुनही नाकारता येणार नाही . जागतिकीकरणानंतर म्हणजे १९९२ च्या सुमारास राजकारणाचे स्वरुप आणि संदर्भ बदलले. स्वातंत्र्य चळवळीची पार्श्‍वभुमी लाभलेले आणि तत्वांनी भारलेली माणसे अस्तगत होत गेली.सहकार व राजकारणात तत्कालीन तरुण पिढी अवतरली.येथून पुढे राजकारणातून आणि समाजकारणातून तत्वांची, मूल्यांची पिछेहाट सुरु झाली.  तत्वाऐवजी ‘अर्थ’कारणाला महत्व येवू लागले.  लोकमान्यता, लोकाभिमुखता ह्या निकषाऐवजी निवडून येण्याची ‘कुवत’ महत्वाची ठरु लागली.  यामुळे राजकारणातला, सहकारातला, सामाजिक आशय संपून, ह्या क्षेत्रांना बाजारु स्वरुप यायला सुरुवात झाली. सध्याच्या राजकीय अध:पतनाची आणि सहकाराच्या विनाशाची ही पायभरणीच होती, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
ऐंशीच्या दशकापर्यन्त सहकाराच्या जोडीनेच खाजगी कारखानदारीही होती. खाजगी आणि सहकारी क्षेत्रात एकमेकात स्पर्धा होती.  खाजगीकरणाने सहकारापुढे आव्हान निर्माण केले होते.  सप्टेंबर 1983 चा ‘शुगर केन एरिया रिझर्व्हेन अ‍ॅक्ट’ म्हणजेच झोन कायद्याने खाजगी कारखान्यांना वेसन घातली.  ज्याचे त्याचे कार्यक्षेत्र ‘अबाधित’ बनल्याने खाजगी कारखान्यांची नाकेबंदी झाली. ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस एखाद दुसरा अपवाद वगळता जवळपास एकूणच खाजगी कारखानदारांची अखेर झाली. खाजगी कारखानदारीचा अस्त सहकाराच्या सुत्रधारकांच्या बळकटीकरणास कारणीभूत ठरला. एका अर्थाने खाजगी कारखान्यांचे युग सरुन सहकारी क्षेत्रातील मक्तेदारी आणि घराणेशाहीच्या पर्वाचा आरंभ झाला.
ऐंशीचे दशक हे सहकाराच्या मक्तेदारी व घराणेशाहीच्या आरंभाची आणि सहकाराच्या अध:पतनाची सुरुवात मानली पाहिजे. खाजगी कारखान्यांचे आव्हान गळून पडले. सहकार हे विकेंद्रीकरण आणि नेतृत्वाला संधी देणारे माध्यम सत्ता आणि राजकारणाचे केंद्र बनले. एकमेकांच्या सहाय्याने परस्परांचा विकास आणि ‘अवघे धरु सुपंथ’  ऐवजी सहकार हा सत्ता आणि स्वार्थाचा महामार्ग बनला.  ह्या प्रक्रियेतून सहकाराला सतकारण आणि राजकारणाने घेरले. ग्रामीण परिवर्तनाची मंदिरे मानल्या जाणार्‍या सहकारी संस्था राजकारणाचा अड्डा बनल्या. ज्या सावकारीच्या आणि भांडवलशाहीच्या पाशातून मुक्त करण्यासाठी उभ्या ठाकलेली चळवळीने शेतकरी, सभासद आणि तिच्यावर अवलंबून असणारांना मानसिक गुलामगिरीत ढकलले.
सहकारातली लोकाभिुखता, विकेंद्रीकरण, सामुहिक विकास, परिवर्तन या सर्वाचा ‘गर्भपात’ झाला. सहकाराच्या नव्या गर्भधारणेतून सम्राट, महर्षि जन्माला आले. सहकाराची धुरा सांभाळणार्‍यांनी सहकारी संस्थांचे संस्थानात रुपांतर केले. मातृसंस्थांचे शोषण करुन खाजगी विश्‍वस्त संस्थांचे पेव फुटले. मातृसंस्था तोट्यात तर विश्‍वस्त संस्थांची भरभराट, अशी स्थिती निर्माण झाली. सहकाराला भ्रष्टाचार आणि अपप्रवृत्तीचे ग्रहण लागले.
सहकारी चळवळीच्या शंभर आजवरच्या वाटचालीचा परामर्श घेताना, असे वास्तव समोर येते. ज्या सहकाराने सहकारी संस्थांच्या कारभार्‍यांना भरभरुन दिले, त्याच सहकाराचा त्यांच्याच हातून  घात झाला! खरे तर सहकाराला समाजवादी चळवळ बनविण्याची, विकासाचे माध्यम आणि एकूणच सर्वंकष परिवर्तनाची चळवळ बनविण्याची संधी सहकार हाकणारांना मिळाली होती. ती संधी वाया घालवली, असेच म्हणावे लागेल. सहकाराच्या कारभार्‍यांनी मनापासून ठरवलं असतं, तर आज ग्रामीण विकासाचा एक वेगळा ‘कॅनव्हॉस’ उभा राहिला असता. दुर्दैवाने असे घडले नाही. सहकाराच्या कारभार्‍यांनी सहकारात वेगळेच रंग भरुन सहकाराला कडेलोटाच्या स्थितीपर्यंत आणून ठेवले आहे.
सहकाराच्या चळवळीचा अंत होणे, हा ग्रामीण विकासाचा आणि ग्रामीण भागात राहणार्‍या केवळ शेतकरीच नव्हे, तर सर्व घटकांचा शोकांतिका ठरणार आहे. कदाचित आगामी दशक हे सहकाराच्या युगाच्या अंताचे ठरेल. यास सहकाराचे कारभारीच कारणीभूत असतील. खाजगी कारखाने आणि भांडवलशाही सावकारी शोषण व्यवस्था संपविण्यासाठी सहकार जन्माला आला. त्याचेच शोषण करुन सहकाराच्या रखवालदारांनीच बनून स्वत:चे खाजगी कारखाने काढावेत, याला काय म्हणावे? खाजगी कारखाने आणि भांडवलदारी संपली.
आता नव्याने खाजगीकरणाच्या प्रवासास सुरुवात झाली आहे. भांडवलदारांची जागा सहकारातून मालामाल झालेल्यांनी घेतली. सहकारातून सम्राट ,महर्षी बनलेले नवे धनिक खाजगीकरणाचे धनी बनले आहेत.सहकार सम्राटांच्या या नवसाम्राज्यात  सहकाराचे शोषण करणारे  वर्तुळात, तर सहकाराचे लाभधारक सभासद व शेतकरी मात्र ह्या वर्तुळाच्या परिघाबाहेर असतील.सहकाराचा अशात-हेने स्वःहाकार व्हावा,याची सहकाराच्या निर्मात्यांना नक्कीच खंत वाटत असणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here