Shrirampur : नगरपालिकेचा तुघलकी कारभार; प्रशासनाच्या भूमिकेने कर्मचारी बेजार 

दंड वसूल करण्याचे कर्मचाऱ्यांना दिले उद्दिष्ट

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीरामपूर – कोरोना महामारीमुळे शहरांमध्ये दररोज नऊ ते पाच या वेळेमध्ये बाजारपेठेला सूट देण्यात आली आहे. तरी बाजारपेठेतील गर्दी टाळण्यासाठी तसेच नियम मोडणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करून प्रत्येक पथकाने किमान दहा हजार रुपये दंड वसूल करावा, अशा प्रकारचे टार्गेट पालिका प्रशासनाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिले आहे.
त्यामुळे शहरातील नागरिक व कर्मचारी यांच्यामध्ये वाद-विवाद निर्माण होत असून प्रशासनाच्या या भूमिकेने पालिका कर्मचारी मात्र बेजार झाले आहेत. श्रीरामपूर शहरामध्ये आजपर्यंत कोरोनाचा एक ही रुग्ण सापडलेला नाही. याचे सर्व श्रेय प्रशासनाच्या उत्कृष्ट नियोजनाला नक्कीच आहे. मात्र, आता नगरपालिका प्रशासनाने परिस्थिती हाताळताना आपल्या कर्मचाऱ्यांना दंड वसुलीचे टार्गेट निश्चित करून दिले आहे.
शहरांमधील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी नगरपालिकेने कर्मचाऱ्यांची सहा पथके निर्माण केली आहेत. त्यांना शहराच्या विविध भागांमध्ये नियुक्ती देण्यात आली असून मास्क न लावणारे, सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणारे, दुकानात नियम न पाळणारे दुकानदार व नोकरवर्ग, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करून दहा हजार रुपयापर्यंत दंड वसूल करावा, असे आदेश कर्मचाऱ्यांना व्हाट्सअप द्वारे देण्यात आले आहेत.
हे कर्मचारी दररोज शहरांमध्ये फिरून आपले काम करीत आहेत. उघड्यावरील खाद्य पदार्थांची दुकाने पूर्ण बंद करणे, भाजीपाला विक्रेत्यांना एका जागी थांबू न देणे, नऊ ते पाच या वेळेनंतर दुकाने सुरू राहिल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणे किंवा ती सील करणे, अशी कामे कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहेत. मात्र, ही कामे करताना कर्मचारी व नागरिक यांच्यामध्ये मोठे वाद होत आहेत. परवाच सकाळी भाजीपाला विक्रेत्यांना बसू दिले नाही म्हणून त्यांनी नगरपालिकेसमोर आंदोलन केले.
एकीकडे नागरिकांची समजूत घालत असताना दुसरीकडे कायद्याचे पालन करण्याची जबाबदारीसुद्धा या कर्मचाऱ्यांवर आहे. पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथक प्रमुख तसेच इतर कर्मचाऱ्यांना दररोज दहा हजार रुपयांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे फर्मान सोडले आहे. दंडात्मक कारवाई करा, पैसे वसूल करा, त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाचा देखील संदर्भ देण्यात आला आहे. कर्मचारी आधीच वैतागले आहेत. कारण नागरिक त्यांना सहकार्य करीत नाही.
रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ज्यांना काही काम नाही, असे लोक विनाकारण गाड्यांवर फिरताना दिसत आहेत. यासाठी वाहतूक पोलिसांच्या गाडीचा वापर करून नागरिकांना ध्वनिक्षेपकावरून सूचना देण्यात याव्यात. विनाकारण फिरणा-यांवर पोलिसांनी कारवाई करावी. नगरपालिका कर्मचाऱ्यांना हे काम करण्यास देऊ नये. कारण नागरिक त्यांचे ऐकत नाही अशी व्यथा पालिका कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवली.
कोरोनापासून वाचविण्यासाठी लोकांना सूचना आणि मार्गदर्शन करण्याऐवजी लोकांकडून दंड वसूल करा, असे फर्मान सोडणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांच्या या फर्मानाबद्दल शहरांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here