Human Interest & Motivational Story : साखर कामगाराचा मुलगा झाला डिवायएसपी

प्रतिनिधी | राजेंद्र जैन | राष्ट्र सह्याद्री 
परिस्थिती प्रतिकुल असली म्हणून काय झाले, मनात ध्येय गाठण्याची इच्छाशक्ती असेल तर जगात कुठलीच गोष्ट अशक्य नसते, हेच एका साखर कामगाराच्या सुपूत्राने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन करून दाखविले आहे. कडा येथील रवींद्र दिनकर भोसले याने सामाजिक व आर्थिक प्रवर्गातून राज्यात अव्वलस्थान पटकावून आष्टीकरांची मान अभिमानाने उंचावली आहे.
आष्टी तालुक्याक्यातील कडा साखर कारखान्याचे कामगार दिनकर भोसले यांचे सुपुत्र रविंद्र भोसले यांची नुकतीच पोलिस उपअधीक्षक पदावर निवड झाली आहे. रवींद्र हा लहानपणापासूनच इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत अभ्यासात प्रविण होता. आपण आणि आपला अभ्यास हेच त्याचं मुख्य उदिष्ट होतं, कारण त्यास आपल्या परिस्थितीची जाण होती. रवींद्रला आपलं जग बदलायचं होतं. आपल्या वडिलांचे कष्ट त्याने जवळून अनुभवले होते. त्यामुळे त्याची वाटचाल उच्च ध्येय समोर ठेवून चालली होती. प्रतिकुल परिस्थितीसमोर तो कधीच झुकला नाही. अन् वडिलांनाही कधी आपली गरज, अडचणीची जाणीव भासू दिली नाही. रवींद्रचे दहावी पर्यंतचे शिक्षण कडा येथील अमोलक जैन शिक्षण संस्थेत झाले. दहावीला ९५ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले.
अकरावी, बारावीचे शिक्षण त्याने लातूरच्या शाहू महाविद्यालयात घेतले. बारावी नंतरही त्याची घोडदौड कायम चालूच होती. कारण त्याला ध्येय गाठायचं होतं. त्यानंतर तो गुणवत्ता यादीत आला. पुण्यात अभियांत्रिकेची पदवी घेऊन रवींद्रने नोकरी केली. परंतू डोळ्यासमोरची आपली परिस्थिती त्यास स्वस्थ बसू देत नव्हती. उच्चपदस्थ अधिकारी होण्यासाठी तो प्रयत्नशील होता. त्यानंतर रवींद्रने नोकरीचा राजीनामा देऊन दिल्ली गाठली. पुन्हा युपीएससीची तयारी केली. तेथेही अपयश आले. परंतू तो निराश झाला नाही. जिद्द आणि कष्टाची तयारी असलेल्या रवींद्रने पुन्हा जिद्दीने आपल्या राज्यात येऊन पुण्यात लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास केला. परंतू म्हणतात ना, प्रयत्नांपुढे कधी कधी नियतीला पण झुकावे लागते. हेच साखर कामगाराच्या एका सुपूत्राने परिश्रमातून दाखवून दिले आहे. सलग दोनदा अपयशाचा सामना करणा-या अवलियाने अखेर तिस-या प्रयत्नात आपल्या वडिलांचे डिवायएसपी होण्याचे स्वप्न साकार करुन दाखविले आहे.
कष्टाला न्याय मिळाला…
परिस्थिती प्रतिकुल असली तरी रवींद्र खूप जिद्दी व प्रयत्नवादी होता. आपल्या परिस्थितीसमोर तो कधी हतबल झाला नाही. त्याचं उच्चपदस्थ अधिकारी होण्याचे स्वप्न साकारले आहे. त्यामुळे अखेर आमच्या कष्टाला रवींद्रमुळे न्याय मिळाला.
 – दिनकर भोसले, वडील 

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here