Shevgaon : बोधेगावात चोरटयांचा धुमाकूळ…एकाच रात्रीत पाच ठिकाणी चोऱ्या

0

रोख रकमेसह साठ हजाराचा ऐवज लंपास

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
 
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे आज (रविवारी दि २१) पहाटे चोरट्यांनी साधारण पहाटे एक ते दोनच्या दरम्यान गणपती रुग्णालय, अक्षय क्लिनिक, शांती रूग्णालय, शासकीय विश्रामग्रहा समोरील दोन घरी हात साफ करत साठ हजाराच्यावर ऐवज लंपास केला आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, बोधेगावच्या पश्चिमेला असलेल्या डॉ. राजेंद्र कणसे यांच्या शांती रूग्णालयाचे मागील लोखंडीगेट तोडून आत प्रवेश केला असता त्यांच्या दालनाची उचका पाचक करून त्यांच्या गल्ल्यातील आणि शेजारील मेडीकलच्या गल्ल्यातील मिळून अंदाजे दहा ते बारा हजाराची रोकड लंबवली. या दरम्यान चोरट्यांनी येथील तीन सिसिटीव्ही कॅमेरे फोडले. तसेच वरच्या मजल्यावर जाऊन राहत्या घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. तद्नंतर गणपती रूग्णालयात दरवाजाचे कुलूप तोडून आतील सामानाची उचका- पाचक केली पण त्यांना काहीच सापडले नाही.

त्यानंतर शासकीय विश्रामगृहासमोरील विजय वाघचौरे यांच्या घराचा दरवाजा तोडून आतील कपाटातील जवळपास सतरा ते आठरा नवीन साड्या आणि पँटच्या खिशातील पंधराशे रुपये घेऊन चोरटे निघून गेले. जातांना त्यांनी वाघचौरे यांचेसह शेजारील घरांना बाहेरून कड्या लावल्या वाघचौरे याच्या मुलाचा पाच दिवसापूर्वी लग्न झाले होते. नववधूचा शालू व इतर किंमती साड्या लंपास केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यानंतर शेजारी गुलशन बशीर शेख यांच्या घराचा दरवाजा तोडून कपाटातील सामान खाली टाकून त्यांची नात माहिरा हिच्या बचत डब्यातील बाराशे रूपयावर डल्ला मारला. शेजारील गंगाधर घोरतळे यांच्या दरवाजाचा कोंडा तोडला मोठ्याने आवाज झाल्याने ते जागे झाले. यामुळे चोरट्याने आपला मोर्चा शेजारीच असलेल्या अक्षय क्लिनिककडे वळवला. यात त्यांनी दवाखाण्याचे लोखंडी गेट तोडून आत प्रवेश केला. येथील डॉ. नितिन भराट व अर्चना भराट यांच्या दालनाची उचका पाचक करून दोघांच्या गल्ल्यातील मिळून सतरा ते अठरा हजार रूपये लंपास करुन डॉक्टर राहत असलेल्या खोलीचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला.

आवाजाने डॉ. भराट जागे झाले आणि दवाखान्यात चोर शिरल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी बोधेगाव पोलीस दूर क्षेत्राचे पोलीस नाईक आण्णा पवार यांना फोन केला. त्यानंतर पाच मिनिटांत बोधेगावचे पोलीस कॉ. उमेश गायकवाड, आणी पोकॉ. सचिन खेडकर घटनास्थळी दाखल झाल्याने चोरटे पळून गेले. दरम्यान घटनेचे वृत्त समजताच शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, सहाय्यक पोलीस निरिक्षक विश्वास पावरा, पोलीस उप निरिक्षक सोपान गोरे यांनी भेट देऊन तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. तर नगर येथून सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी मदने या ठसे तज्ज्ञ तर सहाय्यक फौजदार रवींद्र विरकर हे श्वानपथकासह घटनास्थळी दाखल झाले होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here