कोरोनाच्या संकटातही ‘संगमनेर मर्चंट्स बँक’ प्रगतीकडे जाईल ः मालपाणी

बँकेच्या अध्यक्षपदी मालपाणी तर उपाध्यक्षपदी करवा बिनविरोध

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
संगमनेर : ‘कोरोनाच्या संकटास अवघे जग सामोरे जात असतांना, बँकींग क्षेत्र सुद्धा त्यास अपवाद नाही. हे वर्ष केवळ व्यवसाय टिकविण्याचे वर्ष आहे. रिझर्व्ह बँक व सहकार खात्यानेही त्या दृष्टीने अनेक निर्बंध आणले आहेत. मात्र कोरोनाच्या या संकटावर संगमनेर मर्चंट्स बँक यशस्वीपणे मात करून अधिक प्रगतीकडे वाटचाल करेल, असा विश्वास बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष उद्योगपती राजेश मालपाणी यांनी व्यक्त केला.
संगमनेर मर्चंट्स बँकेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी सहकार उपनिबंधक गणेश पुरी यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत बँकेच्या अध्यक्षपदी राजेश मालपाणी तर उपाध्यक्षपदी संतोष करवा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मालपाणी व करवा तसेच मावळते अध्यक्ष डॉ.संजय मेहता व मावळते उपाध्यक्ष ओंकार सोमाणी यांचा सत्कार उपनिबंधक पुरी यांच्या हस्ते करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना मालपाणी बोलत होते कोविडच्या पार्श्वभूमीवर सहकार खात्याच्या मार्गदर्शक तत्वांनुसार कोणालाही निमंत्रित न करता साध्या पद्धतीने ही निवड प्रक्रिया पार पडली.
मालपाणी पुढे म्हणाले, आपल्या शुभेच्छा सोबतीला घेऊन आज पुन्हा एकदा पूज्य भाऊ स्वर्गीय ओंकारनाथजी मालपाणी व मित्रांनी स्थापन केलेल्या संगमनेर मर्चंट्स बँकेच्या अध्यक्षपदाची सर्व संचालक मंडळाने माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी नम्रपणे स्वीकारत आहे. अनपेक्षितपणे जगास ग्रासलेल्या कोरोनाच्या संकटातून सर्वांच्या सहकार्याने बँकेला अधिक प्रगतीकडे घेऊन जाणे हेच आपले ध्येय असून हे वर्ष आपल्या सारखेच संस्थेची इम्यूनी पॉवर (प्रतिकार शक्ती) वाढविण्याचे आहे. येणारा काळ मोबाईल अ‍ॅप, मोबाईल बँकींगचा वापर वाढवून सोपे व सुरक्षित काम करण्याचा, ग्राहक हितास प्राथमिकता देऊन निर्णय घेण्याचा राहणार आहे. त्यासाठी संस्था कटिबद्ध आहे.
नवनिर्वाचित उपाध्यक्ष करवा म्हणाले, मालपाणी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. यामुळे स्वतःला भाग्यवान समजत असून कर्जवितरण वृद्धी करणे, कर्मचारी वर्गास अत्याधुनिक प्रशिक्षण देऊन कार्यकुशल करणे यास प्राधान्य देण्यात येल.
याप्रसंगी राजेश करवा, संदीप जाजू, प्रकाश कलंत्री, सीए.संजय राठी, श्रीगोपाल पडताणी, प्रकाश राठी, दिलीप पारख, सुनील दिवेकर, राजेंद्र वाकचौरे, सतीश लाहोटी, गुरुनाथ बाप्ते, ज्ञानेश्वर कर्पे, डॉ.अर्चना माळी, ज्योती पलोड, ओंकार बिहाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर सूरम व सहकार खात्यातील अधिकारी राजेश जोशी उपस्थित होते.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here