प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी रविवारी औरंगाबाद शहरातील एका खताच्या दुकानावर वेषांतर करुन छापा टाकला.
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये खतविक्रेते अडवणूक करत असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर काल दादा भुसे शेतकऱ्याच्या वेषात औरंगाबादच्या बाजार समितीमधील नवभारत फर्टिलायझर या खताच्या दुकानावर गेले. त्यांनी दुकानदाराकडे १० गोणी युरिया मागितला. त्यावर युरिया शिल्लक नसल्याचे दुकानदाराने सांगितले. १० ऐवजी पाच गोण्यांची मागणी केल्यावरही दुकानदाराने युरिया दिला नाही.
त्यावेळी भुसे यांनी,’फलकावर खताचा साठा असल्याचे का लिहिलेले आहे, साठा रजिस्ट्रर कुठे आहे,’ अशी विचारणा केली. त्यावर विक्रेत्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. विक्रेत्याने खत देण्यास टाळाटाळ केल्यानंतर शेतकऱ्याच्या वेषात गेलेले भुसे यांनी स्वत:ची ओळख सांगून अधिकाऱ्यांना दुकान तपासणीचे आदेश दिले. यावेळी दुकानात मोठ्या प्रमाणात युरियाचा साठा आढळल्यानंतर विक्रेत्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
दरम्यान, सोमवारी बीड जिल्ह्याच्या आढावा बैठकीसाठी गेलेल्या दादा भुसे यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेरले. शेतकऱ्यांच्या पीककर्जासाठी भाजपने आजपासून राज्यव्यापी आंदोलन सुरु केले आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजपच्या कार्यकर्त्यांनी दादा भुसे यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले. तसेच सरकारविरोधात आक्रमक घोषणाबाजीही केली.