प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण सर्कलमधील शेतकऱ्यांना सन २०१९ मध्ये भरलेल्या मृगबहार हवामान आधारित फळपीक विमा योजने अंतर्गत डावलले आल्याने शेतक-यांनी बेमुदत उपोषण पुकारले आहे. देवदैठण येथील तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयाच्या समोर शिव छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत या आमरण उपोषणास प्रारंभ केला.

येथील शेतकरी अनिल बनकर, सचिन चौधरी, जयवंत वाखारे, गोरख कोरके, सुखदेव तिखोले, संतोष राक्षे, काशिनाथ कौठाळे, अतुल लोखंडे, कनीफनाथ वाखारे, विलास आढाव, रावसाहेब चक्रे, बापू ढवळे, वसंत बनकर, कुशाबा धावडे, निवृत्ती वखारे तसेच परिसरातील इतर शेतकऱ्यांनी या उपोषणात सहभाग घेतला. यावेळी सोशल डिस्टन्सचे पालन करत व उपस्थित प्रत्येक शेतकऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले.
सन २०१९ मध्ये जून ,जुलै ,ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्यात काही दिवस पावसाचा खंड व ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये अतिवृष्टी अशी नोंद श्रीगोंदे तहसील या ठिकाणी त्यांच्या दप्तरी आढळून आली आहे. तरी सुद्धा श्रीगोंदे तालुक्यातील देवदैठण सर्कलमधील शेतकरी या फळपीक विम्यापासून डावलले गेले. तसेच सर्व कृषि शासकीय यंत्रणांना निवेदने देऊन सुद्धा कोणत्याही आधिकाऱ्यांनी व सदर विमा कंपनीने दखल न घेतल्याच्या निषेधार्थ येथील शेतकऱ्यांनी बजाज अलायन्स विमा कंपनी तसेच प्रशासनाच्या विरोधी आजपासून बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे.
जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना हा फळपीक विमा मिळालेला आहे. परंतु श्रीगोंदे तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्याप कुठल्याही प्रकारच्या पिकविम्याचा लाभ मिळालेला नाही.
प्रतिक्रिया –या आमरण उपोषणा ची प्रशासनाच्या वतीने कोणतीही योग्य ती दखल न घेतल्यास व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कंपनीने पिक विम्याचे पैसे त्वरित वर्ग न केल्यास तसेच शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक झाल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल.– उपोषणकर्ते शेतकरी – अनिल बनकर ( सामाजिक कार्यकर्ते )कोरोना काळात कलम 144 लागू असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी या उपोषणास जमावाने न येता कॉल द्वारे तसेच एकएकटे भेटून उपोषणाला पाठींबा दर्शवला आहे.