Beed : जिल्हयात २४ ते ३० जून दरम्यान गावनिहाय विशेष सर्वेक्षण – अजित कुंभार

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
बीड – कोविड-१९ च्या संसर्गात दुर्धर अशा कोमॉरबिडिटी व इतर आजाराने ग्रस्त रुग्णांच्या बचावासाठी जिल्हयातील सर्व शहरे व गावनिहाय सर्वेक्षणाचे नियोजन करण्यात आले असून या सर्वेक्षणात शहरी भागामध्ये ५०० घरामागे एक व ग्रामीण भागामध्ये २०० घरामागे एक सर्वेक्षक अशी नियुक्ती करण्यात आली आहे. दिनांक २४ ते दिनांक ३०  जून २०२० या कालावधीत हे  सर्वेक्षण करण्यात येणार आहे याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी  आदेश दिले आहेत.
राज्यात कोविड-१९ मूळे होणा-या एकुण मृत्यूपैकी ७० टक्के मृत्यू हे रुग्णास कोमॉरबिडिटी व इतर गंभीर आजार असल्यामुळे झाल्याचे दिसून आले आहे.अशा इतर आजार असलेल्या व्यक्तींचे सर्वेक्षण जर झाले व त्यांना वेळीच आरोग्य सुविधा पुरविण्यात आल्यास अशा व्यक्तिंना कोविड-१९ प्रार्दुभाव झाल्यास होणा-या मृत्यूचे प्रमाण आपणास कमी करता येईल.

कोविड-१९ चे संक्रमण झालेले रुग्णांमध्ये गंभीर आजार असलेले व्यक्ती ज्यामध्ये हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, श्वसनाचा आजार, क्षयरोग, कुष्ठरोग यासारखे आजार असल्यास कोविड-१९ आजाराची तिव्रता वाढते व अशा रुग्णांचा वेळेत उपचाराअभावी मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे.

अशा रुग्णाना रुग्णालयात वारंवार न येता त्यांना प्रा.आ.केंद्र स्तरावर शक्य तेवढे उपचार केले जावे.
तसेच रुग्णांना ग्रामीण रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय येथे गरजेनुसार संदर्भ सेवा देण्यात येईल व यामुळे संबधीत व्यक्तीचे आजार हे नियंत्रणात राहून त्यांची रोग प्रतिकारक शक्तीत वाढ होईल व कोविड-१९ च्या प्रार्दुभावामध्ये होणारे मृत्यू आपणास टाळता येतील.
या पार्श्वभूमीवर सदर आजार झालेल्या रुग्णांचे वेळीच रोग निदान व उपचार तसेच त्यांना कोविड-१९ संक्रमणापासून वाचविण्यासाठी घ्यावयाची काळजी बाबत समुपदेशन सुविधा यामुळे उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे.

गाव निहाय सर्वेक्षण करुन आजारी रुग्णास उपचार करण्यात येवून त्याचा गांव पातळीवरील नमुन्यात अहवाल आशा कार्यकर्ती संबंधित वैद्यकिय अधिकारी प्रा.आ.केंद्र यांना सादर करतील वैद्यकिय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत जिल्हास्तरावर सादर करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणात तालुका आरोग्य अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी (शहरी व ग्रामिण) यांच्या समन्वयाने आशा स्वयं सेविका, अंगणवाडी सेविका यांचे मार्फत सर्वेक्षण होणार आहे.
जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली असून  पोट कलम २ (अ) नुसार जिल्हादंडाधिकारी हे या प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसुचना व नियमावली मधील तरतुदीनुसार कोव्हिङ-१९ विषाणूप्रतिबंधात्मक विविध उपाययोजना करण्यात येत आहेत .
या सर्वेक्षणाच्या दरम्यान प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणाऱ्या अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांना सहकार्य करून नागरिकांनी वरील आवश्यक ती माहिती दिल्यास या दुर्धर आजाराने /व्याधीने ग्रस्त व्यक्तींचे कोरोनाच्या साथीमध्ये आरोग्य चांगले ठेवुन कोरोनाचा संभाव्य धोका कमी करता येणार आहे.यासाठी त्यांनी विचारलेली आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी याप्रसंगी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here