माळेवाडी येथिल तरुण गंभीर जखमी ; उपचारासाठी नगरला हालवले
संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर शिवारातील आश्वी – निमगावजाळी रस्तावर मंगळवारी रात्री बिबट्याने दुचाकीवरुन चाललेल्या सादिक फकिरमंहम्मद शेख (वय – २३, रा. माळेवाडी, ता. संगमनेर) याच्यांवर पिल्लावरील प्रेमापोटी जीवघेणा हल्ला करत गंभीर जखमी केल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी रात्री १ वाजेच्या सुमारास सादिक फकिरमंहम्मद शेख हे चुलते अहमद हुसेन शेख यांना सोडवण्यासाठी निमगावजाळीला दुचाकीवरुन चालले होते. यावेळी प्रतापपूर शिवारातील आश्वी – निमगावजाळी रस्तावरील चतुरे वस्तीलगत रस्त्याच्या कडेला अंधारात बिबट्याचे पिल्लू दोघाना नजरेस पडले. त्यामुळे घाबरलेल्या सादिक व हुसेन यांनी दुचाकी थांबवून बिबट्या व त्यांच्या पिल्लाचा मागोवा घेतला. दुचाकी थाबल्याचे पाहून उजाडामुळे पिल्लू अंधारात निघून गेले.
त्यानतंर सादिक व हुसेन शेख यांनी तेथून पुढे जाण्याचा प्रयत्न केला असता शंभर फूटावर गेल्यानंतर अंधारात दबा धरुन बसलेल्या मादी बिबट्याने त्याच्या दुचाकीवर झेप घेतली. त्यामुळे सादिक व अहमद शेख खाली कोसळले. यावेळी मादी बिबट्याने त्याचाकडे मोर्चा वळवळत सादिक याला चावे घेतल्यामुळे दोघानीही मोठ्याने आरडाओरडा केला. त्यामुळे मादी बिबट्या तेथून निघून गेली. तर आपल्या पिल्लाला या दोघानी त्रास दिल्याची भावना या मादी बिबट्याची झाली असावी. अशी भावना नागरीकानी बोलून दाखवली आहे.
दरम्यान हल्ला झाल्यानतंर या दोघानी तात्कांळ आश्वी खुर्द येथिल सामाजिक कार्यकर्ते युन्नुस सय्यद यांना फोनवरुन हल्ल्याची माहिती दिली. माहिती मिळताचं युन्नुस सय्यद यांनी घटनास्थळी धाव घेऊन सादिक याला लोणी येथिल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले व पुढील उपचारासाठी सादिकला अहमदनगर रुग्णालयात हालवण्यात आले आहे.
मागील चार दिवसात आश्वी पंचक्रोशीतील आश्वी बुद्रुक, दाढ खुर्द व प्रतापपूर येथे बिबट्याने तीन जणावर जीवघेणे हल्ले केले असून वनविभाग मात्र कोणत्याही उपाययोजना करताना दिसत नसल्याने नागरीकानी नाराजी व्यक्त करुन किमान हल्ले झालेल्या ठिकाणी तरी वनविभागाने पिजंरे लावून हे बिबटे जेरबंद करावे. अशी मागणी आश्वी बुद्रुक, दाढ खुर्द व प्रतापपूर येथिल स्थानिक नागरीकानी केली आहे.