!!भास्करायण:३२!! जलसाक्षरता आणि जलक्रांतीची गरज….

+++भास्कर खंडागळे,बेलापूर+++ (९८९०८४५५५१ )

ज्ञानेश्‍वरीत ‘‘नगरेचि वसवावी। जलाशये निर्मावी। महावने जगवावी। नानाविध॥’’ अशी ओवी आहे. सदर ओवीतील आशय बघता संत ज्ञानेश्‍वरांच्या काळात पाण्याचे दुर्भिक्ष होते आणि त्यावर उपाययोजना कशी असावी, याची त्यांनी ओवीतून मांडणी केल्याचे दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातही जेथे जेथे डोंगर पायथ्याशी सखल जागा असतील, तेथे तेथे पाणी अडविण्याच्या उपाययोजना सुचविलेल्याचे आढळते. अहिल्यादेवी होळकरांच्या कळातील विहिरी, बारवा, ह्यादेखील पाणी उपलब्धतेच्या उपाययोजनांचा एक भाग ठरतो.
म. ज्योतिराव फुले यांनी तत्कालीन ब्रिटिश सरकारला जी पत्रे पाठविली, त्या पत्रात शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न सुटण्यासाठी आणि दुष्कळावर मात करण्यासाठी, शासनाने योग्य त्या ठिकाणी जलसंधरणाची कामे करावीत, अशा सूचना केल्या होत्या. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनीही शेतीविकासासाठी पाण्याचे महत्व जाणून, दुष्काळाच्या समस्येवर कायमस्वरुपी उपाययोजनेची आवश्यकता प्रतिपादन केल्याचे त्यांच्या विविध लेखनातून आढळते.

एकविसावं शतक हे पाण्याच्या युध्दाचं शतक असणार आहे. वाढती लोकसंख्या, नागरीकरण, उंचावलेले राहणीमान, शेती व औद्योगिक कारणास्तव पाण्याचा वाढता वापर, यामुळे पाण्याची गरज वाढत आहे. एकीकडे पाण्याची गरज वाढत असताना, दुसरीकडे मात्र पाण्याच्या दुर्भिक्षाचे संकट उभे ठाकले आहे. या संकटातूनच पाण्याचा जागतिक कलह वाढणार आहे.
पाणी ही नैसर्गिक साधन संपत्ती आहे. पाणी निर्माण होत नसते, तर ते निसर्गाकडून पावसाच्या माध्यमातून उपलब्ध होते. उपलब्ध होत असते. पावसाच्या पाण्याचेच जमिनीवरील, तसेच जमिनीतील साठ्यात रुपांतर होते आणि पावसाळ्यानंतर या पाण्याचा वापर केला जातो.

या प्रक्रियेमध्ये मोठा खंड पडल्यानेच आजची स्थिती उद्भवली आहे. निसर्ग नियमानुसार पावसाचे प्रमाण कायम आहे. त्यात बदल झालेला नाही. पर्जन्यमान घटले असल्याची ओरड करण्यात येते, त्यात तथ्य नाही. भारतात मागील पन्नास वर्षांची आकडेवारी बघता, वार्षिक पर्जन्यमानात फारसा बदल झालेला नाही. प्रदुषण व वाढत्या तापमानामुळे बदल झालाय, तो पावसाच्या नियमितपणावर. पर्जन्यमान विस्कळीत बनले असून, विभागवार विषमता वाढली आहे. यामुळे कोठे दुष्काळ, तर कोठे अतिवृष्टी असा प्रकार दिसून येतो. प्रदुषण आणि वाढते तापमान जलचक्र विकृत व विस्कळीत आहे.

मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गात विकृती व विसंगती आली असताना, दुसरीकडे उपलब्ध पाण्याच्या वापराबाबत कमालीची बेफिकीरी वाढत आहे. नागरीकरण व आर्थिकस्तर वाढल्याने उंचावलेल्या राहणीमानामुळे, पाण्याचा वापर प्रचंड वाढला आहे. ग्रामीण भागात प्रतिदिन माणसी ४० लिटर, तर शहरी भागात हेच प्रमाण प्रतिदिन माणसी २०० लिटर पेक्षाही जास्त आहे.

 अशीस्थिती असल्याने पाण्याच्या दुर्भिक्षतेचे संकट निसर्गनिर्मित नसून, आपण ओढावून घेतले आहे, असेच म्हणावे लागेल. जमिनीतील पाण्याच्या बँकेमधून आपण अमर्याद पाण्याचा उपसा करीत आहोत. उपशाच्या प्रमाणात या साठ्यांचे पूर्नभरण मात्र केले जात नाही. याचा दुष्परीणाम म्हणून भू-गर्भातील जलसाठे ओस पडले आहे. जमिनीतल पाण्याची पातळी ६०० फुटापर्यंत घसरली आहे. हे चित्र चिंताजनक आहे. भारताची लोकसंख्या 65 वर्षात चौपट वाढली आहे. लोकसंख्येच्या विस्फोटामुळे, उपलब्ध पाणी मानवी गरजा भागविण्यासाठीच खर्ची पडणार आहे.  सन २०३० पर्यन्त देशाच्या संभाव्य लोकसंख्या वाढीचा विचार करता, जलाशये पिण्याच्या पाण्यासाठीच राखीव ठेवावे लागतील.

औद्योगिकरणाबाबतही असेच घडत आहे. औद्योगिकिकरण वाढल्याने बिगर सिंचन पाण्याचा वापर तीनपटीने वाढला आहे. पिण्यासाठी व सिंचनासाठी असणार्‍या धरणांवर, कारखानदारीचा म्हणजे बिगर सिंचनाचा वाटा वाढत चालला आहे. औद्योगिकरण झपाट्याने वाढत असल्याने, त्याप्रमाणात औद्योगिक क्षेत्राची पाण्याची मागणी वाढणार आहे. खरे तर, औद्योगिकरणाचा भार पिण्यासाठी व सिंचनासाठी असणार्‍या जलाशयांवर असता कामा नये.  तसेच कारखानदारीच्या क्षेत्रात पाण्याचा पुर्नवापर सक्तीचे करणे आवश्यक आहे.

पाण्याच्या दुर्भिक्षाची समस्या ही काही भागापुरती मर्यादित न राहाता, ती आता सार्वत्रिक बनत चालली आहे. आज काही जात्यात तर काही सुपात आहेत इतकेच! यासाठी शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक घटकाने पाण्याचे नियोजन आणि काटकसरीने वापर करणेचे गरजेचे आहे. शहरातील जनतेने ‘रेन वॉटर हार्वेस्टींग’ करतानाच, पाण्याचा बेफिकीरीने होणारा वापर टाळावा. ग्रामीण भागात ग्रामपंचायतींनी त्यांच्या निधीतून व ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून साठवण बंधारे, पाझर तलाव, शेततळे अशी जलसंधरणाची कामे करावीत. पावसाच्या पाण्याचा थेंबही आपल्या शेताचा बांध ओलांडून जाणार नाही, तसेच पावसाचे पाणी गावाच्या शिवाराबाहेर जाणार नाही, असा निर्धार केल्यास, बरेच काही हाती लागेल. शेतीसाठी प्रवाही सिंचन पध्दती बंद करुन, ठिबक सिंचन, तुषार सिंचन  पध्दतीचा वापर करुन, पाण्याची बचत करावी. शेतीसाठी शहरांतील व गावातील सांडपाण्यावर प्रक्रिया करुन वाया जाणारे पाणी लगतच्या शेतीसाठी आणि उद्योगांसाठी उपलब्ध केल्यास, कारखानदारीसाठी पाण्याची मोठ्याप्रमाणावर बचत होण्यास मदत होईल.

दुष्काळाच्या जुन्या दुखण्यातून कायमचे बाहेर पडता येईल; पण त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. जबरदस्त इच्छाशक्ती दाखवावी लागणार आहे. ‘‘पाणी आडवा, पाणी जिरवा’’ बरोबरच ‘‘पाणी वाचवा, पाणी वाढवा’’ या संकल्पनेवर आधारित उपाययोजना, नियोजन कालबध्द कृती आराखडा आणि त्याची निर्धाराने अंमलबजावणी करावी लागेल.  पाण्याच्या संकटावर कायमची मात करायची, तर त्यासाठी ‘जल साक्षरता‘ आणि जलक्रांतीची गरज आहे. शासन, उद्योजक, सेवाभावी संस्था आणि जनतेचे पाठबळ मिळाली तरच, ‘जलक्रांती’ सिध्दीस जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here