कूरकूर आणि टूरटूर

आपल्यासारखे राजकारणी शोधून सापडणार नाहीत. महामारी येवो अथवा जगबुडी, राजकारण्यांना काही फरक पडत नाही. आता हेच बघा, अवघा महाराष्ट्र कोरोना महामारीचा मुकाबला करतोय, अशात नगर जिल्यातील दोन बड्या नेत्यांमध्ये शाब्दिक झटापट झाली. आता हे दोन दिग्गज कोण हे सांगणे नको. कारण जिल्ह्यात संगमनेर आणि लोणी हि अभयारण्ये उरली आहेत!
त्याचं असं झालं की, लोणीवाल्यांनी संगमनेरवर ठेवणीतलं लोणी फेकलं!म्हणाले मुख्यमंञ्यांची अशी हुजरेगिरी करणारा मंञी आम्ही बघितला नाही. झालं!आता असं जळजळीत शब्दलोणी फेकल्यावर संगमनेरी आगडोंब उठणारच!झालंही तसंच. लोणीकर विरोधी पक्षनेते असताना आम्ही त्यांना मुख्यमंञ्यापुढे लोटांगण घालताना अनेकदा बघितलंय!झालं. उठला राजकीय मोहोळ!
खरंतरं संगमनेरकर आणि लोणीकर दोघेही काँग्रेसी संस्कृतीत रुजलेले. आता हि संस्कृती कशी आहे ते अवघा महाराष्ट्र जाणून आहे. काँग्रेस हा दरबारी पक्ष आहे. घराणेशाही आणि राजेशाहिला चटावलेली संस्कृती आहे. ह्या दरबारात मुजरे घालून अनेकांनी आपल्या घराण्याचा वटवृक्ष करुन राजकीय मोक्ष मिळवलाय!आता ह्या वाटचालिचे दोघेही एकमेकांचे साक्षिदार असल्याने, दुस-याची साक्ष काढायची गरजच नाही.
अर्थात संगमनेर आणि लोणीमधून विस्तव जात नाही, हे वरवर खरं आहे. तथापि, हा विस्तव कधी पेटवायचा आणि कधी विझवायचा, यात दोघे नेते पटाईत आहेत. . कारण दोघांच्या साम्राज्याच्या सिमा एकमेकांना खेटून आहेत. त्यामुळे कधी सिमोल्लंघन करायचं आणि कधी माघारी फिरायचं हे दोघांना चांगलंच ठाऊक आहे.
असं असलं तरी, हे दोघे अधूनमधून एकमेकांची खोडी काढतात. इथं माञ खरी ग्यानबाची मेख आहे!त्याचंं असं आहे, की एकमेकांची खोडी काढली तर जिल्ह्यातील राजकारण ब-यापैकी तापतं. खरं तर ते हेतूपुरस्पर तापवलं जातं. असं केलं की दोघेही चर्चेत राहातात आणि आमच्याशिवाय अभयारण्यात कोणी राहू शकत नाही, हा संदेश आपोआप पोचतो!जनतेलाही ताणतणावाची स्थिती आसताना असं हलकंफुलकं ’ चला राजकीय हवा येवू द्या’ आवश्यक असतं. ते पुण्यांचं काम ह्या दोघांनी केलंय याबद्दल जनतेने दोघांना धन्यवाद दिले पाहिजेत.
सामान्य जनांना हि मेख माहित नसते. त्यांना हि कुरबूर खरी वाटत असते. आता नक्कीच काहितरी राजकीय उलथापालथ होणार अशा चर्चा झडत असतात. गावातल्या राजकीय भैरवांना अशा चर्चा आवश्यक असतात. असा खुराक नसेल तर हे गावभैरव भलतेच उद्योग गावात करुन गावाला हुळहुळं करतील. या दोन नेत्यांनी गावातील टोळभैरवांना खुराक देवून त्यांना खिळवून ठेवून गाव सुरक्षित ठेवल्याबद्दल ग्रामसभेत अभिनन्दनपर ठराव झाले पाहिजेत!
आता एक सांगा, कोरोनाचं संकट असताना लोणीकरांना संगमनेरवर चाल करायची गरज होती कां?तरी त्यांनी डिवचलं आणि राजकीय पाणी ढवळंल. याला काहितरी कारण आसणारच ना? तर ते असं आहे कि, आम्हाला मातोश्रीवर मानपान मिळत नाही, आमचं सरकारमध्ये ऐकून घेतलं जात नाही असं दस्तुरखुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा लोणीकरांचे शेजारी म्हटले. असं झाल्यावर शेजारधर्म असतो की नाही?पक्ष वेगळे असले म्हणून काय झालं?लक्ष एकच असतं ना! संगमनेरकरांनी सरकारातली नाराजी दाखविताच लोणीकरांनी काडी टाकली. आता नक्की गडबड होणार आणि सत्तापालट होणार, हि आशा जागी झाली. शेवटी राजकारणी हा आशेवरच असतो आणि टिकतो!
संगमनेरकरांनी लोणीचा डाव लगेच ओळखला. दोघेही काँग्रेसी संस्कृतीतले एक्सपर्ट! त्यामुळे कधी शह द्यायचा आणि कधी तह करायचा, हे चांगलं समजतं! संगमनेरकर लोणीकरांच्या विधानाने सावध झाले. घेतली मुख्यंमंञ्यासोबत बैठक आणि सांगून टाकलं जनतेला निर्धास्त राहा. आमचं तिन पक्षांच्या सरकारात कोणताही वाद नाहीत. गैरसमज दूर झालेत (कोणाचे?). तर हे असं असतं जनहो! प्रदिर्घ राजकारण करायचं तर अधूनमधून खुटा हलवून भक्कम करुन घ्यायचा असतो. काय, खरंय ना?
– भास्कर खंडागळे,
बेलापूर (9890845551)

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here