प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

मनोरंजन क्षेत्रातून एक आनंददायी बातमी आहे. सरकारने काही मार्गदर्शक तत्वे जारी करून अटी शर्तींच्या आधीन राहून चित्रपट, मालिकांच्या चित्रिकरणाला परवानगी दिली आहे. त्यामुळे आता लवकरच नवीन आपल्या आवडत्या मालिकांचे नवीन भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
सरकारने 30 मे रोजीच मार्गदर्शक तत्वे जाहीर केली होती. मात्र, या नियमांमुळे काही अडथळे येत होते. त्यामुळे पुन्हा एकदा विविध अटी-शर्ती घालून देऊन चित्रपट आणि मालिकांचे शुटिंग करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये कमीत-कमी तंत्रज्ञांमध्ये शुटिंग पूर्ण करणे, शुटिंगच्या ठिकाणी गर्दी टाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे आदी सूचना देण्यात आल्या आहेत. हे सर्व नियम www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अपडेट करण्यात आले आहे.
“लॉकडाऊनदरम्यान ठप्प झालेली चित्रपटसृष्टीतील कामे पुन्हा सुरु झाले आहेत. राज्य सरकारने काही अटी-शर्तींच्याअधीन राहून चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी मालिकांच्या चित्रीकरणास मान्यता दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे मनोरंजन, चित्रपट क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे”, असं सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख म्हणाले.
तर लॉकडाऊनच्या काळात सर्व चित्रपट व मालिकांच्या शुटिंग बंद करण्यात आल्यामुळे दूरचित्रवाहिन्यांवर मालिकांचे जुने एपिसोडचे पुनः प्रसारण करण्यात येत होते. सुरुवातीच्या काळात प्रेक्षकांनीही या जुन्या मालिकांचा आनंद लुटला. मात्र, जसजसा लॉकडाऊनचा टप्पा वाढत गेला तसतसा या जुन्या मालिका पाहून प्रेक्षकांना कंटाळा येत होता. तर तरुण पिढी मात्र अमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स वरील, अल्ट बालाजी या अॅप्स वरील वेबसिरीजवरमध्ये गुंतली होती. मात्र, आता शुटिंग सुरू होऊन लवकरच आपल्या आवडत्या मालिकांचे नवीन भाग पाहण्याचा आनंद लुटता येणार आहे.