Karjat : महापुरुषांच्या स्मारकाचा निधी रस्ते व गटार कामासाठी वर्ग करून आमदार पवारांनी केला अवमान – राऊत यांचा आरोप

3
प्रतिनीधी | राष्ट्र सह्याद्री दि २६

कर्जत : छत्रपती शिवाजी महाराज, डाॅ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, डाॅ ए पी जे अब्दूल कलाम व इतर महापुरूषांच्या स्मारकाचा निधी रस्ते आणि गटर कामासाठी वर्ग करत विद्यमान आमदार रोहित पवार यांनी यासर्व महापुरुषाचा अवमानच केला आहे. असा गंभीर आरोप शुक्रवारी कर्जत नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. 

दि.२६ रोजी संध्याकाळी उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी आपल्या दालनात पत्रकार परिषद घेत कर्जत शहरातील मुख्य रस्त्यावर नियोजित महापुरुषांच्या स्मारक आणि चौक सुशोभिकरणासह व्यापारी संकूल असा एकूण १० कोटी रुपयांचा मंजूर कामांचा निधी रद्द करुन शहरातील रस्ते आणि गटार कामासाठी वर्ग करुन महापुरुषांचा एक प्रकारे अवमान केला आहे. यासह व्यापारी संकुलाला विरोध करुन शहर आणि परिसरातील लहान मोठ्या उद्योजकांना व्यवसाय करण्यापासून रोखण्याचे काम आमदार रोहित पवार यांनी केले आहे.

हे एक सुडाचे आणि गलिच्छ राजकारण करण्याचा प्रकार असून आपण याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पत्रव्यवहार केल्याचे राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हंटले. यावेळी बोलताना उपनगराध्यक्ष राऊत यांनी पुढे म्हटले आहे कि, २७ मार्च २०१८ साली तत्कालीन पालकमंत्री प्रा. राम शिंदे व मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी नगरपरिषदांना वैशिष्ठपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजने अंतर्गत १० कोटी रूपये निधी कर्जत नगरपंचायतीस मंजूर केला होता.
यामध्ये व्यापारी संकूल आणि प्रशासकीय इमारत उभारणीसाठी ७ कोटी, चौक सुशोभिकरण २ कोटी, रस्ते विकास १ कोटी यांचा समावेश होता. कर्जत नगरपंचायतीने चौक सुशोभिकरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, डाॅ ए पी जे अब्दूल कलाम, महासती अक्काबाई तसेच इतर महापुरूषांच्या नावाने प्रस्ताव तयार करून पाठवले होते. यासर्व महापुरुषांचे स्मारकाचे नियोजित डिझाइन आणि साहित्य यांची नोंदणी सुद्धा केली होती. यास जिल्हाधिकारी यांनी २५ मार्च २०१८ या दिवशी मंजुरी आदेश दिला होता. मात्र कर्जत शहरातील मुख्य रस्त्याचे रूंदीकरण काम होत आहे. याआगोदर कामे केल्यास अडचण निर्माण होणार होती. यामुळे रस्त्याचे रूंदीकरण पूर्ण झाल्यानंतर
चौक सुशोभिकरण करण्याचा ठरले होते. यामध्ये मुख्य रस्ता वगळता इतर रस्त्यावरील कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

पंरतू या दरम्यान विधानसभेची निवडणूक झाली. या मतदार संघामधून आमदार रोहित पवार हे निवडून आले. मात्र, त्यांच्या विरोधात आम्ही काम केले. यामुळे सुडबुद्धीने मिळालेला सर्व निधी अनाधिकाराने व सत्तेचा गैरवापर करीत रद्द केला आणि हा सर्व निधी त्यांनी २४ जून २०२० रोजी गटारी आणि रस्ते दुरूस्तीसाठी वापरण्यास मंजुरी आणली.

मात्र हे करताना त्यांनी या राज्यातील, तालुक्यातील व शहरातील तमाम नागरीकांचे दैवत असणारे छत्रपती शिवाजीमहाराज, डाॅ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, डाॅ ए पी जे अब्दूल कलाम व इतर महापुरूषांचा आमदार रोहित पवार यांनी गटार आणि रस्ते कामाशी तुलना करीत अवमान केला आहे. याचा मी निषेध करतो. या प्रकरणी त्यांनी जनतेची माफी मागावी व महापुरूषांच्या सुशोभिकरणाचा निधी परत वर्ग करावा अशी मागणी केली. यासह युवकांसाठी शाॅपींग माॅल रद्द करण्याचे पाप केले आहे.

त्यात बदल करीत कर्जत शहरातील युवक आणि बेरोजगांरासठी व्यवसाय करून त्यांचे पायावर उभा रहाता यावे. यासाठी आम्ही शाॅपींग माॅल प्रस्ताव तयार केला. त्यास जिल्हाधिकारी यांनी १८ जून २०२० या दिवशी ७ कोटीची मान्यता देत २ कोटी ४६ लाख ६७ रूपये निधी देखील मंजुर केला तसेच याची निविदा प्रसिद्ध केली असे असताना या कामातही आमदार रोहीत पवार यांनी सत्तेचा गैरवापर करीत हा निधी व शाॅपींग माॅल रद्द करून शेकडो बरोजगार व तरूण युवकांचे भविष्य अंधारात टाकले आहे.

महापुरूषांचे चौक सुशाभिकरण आणि शाॅपींग माॅल ही कामे चिरकाल टिकणारी असतानाही पवार यांनी हा निधी गटर आणि रस्ते यांना दिला ही बाब आतिशय अविचारी आणि युवक यांचेवर अन्याय करणारी आहे. कर्जत नगरपंचायतीस मंजूर १० कोटी रूपये निधीचे आंदाजपत्रक तयार करून त्यास तांत्रिकमान्यतेसाठी कार्यकारी आभियंता प्राधिकरण विभाग यांच्याकडे पाठविला. त्यासाठी १ टक्का रक्कम म्हणजे १० लाख रूपये देखील भरले आहेत.
यानंतर या सर्व कामांची अंदाजपत्रके तयार करून त्यास तांत्रिक मान्यता घेतलेली असतानाही ही कर्जत शहराच्या विकासाची कामे जी सन २०१८ मधील मंजूर असताना ८ कोटी ६२ लाख रूपयांची कामे रद्द करण्याचा २४ जून रोजी आदेश काढून आमदार पवार यांनी रद्द करून कर्जत शहराच्या विकासात खोडा घालण्याचे पाप केले आहे. तसेच कर्जत नगर पंचायत ही स्वायत्त संस्था असताना तिला नष्ट करण्याचा चंग पवार यांनी बांधला आहे, असा आरोपही नामदेव राऊत यांनी केला आहे. विशेष म्हणजे या कामांसाठी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी देखील पत्रव्यहार केला होता. मात्र, त्यांना देखील रोहीत पवार यांनी जुमानले नाही.
यामुळे आमदार रोहित पवार हे जाणीव पूर्वक कर्जत शहराचा विकासात अडकाठी आणीत असून यासाठी त्यांनी महापुरूषांचा देखील अवमान केला आहे. या प्रकरणी त्यांनी जनतेची माफी मागून पूर्ववत सर्व कामे मंजूर करावित अन्यथा तीव्र आंदोलन उभा करू, असा इशारा नामदेव राउत यांनी दिला आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here