Editorial : दगाबाज मित्र

0

राष्ट्र सह्याद्री 27 जून

मराठीत एक म्हण आहे, ती म्हणजे कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. नेपाळला आता तो अनुभव येत असावा. ज्याच्यावर विश्वास टाकून चांगल्या मित्राशी पंगा घेतला, त्यानेच केसाने गळा कापावा, अशी सध्या नेपाळची परिस्थिती झाली आहे. भारत आणि नेपाळमध्ये रोटी-बेटी व्यवहार होत होता. नेपाळ आणि बिहारमध्ये मधेशी समाज मोठ्या संख्येने आहे. भारताने नेपाळच्या राज्यघटना दुरुस्तीच्या वेळी सुचविलेल्या सूचना अंतर्गत कारभारात हस्तक्षेप असल्याचे नेपाळला वाटले. खरे तर तेथील मोठ्या असलेल्या समाजावर अन्याय होऊ नये, अशी भारताची इच्छा होती.  त्यामुळे वर्षानुवर्षांची मैत्री सोडून नेपाळ चीनच्या आहारी गेला.

चीनकडे आर्थिक ताकद असली, तरी तो त्या ताकदीच्या जोरावर मित्रराष्ट्रांनाही मांडलिक बनवितो, संबंधित राष्ट्रांचा आवाज दडपून टाकतो, हा अनुभव श्रीलंका, मालदीव आदी देशांनी घेतला आहे. पाकिस्तानलाही तो अनुभव लवकरच येईल. चीनच्या आहारी गेले, की काय होते, हे अनेक देशांनी अनुभवले आहे. नेपाळला अवघ्या चार-पाच वर्षांत चीनचा आक्रमकवादाचा प्रत्यय आला. असे असले, तरी त्याविरोधात नेपाळने मिठाची गुळणी धरली आहे. गेल्या शे-दीडशे वर्षांपासून भारताचा भाग असलेला प्रदेश नेपाळने आता आपल्या नकाशात दाखविला.

भारताने त्या भागात विकासाची थोडी कामे केली, तरी पित्त खवळलेला नेपाळ मात्र चीनने गावेच ताब्यात घेतली, तरी शांत आहे. पैसे आणि कर्जाखाली दबले, की काय होते, हे आता नेपाळ अनुभवीत आहे. मैत्री नको, मदत नको आणि कर्जही नको; परंतु विस्तार आवर असे म्हणण्याची वेळ नेपाळवर आली आहे. नेपाळमध्ये चीनने कित्येक किलोमीटर जमीन ताब्यात घेतली आणि तिबेटमध्ये विलीन केली. चीन आता तेथे रस्ता बनवित आहे. कृषी मंत्रालयाच्या सर्वेक्षण विभागाच्या अहवालात हे उघड झाले आहे.

या सर्वेक्षणात चीनने 11 ठिकाणी जमीन हस्तगत केल्याचे उघड झाले आहे. त्यापैकी 10 अशी ठिकाणे आहेत, जिथे त्याने नेपाळची 33 हेक्टर जमीन ताब्यात घेतली आहे. त्यासाठी त्यांनी नदीचा मार्ग बदलला आहे, जी पूर्वी एक नैसर्गिक सीमा होती. येथे तो सैनिकांसाठी आता चौकीही बांधत आहे. सर्वेक्षणातील या कागदपत्रांमध्ये चीनने नद्यांच्या प्रवाहात बदल केले आहेत आणि हा भाग तिबेटमध्ये समाविष्ट करण्यासाठी रस्ते तसेच अन्य बाबतीत बदल केले आहेत. या कागदपत्रांमध्ये असेही म्हटले आहे, की नेपाळ भागातील नद्यांचा प्रवाह हळूहळू कमी होत आहे. नेपाळमधील अधिकाधिक भाग तिबेटमध्ये समाविष्ट करण्याचा चीनचा प्रयत्न आहे. नेपाळच्या ते लक्षात आलेले दिसत नाही.

चीनने आपली आक्रमक विस्तारवादी भूमिका कायम ठेवत मित्र राष्ट्र असलेल्या नेपाळलाही धोका दिला आहे. नेपाळच्या एका गावाचा चीनने ताबा घेतला असल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती; मात्र चीनने नेपाळचा आणखीही भूभाग घशात घातला आहे. चीनने मागील काही काळात आपल्या विस्तारवादी धोरणांवर काम करण्यास सुरुवात केली. तैवान, जपान, भारतासोबतच्या सीमा प्रश्नावरून चीनसोबतचा तणाव वाढला आहे. चीनने तिबेटमध्ये रस्ते निर्मितीच्या नावाखाली सुरू केलेल्या बांधकामादरम्यान नेपाळच्या भूभागावर ताबा मिळवला आहे. बगडरे खोला नदी आणि करनाली नदीचा प्रवाह बदलण्यात आला आहे. हुमला जिल्ह्यातील १० हेक्टर जमिनीवर चीनने अतिक्रमण केले आहे.

त्याशिवाय नेपाळची सहा हेक्टर जमीन रसूवा जिल्ह्यातील सिंजेन, भुरजूक आणि जांबू खोला या ठिकाणी रस्ते बदलण्यात आल्यामुळे अतिक्रमणात ही जागा चीनने बळकावली आहे. चीन सरकार तिबेट स्वायत्त प्रदेशात रस्ते बांधत आहे. या कामादरम्यान, नदीचे प्रवाह बदलण्यात आले आहे. चीनकडून असे काम सुरू राहिल्यास या ठिकाणचा नेपाळचा मोठा भूभाग चीनमध्ये जाणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

नेपाळचे रुई गाव चीनने आपल्या ताब्यात घेतले असल्याचे काही दिवसांपूर्वीच उघड झाले होते. या गावातील सीमा दर्शवणारा स्तंभही तोडण्यात आला. मागील तीन वर्षांपासून हे गाव चीनकडे गेले असल्याचा आरोप होत आहे. नेपाळ काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी उपपंतप्रधान बिमलेंद्र निधी यांनी चीन जबरदस्तीने नेपाळचा भूभाग गिळत असल्याचा आरोप केला. चीनच्या या धोरणाविरोधात नेपाळ सरकारने तातडीने कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. नेपाळने लिपुलेखा, कालापानी भागासह भारताच्या इतर भूभागावर दावा केला आहे.

नवीन नकाशाला नेपाळच्या संसदेने मंजुरी दिली आहे. नेपाळच्या या भूमिकेला भारताने विरोध दर्शवला आहे. चीनच्या इशाऱ्यावर नेपाळने भारताच्या भूभागावर दावा केला असताना दुसरीकडे मात्र चीन नेपाळचा भाग आपल्या घशात घातला आहे. चीनने नेपाळमधील सिंधुपाल्चोकच्या 11 हेक्टर क्षेत्रावर आधीच दावा केला आहे. शंखवासभा जिल्ह्यातील सुमजंग, काम खोला आणि अरुण नद्यांचा प्रवाहही नेपाळच्या भूमीत विलीन करण्यासाठी चीनने बदलला आहे.

या सर्वेक्षण अहवालात नेपाळ असाच शांत राहिला, तर चीन नेपाळची बहुतांश जमीन तिबेटमध्ये विलीन करील, असा इशारा देण्यात आला आहे. 1960 च्या सर्वेक्षणात नेपाळ आणि चीनची सीमा खांबांनी विभागली होती;  परंतु नेपाळने कधीही आपल्या सीमेचे रक्षण करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नाही. परिणामी, नेपाळच्या उत्तरेकडील फक्त 100 खांबच चीनची सीमा दर्शवित आहे. भारत-चीन आणि नेपाळच्या सीमेवर भारताचे आठ हजार 553 खांब आहेत.

अलीकडच्या काळात चीनने भारताच्या उत्तर सीमेवर घुसखोरी करण्याचा व तेथील जमीन ताब्यात घेण्याचा डाव कसा रचला हे संपूर्ण जग साक्षीदार बनले आहे. भारत आणि चीनच्या सीमेवर वाढलेले तणाव हे त्याचे कारण आहे. लडाखमध्ये सुरू झालेल्या वादात भारताने कठोर भूमिका घेतली आहे. चीनचा केवळ भारताशी सीमा विवाद नाही, तर ज्या ज्या देशांशी त्याची सीमा आहे, तिथे वाद सुरू आहेत. मलेशिया आणि व्हिएतनामशी त्याचा वाद दक्षिण चीन समुद्रावर आहे. तैवानबरोबर ऑस्ट्रेलियाच्या लष्करी मोहिमेवर चीन लक्ष ठेवून आहे. कृषी मंत्रालयाने सुमारे ३० वर्षानंतर सीमाभागांचे सर्वेक्षण केले आहे. अहवालात असेही म्हटले आहे, की नेपाळने त्वरित कारवाई केली नाही, तर ड्रॅगनने त्याच्या जास्तीत जास्त जमीन ताब्यात घेईल.

या सर्वेक्षणातील अहवालात म्हटले आहे, की जमीन ताब्यात घेण्यासाठी चीनने नद्या वळविल्या. कर्नाली नदी नेपाळमध्ये उगम पावून तिबेटमध्ये जाते. ही नदी नेपाळच्या मोठ्या भागात वाहते. इथल्या सीमेच्या भागाची उपग्रह प्रतिमा पाहिल्यास दोन देशांच्या सीमेवर काही बांधकाम झालेले आढळले. तिबेटच्या परिसरात सीमा रस्तादेखील दिसतो. हा रस्ता चीनच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २१ ला मानसरोवर तलावाजवळ, नेपाळच्या लिमीमार्गे, बुरंग काउंटी, तिबेट मार्गे जातो. हाच मानसरोवर तलाव आहे, येथून हजारो भाविक भगवान शिवाच्या कैलास पर्वतावर दर्शनासाठी जातात.

कृषी विभागाच्या सर्वेक्षणातील अहवालानुसार नेपाळची शेकडो हेक्टर जमीन चीनने गिळंकृत केली आहे. नेपाळच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. या सर्वेक्षणात असे म्हटले आहे, की चीन हे काम सातत्याने करीत असून नद्यांचे प्रवाह बदलत आहे. ज्याच्या खांद्यावर डोळे झाकून विश्वास ठेवावा आणि त्यानेच आपली मान बगलेत घेऊन मोडावी, असे चीनने नेपाळच्या बाबतीत केले आहे. भारताची भूमी चीनच्या नकाशात दाखवून त्यावर तयार होणा-या राष्ट्रवादाच्या पोळीवर निवडणूक जिंकण्याची पंतप्रधान खडग्‌प्रसाद ओली यांची योजना होती; परंतु चीनच्या आक्रमकवादी भूमिकेमुळे त्यांच्या या मनसुब्यावरही पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत विरोधक राष्ट्रवादाच्या ओली यांच्या भूमिकेमुळे बॅकफुटवर होते; परंतु त्यांच्या हाती आता आयते कोलित मिळाले आहे. नेपाळच्या निवडणुकीत हा आता प्रचाराचा मुद्दा ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here