!!भास्करायणः३६!!
असे ‘गोपीचंद’ राज्याच्या भाळी नको!

0

Rashtra sahyadri special …

भाजपचे ‘उगवते’ आमदार गोपीचंद पडळकर यांनी नको ते तारे तोडलेत. “शरद पवार हे राज्याला लागलेला कोरोना आहे” म्हणाले. झाले! महाशय एका क्षणात हिरो झाले!

माध्यमांनी तर त्यांनी जणू भिमपराक्रम केला, अशा थाटात याला प्रसिध्दी दिली.पवार विरोधकांना तर कोठे कोठे गोपीचंद लावू असे झाले! पण ही सगळी विकृती आणि असूरी आनंद आहे, हे मात्र या महाभागांना समजत नाही.

पवारांचा विरोध समजू शकतो. तो व्यक्त करण्याचा अधिकारही आहे.पण याचा अर्थ कोणतीही भाषा वापरायचा परवाना मिळालेला नाही. काहिंनी गोपीचंदांसाठी शब्दगोपीचंद झिजविताना अभिव्यक्ती स्वातंञ्य असल्याचे अकलेचे तारे तोडले! एवढे आपले संविधान उथळ नाही वा काहिही बोलण्याची मुभा देत नाही. अभिव्यक्ती स्वातंञ्य हे सभ्यतेच्या मापदंडात आहे. काहिही बकण्याचा मुक्त फरवाना संविधानाने तर नक्कीच दिलेला नाही.

हा प्रश्न पवारांपुरताच मर्यादित नाही. ईलेक्ट्राॕनिक प्रसार माध्यमे आल्यापासून हा असभ्यपणा व विकृतपणा बोकाळलाय. त्याला धंदेवाईक प्रसार माध्यमेही खातपाणी घालून आपला धंदा करुन घेत आहेत. माजी मुख्यमंञ्यांना टरबूज, खरबूज, कोणालावाकडतोंड्या, कोणाला चंपा, कोणाला पप्पू तर कोणाला थेट बारबाला म्हणण्यापर्यन्त हिन व निच पातळी माध्यमभैरवांनी गाठलिय. यातून क्षणाचा आनंद जरुर मिळतो. पण तो तितकाच तकलादूही असतो, हे या माध्यमभैरवांनी ध्यानात घेतले पाहिजे. तसेच यातून माध्यमभैरवांची विकृतीही स्पष्ट होते.
ज्यांच्या राजकिय कारकिर्दीएवढेही वय नाही अशा नवाजाताने असभ्यतेने टिका करावी? अशा उध्दट धेंडाना आमदार पदावर राहाण्याचा काडीचाही अधिकार असता कामा नये. आमदार झालो म्हणजे उचलली जिभ लावायची टाळ्याला याचे परमिट नाही. दारुच्या परमिटइतकी जर पदे स्वस्त होत असतील, तर लोकशाहि व लोकप्रतिनिधत्वाचा फेरविचार करावा लागणार आहे.
पवार राजकीय विरोधक असतील. त्यांचेबाबत रागही असू शकतो. याचा अर्थ एकमेकाचे दुश्मन असल्यासारखे खावू की गिळू छाप वागणार कां?महाराष्ट्र हा सुसंस्कृत राजकारणासाठी ओळखला जातो. एकमेकांचा सन्मान राखण्याची उदात्त परंपरा राज्याने जोपासलिय. राज्याने अनेक राजकीय नेत्यांचे राजकीय मतभेद बघितलेत. अगदी आपल्या बिनधास्तपणाबद्दल ख्यातीप्राप्त स्व. बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांचे मतभेद पाहिलेत. स्व. बाळासाहेबांची पवारांबाबातची शेलकी विशेषणे हास्याचे फवारे उडवित, असभ्यतेचे शिंतोडे नव्हे. ठाकरे-पवार यांच्यातील जुगलबंदिने अवघ्या राज्याच्या राजकिय क्षेञाला मनमुराद आनन्द व वेगळा आयाम दिला. पण वेळ आली तेव्हा एकमेकांचा सन्मान करताना दोघांनीही आखडते घेतले नाही.
आ. पडळकरांनी जी मुक्ताफळे उधळली त्याचे कोणीही समर्थन करु नये. विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी विनाविलंब याप्रकरणी नापसंती दर्शविली.तसेच गोपीचंद यांना सल्ला देताना पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यावर भान राखून बोलावे अशी कानउघाडणी केली,याबद्दल त्यांचे अभिनन्दन. त्यांनी राज्याच्या सभ्य राजकीय संस्कृतीला साजेशी भूमिका घेतली. प्रश्न पवार की पाडळकर हा नाही. तर सभ्यता, संस्कृती की छिनालपणा व विकृती, हा आहे. कारण राजकारण जर नासलं तर आज घराबाहेर असणारी विकृती घराघरात घुसून अनर्थ केल्याशिवाय राहाणार नाही.

पवार व स्व.गोपिनाथ मुंढे, स्व.विलासराव यांच्यातील जुगलबंदीची भाषणे तर पर्वणीच होती. कोणताही अपशब्द, एकमेकांची खिल्ली, उपमर्द न करताही मार्मिक टिका कशी असावी, याचा या तिघातील जुगलबंदी वस्तुपाठच. प्रमोद महाजन, आर.आर आबा हे देखिल याच परंपरेतील. राज्यातील जनतेने मार्मिक टोलेबाजी, नर्मविनोदाने हसतहसत दात पाडण्याचे कसब पाहिलेय. त्याचवेळी एकमेकाचा पक्षभेद, मतभेद बाजूला सारुन केलेला गौरव, सन्मानही अनुभवलाय.


अशा सभ्य परंपरेला जर कोणी, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, मंञी वा कोणी असो, तो जर आसभ्यतेचे गोपीचंद लावणार आसेल तर त्याला जनतेनेच रोखले पाहिजे. ज्या राज्याने यशवंतराव, ना.ग.गोरे, आचार्य अञे, मृणालताई गोरे, वसंतराव नाईक, वसंतराव पाटील, शरद पवार,विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंढे, प्रमोद महाजन, देवेन्द्र फडणवीस अशी सुपिक व सुसंस्कृत राजकारण्यांची मांदियाळी बघितलिय. आशा सुपिक मातीत वेड्या बाभळी फोफावणार आसतील तर त्या वेळीच छाटल्या पाहिजेत. कारण प्रश्न पवारांचा नाही प्रश्न महाराष्ट्राचा बिहार होवू द्यायचा कां हा आहे. दुःख म्हातारी मेल्याचं नसून काळ सोकावता कामा नये. तसेच असा असुसंस्कृत ‘गोपीचंद’ सभ्य महाराष्ट्राच्या भाळी नको, इतकंच!

भास्कर खंडागळे ,बेलापूर
[९८९०८४५५५१ ]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here