Shrigonda : प्रेयसीच्या नातेवाईकांच्या विरोधामुळे प्रियकराने गळफास घेऊन संपविले जीवन…

आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा दाखल करण्याची पीडित कुटुंबाची मागणी

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

शहरालगत असलेल्या औटीवाडी परिसरात एका २२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. आत्महत्या करण्यामागे काही नाजूक कारण असल्याचे कुटुंबातील सदस्यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या अर्जामध्ये नमूद केले आहे.

मयत राहुल सखाराम औटी हा इयत्ता दहावी झाल्यानंतर दोन वर्षांपासून शेती व लिंबू व्यवसाय करीत होता. जामखेड तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असणाऱ्या मुलीशी मयताचे प्रेमसंबंध असल्याचे समजते आहे. मुलीच्या संबंधितांना सदरील प्रकरण माहीत होते. त्यामुळे, नातेसंबंधात असतानाही या सर्व प्रकाराला त्यांच्याकडून विरोध होत होता. परिणामी भविष्यात होणाऱ्या लग्नाला विरोध असल्याचे निष्पन्न झाले. यात होत असलेल्या विरोधामुळे तसेच श्रीगोंदा तालुक्यातील लांडगेवस्ती-भिंगान रोड येथील मुलीचे संबंधित वारंवार मुलाला भेटल्यानंतर किंवा फोनद्वारे जीवे मारण्याची धमकी देत असल्यामुळे मुलाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याचे मयताच्या कुटुंबातील लोकांचे म्हणणे आहे.

वारंवार जीवे मारण्याच्या येत असलेल्या धमकीमुळे व भीतीमुळे राहुल सखाराम औटी राहणार औटेवाडी,तालुका श्रीगोंदा याने घरात कुटुंबातील कुणालाही न सांगता दिनांक २७ जून २० रोजी सकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान घराजवळ असलेल्या मराठी शाळेच्या अंगणातील लहान मुलांसाठी बनवलेल्या झोपाळ्याला (सिंगलबारला) दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने नमूद मुलीचे नातेवाईक जीवे मारण्याची धमकी देत असल्याने आत्महत्या करीत असलेबाबत स्वतः च्या हस्ताक्षरात चिठ्ठी लिहून ठेवली आहे. असे मयत राहुल च्या नातेवाईकांनी श्रीगोंदा पोस्टेला दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.

नमूद प्रेमसंबंधा संदर्भात राहुलला मुलीकडील लोकांचा किंवा संबंधितांचा विरोध होता. याविषयी घरातील ज्येष्ठांना समजले असते. तर, यावर चर्चेतून मार्ग निघाला असता आणि कदाचित राहुलचा जीवही वाचला असता. मात्र, होणाऱ्या विरोधामुळे आणि जाचामुळे राहुलने गळफास घेत जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला.असेही त्यांचे म्हणणे आहे.

राहुलला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची मागणी करण्यात येत आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी चौकशी करत मिळालेल्या माहितीनुसार आकस्मित मृत्यूची नोंद केली असून, पुढील चौकशी केल्यानंतर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात निर्देश दिले जाणार असल्याचे समजले आहे.

मयत राहुल औटी ने मृत्यूचे किंवा आत्महत्येचे कारण चिठ्ठीत नमूद केलेले असतांना, पोलीस या प्रकरणाकडे गंभीरतेने पाहत नसल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. उलट लटकलेल्या व्यक्तीला तुम्ही खाली का उतरवले? असा उलटा सवाल पोलीस करीत आहेत.

फाशी घेतल्याचे अगदी कमी वेळेत समजल्याने राहुल जिवंत असेल. या आशेने आम्ही त्याला खाली उतरल्याचे, कुटुंबातील लोक सांगत आहेत. तसेच, आत्महत्येस प्रवृत्त केले बाबत लांडगेवस्ती, भिंगान रोड येथील नमूद आरोपींवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात मागणीही केली जात आहे. गुन्हा दाखल न झाल्यास पीडित वरिष्ठांकडे दाद मागणार असल्याचेही समजते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here