Ahmednagar Corona Updates : नगरसह जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक

जिल्ह्यात आढळले २५ रुग्ण; शहर परिसरात १७

नगर/ लिंपणगाव : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. नगर शहराच्या सर्वंच भागात आता कोरोनाने विळखा घातला असून आता आडतेबाजारात त्याचा अधिक उद्रेक झाला आहे. शहर आणि नगर तालुक्यात मिळून १७ रुग्ण सापडले असून अन्य ठिकाणी आठ रुग्ण सापडले. दरम्यान, सत्तर जणांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. त्यात श्रीगोंदे तालुक्यातील दहा जणांचा समावेश आहे. अवघ्या चार दिवसांत नगरमध्ये शंभराहून अधिक रुग्ण आढळले.

सकाळी आलेल्या अहवालात जिल्ह्यात १२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे म्हटले होते. त्यानंतर सायंकाळी पुन्हा १३ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. आज दिवसभरामध्ये २५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यात नगर शहरातील १२ जणांचा आणि भिंगारसह तालुक्यातील पाच जणांचा समावेश आहे.

भिंगार एक, नगर शहरातील आडते बाजार पाच, पाईपलाईन रोड एक, तोफखाना पाच, ढवण वस्ती एक असे हे रुग्ण आहेत. सकाळच्या अहवालानुसार संगमनेर तालुक्यात सहा, नगर शहर आणि ग्रामीण भाग मिळून चार तर अकोले आणि पारनेर तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला.

नगर शहरात सिद्धार्थनगर, भिंगार, नवनागापूर आणि केडगाव येथे बाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी केडगाव येथील रुग्ण ठाण्याहून आला होता. संगमनेर तालुक्यात कुरण येथे दोन, पिंपरणे आणि साकुर येथे एक आणि संगमनेर शहरात हुसेननगर आणि लखमीपुरा येथे एक बाधित आढळला. पारनेर तालुक्यातील गोरेगाव आणि अकोले शहरातील कांदा मार्केट येथे प्रत्येकी एक बाधित रुग्ण आढळले, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.

जिल्ह्यात दहा रुग्णांनी आज कोरोनावर मात केली. त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. त्यामध्ये, संगमनेर पाच, नगर शहर दोन, पारनेर, नगर आणि अकोले तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २८३ इतकी झाली आहे. श्रीगोंदे तालुक्यातील कोरोनाबाधित व्यक्तींचा आकडा आता अकरावर पोहोचला आहे. भिवंडी येथून आलेल्या तिघांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या संपर्कात आलेल्या दहा व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांची कोरोना चाचणी नकारात्मक आली. येळपणे येथील सर्व  व्यवहार बंद ठेवण्यात आले असून गाव सिल केले आहे. शिवाजीराव नागवडे कारखाना परिसरातील दोघे आणि कोंडेगव्हाण येथील एक असे तिघेजण कोरोनामुक्त झाले आहेत.

भिवंडीहून आलेल्यांना मज्जाव

येळपणे येथे भिवंडीहून आलेल्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले
असताना भिवंडीहून आणखी काही लोक येळपणे येथे येणार होते; परंतु त्यांना तालुक्याच्या हद्दीवरून परत पाठवण्यात आले.

पोलिसाला मारहाण

दिल्ली दरवाजा परिसरात अति संक्रमित क्षेत्र असून त्या भागात जाण्या-येण्यावर जिल्हाधिकार-यांनीच बंधन घातले आहे. जिल्हाधिका-यांच्या आदेशाचे पालन करून या भागात प्रवेश करून न दिल्याने दोघांनी एका पोलिसाला धक्काबुक्की केली. हे पोलिस कर्मचारी तोफखाना पोलिस ठाण्याचे आहेत. धक्काबुक्की करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कोरोनामीटर

एकूण बाधित -४२२

कोरोनामुळे मृत्यू-१६

कोरोनामुक्त-२८३

रुग्णालयात दाखल-१२३

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here